‘ओमिक्रॉन’चे देशभरात २१ बाधित

0
22

>> रविवारी एकाच दिवशी सापडले १७ नवे रुग्ण

>> कर्नाटक, गुजरातसह आता महाराष्ट्रातही फैलाव

देशात रविवारी एकाचवेळी ओमिक्रॉनचे १७ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे ओमिक्रॉनच्या देशातील रुग्णांची संख्या आता २१ झाली असून काल सापडलेल्या १७ पैकी सर्वाधिक रुग्ण हे राजस्थानमध्ये आढळले आहेत. हे सर्व रुग्ण एकाच कुटुंबातील आहेत. यातील ४ जण अलिकडेच दक्षिण आफ्रिकेतून परतले आहेत. या ४ जणांच्या संपर्कात ५ जण आले होते. त्यांनाही ओमिक्रॉनचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.

राजस्थानच्या आधी महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये ओमिक्रॉनचे ७ रुग्ण आढळून आले आहेत. तर दिल्लीत काल सकाळी एक रुग्ण आढळून आला आहे. यामुळे देशातील ओमिक्रॉन रुग्णांची आतापर्यंत एकूण संख्या २१ वर गेली आहे.
राजस्थानमधील ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या कुटुंबातील ४ जण हे २५ नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेतून दुबई आणि मुंबईहून जयपूरला आले होते. या सर्वांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. या सर्वांना क्वॉरंटाइन करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात पिंपरी-चिंचवडमध्ये आढळून आलेल्या ७ जणांचे नमुने जिनोम सिक्वेंसिंगसाठी पाठवण्यात आले होते. ७ पैकी ४ जण हे अलिकडेच विदेशातून भारतात परतले आहेत. तर ३ जण त्यांच्या संपर्कात आले होते. त्यांचीही चाचणी केली गेली. हे तिघेही पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यांचे अहवाल रविवारी आले.

दिल्लीत तरुणाला संसर्ग
दिल्लीत सापडलेला एक बाधित हा टांझानियातून आलेला तरूण असल्याचे समोर आले आहे. त्याला इस्पितळात दाखल करून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घशात सूज, थकवा, अंगदुखी अशी लक्षणे त्याच्यात दिसून आली आहेत. त्याने लशीचे दोन्ही डोस घेतले होते.
यापूर्वी कर्नाटकात दोन, गुजरातमध्ये १ आणि महाराष्ट्रात १ असे ओमिक्रॉनचे ४ रुग्ण आढळले होते.

कोरोनामुळे देशभरात
८,८९५ बाधितांची नोंद
गेल्या २४ तासांत देशभरात ८ हजार ८९५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे देशभरात सध्या ९९ हजार १५५ जणांवर कोरोनाचे उपचार सुरु आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये देशात ओमायक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण सापडल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये या विषाणूचा दक्षिण आफ्रिकेतही आणि अन्य काही देशांमध्ये प्रसार होताना दिसत आहे. ओमिक्रॉन संक्रमित ४० देशांतून मागील महिन्याभरात २८६८ प्रवासी मुंबईत आले. यापैकी ४८५ प्रवाशांची कोविड चाचणी केल्यानंतर नऊजण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले.

चोवीस तासांत राज्यात
४१ कोरोनाबाधित

राज्यात गेल्या चोवीस तासांत नवीन ४९ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर, कोरोना रुग्णाच्या बळीची नोंद नाही. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्येत पुन्हा वाढ झाली असून रूग्णसंख्या ४१२ एवढी झाली आहे. राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होत आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या २५० पर्यत पोहोचली होती. आता, या सक्रिय रूग्णसंख्येत वाढ होऊन ४१२ पर्यत पोहोचली आहे.

कोरोना बळींची एकूण संख्या ३३८७ एवढी आहे. राज्यात गेल्या चोवीस तासांत आणखी ३१ जण कोरोनामुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.८८ टक्के एवढे आहे.

गेल्या चोवीस तासांत २७५९ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यातील ४९ नमुने बाधित आढळून आले. कोरोनामुक्त झाल्यामुळे इस्पितळातून काल एका रुग्णाला घरी पाठविण्यात आले. तसेच, कोरोनाची लक्षणे जाणवल्याने २ रुग्णांना इस्पितळात दाखल करून घेण्यात आले.