>> साबांखामंत्री नीलेश काब्राल; तूर्त खड्डे बुजवण्याचे काम सुरू
मांडवी नदीवरील अटल सेतू या तिसर्या पुलावर पडणार्या खड्ड्यांचा आयआयटी मद्रास अभ्यास करीत असून, त्यांच्या अहवालानंतर पुलावर पडणार्या खड्ड्यांचे कारण स्पष्ट होऊ शकेल, असे सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी पत्रकारांशी बोलताना काल सांगितले.
मांडवी नदीवरील अटल सेतू हा तिसरा पूल सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित येत नाही, तर गोवा राज्य साधनसुविधा आणि विकास महामंडळाच्या अखत्यारित येतो, असे काब्राल यांनी स्पष्ट केले.
आयआयटी मद्रास अटल सेतूवरील खड्ड्यांचा अभ्यास करून आवश्यक उपाययोजना सुचविणार आहे. कंत्राटदाराकडून पुलावरील खड्ड्यांची दुरुस्ती करून घेत आहे, असेही काब्राल यांनी सांगितले.
चार कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकले
चोर्ला घाट, काणकोण भागातील रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी नव्याने तातडीने निविदा जारी करून कामाला सुरुवात केली आहे; परंतु रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामात अवकाळी पावसामुळे अडथळा येत आहे. बांधकाम खात्यात योग्य प्रकारे काम न करणार्या चार कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे, असे नीलेश काब्राल यांनी सांगितले.