अतिसाराची कारणे अस्पष्टच

0
107
वाळपईत उपजिल्हाधिकारी व्ही. वळवईकर पाली घटनेवर मार्गदर्शन करताना. सोबत मामलेदार दशरथ गावस.

उपजिल्हाधिकार्‍यांची पालीत भेट : अधिकार्‍यांशी बैठक
पाली-सत्तरीत अतिसाराचे दोन बळी गेले असताना अजूनही त्यांच्या मृत्यूमागची नेमकी कारणे स्पष्ट झालेली नाहीत. अहवालाप्रमाणे रुक्मिणी पर्येकर यांना न्युमोनिया झाला होता तर धानू सावंत यांना मधुमेहाचा त्रास होता. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असे हॉस्पिटलाकडून समजते. पण रक्ताचा व पाण्याच्या नमुन्याचा अहवाल अजूनही न आल्याने मृत्यू मागची नेमकी कारणे समजू शकली नाहीत. त्या विषयावर काल उपजिल्हाधिकारी व्ही. वळवईकर यांनी पाली येथे भेट दिली. त्याचप्रमाणे त्यांनी तातडीने पाणीपुरवठा विभाग वाळपई हॉस्पिटल, महिला व बाल विकास अधिकारी, सरपंच सौ. श्रेया गावकर, पंच अर्जुन सावंत यांची बैठक बोलावून पालीतील साथीचा रोग आला असताना सुटीवर अधिकार्‍यांनी न जाता काम करा असा आदेश दिला. तसेच रक्ताचा व पाण्याचा अहवाल उद्यापर्यंत सादर करा असा आदेश दिला. नागरिकांच्या जिवाशी खेळणार्‍याची गय केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. आरोग्य खात्यामार्फत साथीच्या रोगाबद्दल जागृती करा, तसेच नागरिकांनी गावात जऊन तपासणी करा असाही आदेश दिला. बैठकीला मामलेदार दशरथ गावस, संयुक्त मामलेदार श्रीपाद माजीक, डॉ. शाम काणकोणकर उपस्थित होते.
नागरिकात भीतीचे वातावरण
साथीच्या रोगात दोघांचा बळी गेला असताना देखील अजूनही साथीच्या रोगाबद्दल भीतीचे वातावरण पसरले असून लवकरात लवकर शोध लावावा अशी मागणी केली आहे. नागरिकांच्या म्हणण्याप्रमाणे प्रदूषित पाण्यामुळे अतिसाराचा प्रादुर्भाव झाला असावा.
वाळपई रुग्णालयाकडून तपासणी
काल वाळपई रुग्णालयाकडून पाली गावात जाऊन सुमारे ९० जणांची तपासणी केली. त्यांना तपासणीनंतर साथीचा फैलाव होऊ नये म्हणून औषधे देण्यात आली.
अतिसाराचे आणखीही रुग्ण
पालीतील अतिसाराचे आणखीही रुग्ण आढळले असून सध्या गोमेकॉत तीन, वाळपईत चार तसेच म्हापसा ऑझिलोत काही रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत २५ रुग्णांना अतिसाराचा त्रास झाला आहे. घरी पाठविलेल्या चार जणांना अतिसाराचा त्रास झाला आहे.