अग्निज्वालांमधून फुललेले काव्यपुष्प

0
781

– डॉ. सोमनाथ कोमरपंत

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्मरण करताना प्रथमतः उभे राहते ते आपल्या राष्ट्रासाठी त्यांनी वाहिलेले समग्र जीवन. समर्पणशीलतेचा मानबिंदू म्हणूनच त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचा विचार करावा लागतो. त्यांच्या कृतीशील जीवनाला अनेक मिती होत्या. या मितींमुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला भव्यता, उदात्तता आणि मांगल्य प्राप्त झाले होते.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्मरण करताना प्रथमतः उभे राहते ते आपल्या राष्ट्रासाठी त्यांनी वाहिलेले समग्र जीवन. समर्पणशीलतेचा मानबिंदू म्हणूनच त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचा विचार करावा लागतो. त्यांच्या कृतीशील जीवनाला अनेक मिती होत्या. या मितींमुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला भव्यता, उदात्तता आणि मांगल्य प्राप्त झाले होते. भारतीय जीवनसंचितातील प्रज्ञा आणि प्रतिभा यांचे स्फुरण त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून प्रकट झाले. देश-काल-परिस्थितीच्या मुशीतून त्यांच्या पिंडधर्माची जडणघडण झाली. हा सारा हविर्भाग त्यांना आपल्या मातृभूमीसाठी समर्पित करावा अशी अंतःप्रेरणा संवेदनक्षम वयातच झाली. या राष्ट्राच्या इतिहासातील अशा महापुरुषांचा आदर्श त्यांच्या डोळ्यांसमोर होता. स्वातंत्र्यप्राप्ती हे त्यांच्या जीविताचे ध्येय होते. या राष्ट्राच्या इतिहासावर आणि भूगोलावर त्यांचे निस्सीम प्रेम होते. पण स्वातंत्र्य म्हणजे केवळ भूमीला, झाडांना, जलाशयांना आणि पर्वतांना मिळालेले स्वातंत्र्य नव्हे. या देशातील प्रत्येक मनुष्यमात्राचे मूलभूत स्वातंत्र्य त्यांना अभिप्रेत होते. या आत्मिक स्वातंत्र्याचा उद्घोष त्यांनी प्राणपणाने आपल्या विदग्ध वाणीतून आणि लेखणीतून केला. द्रष्टेपणाने काही स्वप्ने पाहिलीत. उज्ज्वल भूतकाळाची संस्मरणे जागवली. महापुरुषांची गौरवगाथा रंगविली. अम्लान स्वरूपाचे ‘स्वतंत्रतेचे स्तोत्र’ रचले; पण तेवढ्यावरच ते थांबले नाहीत. कृतिशील मनाने त्यांनी स्वतंत्रतेचा ध्यास घेतला. त्यासाठी प्राणार्पणाची सिद्धता ठेवली. त्यामुळे त्यांच्या शब्दाशब्दांना मंत्रशक्तीचे अधिष्ठान प्राप्त झाले. बद्धता आणि मुक्ती यांच्यातील अंतर्विरोधातून त्यांच्या युयुत्सू व्यक्तिमत्त्वाला आकार प्राप्त झाला. या वैनतेयाची अभंग जीवननिष्ठा त्यांच्या कवितेतून तंतोतंत उतरलेली आहे. तोच त्यांच्या कवितेचा आत्मस्वर होय. परदास्यात खितपत पडलेल्या मातृभूमीची ललाटरेषा खुलावी हाच त्यांच्या जीवनाचा अट्टहास होता.

