>> थरुर, सिंह आज अर्ज दाखल करणार
कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वीच राजस्थानमध्ये गहलोत समर्थकांचे राजीनामानाट्य रंगल्यामुळे पक्षनेतृत्त्वापुढे पेच निर्माण झाला होता. गांधी परिवारातील व्यक्ती निवडणूक लढवणार नसल्याने राज्यस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे नाव आघाडीवर होते; मात्र आमदारांच्या राजीनामा आणि दबावनाट्यानंतर गहलोत यांनी सोनिया गांधी यांची काल भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले. आता मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यांच्यापुढे पक्षाचे केरळमधील खासदार शशी थरुर यांचे आव्हान असेल.
कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत शशी थरुर आणि अशोक गहलोत यांची नावे आघाडीवर होती. मात्र राजस्थानातील राजकीय घडामोडींनतर अशोक गहलोत यांनी माघार घेत असल्याचे जाहीर केले. शशी थरुर हे निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट आहे. त्यानंतर काल कॉंग्रेसचे राज्यसभा खासदार आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी ही निवडणूक लढवण्याचे असल्याचे स्पष्ट केले. हे दोन्ही नेते शुक्रवार दि. २९ सप्टेंबर रोजी अर्ज भरणार आहेत.
कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिग्विजय सिंह यांनी दिले होते; मात्र, त्याचे नाव निवडणुकीच्या शर्यतीत आघाडीवर नव्हते. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्रिपद भूषवलेल्या दिग्विजय सिंह यांच्याकडे प्रशासनिक आणि संघटनात्मक अनुभव आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी दोनवेळा काम केले आहे.