अठरा वर्षांवरील महिलांना दरमहा एक हजार रुपये

0
59

>> मडगावातील आपच्या मेळाव्यात केजरीवाल यांचे आश्‍वासन

गोव्यात आम आदमी पक्षाचे सरकार पुढील विधानसभा निवडणुकीनंतर सत्तेवर आल्यास महिलांना गृहआधार योजनेंतर्गत सध्या दीड हजार रुपये मिळतात ती रक्कम वाढवून अडीच हजार करण्यात येईल. तसेच या योजनेंतर्गत ज्या महिलांना लाभ मिळत नाही त्या १८ वर्षावरील महिलांना दर महिना त्यांच्या खात्यांत एक हजार रुपये आपचे सरकार जमा करेल असे आश्‍वासन आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मडगाव येथे दिले.

काल रविवारी मडगाव येथील दैवज्ञ भवनात आपच्या मेळाव्यात त्यांनी गोवेकरासाठी भरीव आश्‍वासने दिली. या आधी मोफत वीज, मोफत पाणी, मोफत तीर्थाटन अशी आश्‍वासने केजरीवाल यांनी दिली आहेत. त्याची आठवण आजही त्यांनी करुन दिली. ‘आप’ हे महिला सबलीकरणासाठी जगातील सर्वात मोठे पाऊल उचलणार आहे. व गोव्यांतील पाच लाख महिलांना त्याचा फायदा मिळेल असे केजरीवाल म्हणाले.

या योजना लागू करण्यासाठी जे पैसे लागणार आहेत ते जादूने तयार करणार नाही. गोव्याच्या खर्चाचे अंदाजपत्रक २२ हजार कोटींचे आहे. या पैशांतून कामे करताना २० टक्के भ्रष्टाचार होत आहे असे गृहीत धरले तर ही रक्कम चार कोटींच्या वरती जाते.
मी आज ज्या योजना जाहीर केल्या आहेत त्यासाठी जास्तीत जास्त एक कोटी खर्च येऊ शकतो. गोव्यात होणारा भ्रष्टाचार रोखल्यास तीन कोटी रुपये शिल्लक राहतील असे केजरीवाल यांनी सांगितले.

या मेळाव्यात पाच दिवस उपोषण केलेल्या ऍड. अमीत पालेकर उपस्थित होते. केजरीवाल यांनी ऍड. पालेकर यांच्या धैर्याचे यावेळी कौतुक केले.

आपचे राज्य निमंत्रक राहुल म्हांबरे, प्रतिमा कुतिन्हो यांची भाषणे झाली. दक्षिण गोव्यातील आपचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.