आम्ही वैकुंठवासी| आलो याचि कारणासी|
बोलिले जे ऋषी| साच भावे वर्ताया॥

या संत तुकारामांच्या जाज्वल्य मनोवृत्तीने स्वातंत्र्यवीर सावरकर जगले. किड्यामुंग्यांचे यःकश्‍चित जिणे त्यांनी निश्‍चयपूर्वक नाकारले. श्रेयसासाठी प्रेयसाचा त्याग करणे म्हणजे यज्ञ. सावरकरांनी आयुष्यभर यज्ञ केला. एवढे ते तदात्म झाले की स्वतःच ते समिधा बनले. त्यांची स्फूर्तिदायी जीवनगाथा हा ध्यासपंथी जनांचा वेदमंत्र झाला. कविता प्राणांतून उमलते असे म्हणतात. सावरकरांच्या शतकापूर्वीच्या कवितांचे आज पुनरावलोकन करताना ही फुले आजही अम्लान राहिली आहेत याचा मनोमन प्रत्यय येतो.
स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज आपल्या ‘प्रॉमिथिअस’ या लेखात म्हणतात ः
‘‘तिळभांडेश्‍वराच्या प्रांगणात त्यांनी सर्वसंहारक क्रांतीचा असा एक प्रचंड जाळ उठवला की, त्याच्या नजरफोड तेजाकडे, सर्व महाराष्ट्र नव्हे, सर्व भारतही केवळ नव्हे, तर सूर्याला मावळू न देणारे सारे ब्रिटिशी साम्राज्य स्तिमित होऊन काही काळ पाहत राहिले.’’ पुढे ते असेही म्हणतात, ‘‘स्वर्गलोकातील अग्नी माणसासाठी पृथ्वीवर आणणारा ग्रीक पुराणातील प्रॉमिथिअस. त्या साहसाबद्दल शासन म्हणून एक प्रचंड वैराण पहाडाला साखळदंडांनी बांधलेला. हिंस्त्र पक्ष्यांच्या कठोर चोचींनी जखमी होत असलेला एकटा.’’(‘वाटेवरच्या सावल्या’)
या प्रतीकात्म आशयामधून कुसुमाग्रजांनी सावरकरांच्या मनःपिंडाची जातकुळी नेमक्या शब्दांत टिपलेली आहे. सावरकरांचा हा मनःपिंड घडला कसा याविषयी आपल्या मनात कुतूहल जागे होते. ज्ञात इतिहासातून काही धागेदोरे उलगडले जातात. बालपणापासूनच सावरकरांना वाचनाचा छंद जडलेला होता. ‘निबंधमाला’, ‘केसरी’तील अग्रलेख व ‘काळ’कर्ते शि.म.परांजपे यांचे निबंधलेखन यांच्या वाचनामुळे त्यांच्या मनाची जडणघडण झाली. इटलीचे स्वातंत्र्यसेनानी जोसेफ मॅझिनी यांच्या जीवनचरित्राची मोहिनी त्यांच्यावर होती. त्यांनी प्राप्त केलेले ज्ञान, अमोघ वक्तृत्व आणि असमान्य बुद्धिमत्ता या गुणांचा येथे आवर्जून उल्लेख करायला हवा. तिळभांडेश्‍वराच्या बोळातील माडीवर मित्रमेळ्याच्या सभासदांच्या बैठका होत असत. येथे कवी गोविंद आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे साहचर्य घडून आले. हा एक शुभयोग होता. सावरकरांच्या सौहार्दामुळे शारीरिकदृष्ट्या पंगू असलेल्या कवी गोविंदांच्या संवेदनशील मनाला नवे पंख फुटलेले होते. कवी गोविदांनी ‘अभिनव भारता’साठी रचलेली गीते हा क्रांतिकारकांसाठी स्फूर्तिदायक ठेवा होता. अशा भावमंत्रित वातावरणात वि.दा. सावरकरांची प्रतिभा फुलत होती. बहरत होती. या बौद्धिक विकासाबरोबरच शरीरसंवर्धनाकडे सावरकरांनी लक्ष पुरविले होते. मल्लखांब, कुस्ती, पोहणे, घोड्यावर बसणे, बंदूक व तलवार चालविणे या सर्वांत त्यांनी गती प्राप्त केली होती.
देशभक्तिपर कवने ते कोवळ्या तरुण वयातच करीत होते. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन कॉलेजमध्ये झाले. लोकमान्यांनी स्वदेशीची चळवळ सुरू केली होती. विलायती कपड्यांची होळी त्यावेळी करण्यात आली होती. या चळवळीत सावरकरांनी हिरिरीने भाग घेतला. त्यांना शिक्षा झाली. चाफेकर बंधूंच्या आत्मसमर्पणाचा त्यांच्या संवेदनशील मनावर खोल परिणाम झाला. इंग्लंडमधील उच्च शिक्षणाच्या चार वर्षांच्या कालावधीत त्यांनी बॉंब बनविण्याची विद्या संपादन केली होती. त्यांच्या या क्रांतिकार्याचा सुगावा ब्रिटिश सरकारला लागला. त्याने सावरकरांवर खटला चालविला. खटल्याचा निकाल लागला. जन्मठेपेची शिक्षा म्हणून त्यांना अंदमानात रवाना करण्यात आले. सावरकरांना विजनवासात दिवस कंठावे लागले. त्यांचा अनन्वित छळ करण्यात आला. पण अभंग जिद्दीने त्यांनी प्रतिकूलतेशी सामना केला. त्या काळातील त्यांच्या मनोधैर्याचे प्रतिबिंब त्यांच्या कवितांत पडलेले दिसून येते. अंदमानात १९११पासून १९२१पर्यंत त्यांना सश्रम कारावास भोगावा लागला. पुढे त्यांना रत्नागिरीस १३ वर्षे स्थानबद्ध करण्यात आले. या खडतर परिस्थितीतही त्यांनी आपली प्रतिभा कोमेजू दिली नाही. त्यांना कागद वापरण्यास मनाई करण्यात आली. त्यावेळी त्यांनी भिंतीवर खिळ्याने कविता कोरल्या. त्यांच्या आंतरिक निष्ठेचे फलित आणि चिंतनाचे मधुर नवनीत त्यांच्या देशभक्तिपर व आत्मपर कवितेत अनुभवायला मिळते. अंदमानात हालअपेष्टा सहन करतानादेखील त्यांनी आपले चित्त विचलित होऊ दिले नाही. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची धारणा निराळ्या प्रकारची होती हे ‘जगन्नाथाचा रथोत्सव’, ‘सूत्रधारास’ आणि ‘अज्ञेयाचे रुद्धद्वार’ या कवितांमधून दिसून येते. या कविता भक्तिभाव, श्रद्धा आणि दृढनिर्धार यांतून निर्माण झाल्या आहेत.
‘जगन्नाथाचा रथोत्सव’ या त्यांच्या कवितेत उत्तुंग कल्पनाशक्तीचा विलास आहे. विश्‍वनियंता जगन्नाथ गतीचे अश्‍व जुंपलेल्या दिशारूपी क्षितिजांच्या रथात बसून कालाच्या अतूट उतरणीवरून कुठे जात आहे याविषयी वाटणारे कुतूहल व्यक्त केले आहे. कवी उद्गारतो ः
दिक्‌क्षितिजांचा दैदीप्य रथ तुझा सुटतां
ह्या कालपथाच्या अतुट उतरणीवरती
नक्षत्रकणांचा उठे धुराळा परता
युगक्रोश दूरी | मागुती | युगक्रोश दूरी
महाराज, अपुली कथा ना कुठे निघे स्वारी?

सूर्यशतांच्या कितीतरी मशाली जळतात. मधूनच शतावधी चंद्रज्योती उडतात. धूमकेतूचे सरसरत बाण सुटतात असे वर्णन कवीने केले आहे. चंद्रज्योती या शब्दप्रयोगात त्याने श्लेष साधलेला आहे. दारुकामातील ज्योती हा एक अर्थ. दुसरा अर्थ सूर्यमालेतील विझून जाणारे चंद्र.
कवी शेवटी उद्गारतो ः वरवर पाहताना घोड्याच्या स्वेच्छेने भासणार्‍या वेगात मालकाच्या इच्छेनुसार हलणारा लगाम असतो, त्याप्रमाणे भूतमात्रांच्या, वस्तुजाताच्या वेगात ईश्‍वरेच्छाचा दोरा ओवलेला असतो. कविमनातील हे कुतूहल कायम राहिलेले आहे.

खेळत हा अतली | रथोत्सव | खेळत हा अतली
महाराज, आपुली कथा न कुठे निघे स्वारी|

‘सूत्रधारास’ ही कविता संवादरूपाने साकार झालेली कविता. ती अतिशय प्रभावी आहे. परमेश्‍वराच्या शक्तीचे स्वरूप या कवितेत उलगडून दाखविले आहे.

इतुके नचि परि विचित्र वाटीमधून त्या सजला
सूत्रधारचि स्वयें उपजता आम्ही पाहियला

अशी अनुभूती या कवितेत प्रकट झाली आहे. ‘‘तुझ्या जये या रंगभूमिचा रंग पाहियेला!’’ अशी प्रचितीही त्याला आलेली आहे. ‘अज्ञेयाचे रूद्धद्वार’मध्ये ः

ज्या घरापासूनी मार्ग सर्व फुटणारे
येणार घरासी मार्ग त्याचि ते सारे

परमेश्‍वराच्या अमर्याद सत्तेची महत्ता येथे अधोरेखित करण्यात आली आहे.
चाललो युगांच्या क्रोशशिला गणिता रे
तो पथा- अति घर एक तुझे ते सारे

मी जात मिसळुनी त्यात त्या पथें जो रे
अंतासी उभे घर तेचि तुझें ते घर रे

चढ उतार घेता उंचनिंच वळणारे
अजि मार्ग तोहि ये त्याचि घरासी परि रे

मी म्हणुनी अणूंच्या बोगबोगद्यांतुनि रे
हिंडुनी बघे घर अंति तुझे सामोरे

या ओळींतून हा आशय अधिकाअधिक समृद्ध होत जातो. सावरकरांच्या चिंतनशीलतेचे प्रगल्भ रूप या कवितेत पहावयास मिळते.
अंदमानाच्या तुरुंगात असताना सावरकरांची तब्येत अत्यंत बिघडलेली होती. मृत्यूची छाया दाटलेली मृत्युंजयी धडक आढळते. त्यांची जीवनेच्छा लोप पावली नाही. या अजेय वृत्तीचे प्रतिबिंब पुढील ओळींत दिसून येते ः

भ्यावें ते कां म्हणूनी तुजसी परि मी?
माझ्या पेल्यात किती पीत राहिलों

आपले आजवरचे जीवितकार्य आपण कोणत्या ध्यासाने पार पाडले याविषयीचा आत्मसंवाद करताना सावरकर उद्गारतात ः

तडजोड करूनी परी फेडली ऋणें
जन्मार्जित जी जी ती; ऋषिऋणाप्रती
श्रुतिजननीचरणतीर्थ सेवूनी कधी
धरुनी कधी ध्रुवपदांनी संत-ततीच्या
आणी ही आचरूनी एक तप अशी
आशेच्या या स्मशानांभूत तपस्या
देवऋणा, फुंकुनि रणशृंग, दुंदुभी
धडड धडड पिटुनि आणि तो अघाडिचा

आत्मनिष्ठ भावनेचे उत्कट अंतःसूर या कवितेत उमटलेले आहेत. या दीर्घकवितेतील तपशील अंतःकरणाला पाझर फोडणारे आहेत.
‘सांत्वन’, ‘माझे मृत्युपत्र’, ‘प्रभाकरास’, ‘तारकांस’ आणि ‘सागरास’ या तुरुंगवासातच लिहिलेल्या कविता आहेत. स्वानुभूतीच्या या कविता आहेत. त्यांचे आवाहन व्यापकपणे रसिकमनाला स्पर्श करणारे आहे. सहृदयतेने पुनःपुन्हा या कवितांचा आस्वाद घ्यावा. मनातील निराशेचा तवंग नाहीसा करावा आणि चैतन्यशील वृत्तीने नव्या जीवनाचा प्रारंभ करावा अशा या कविता आहेत. आत्मशक्तीचे यज्ञकुंड या कवीने आपल्या तेजोमय अग्निशलाकांनी येथे प्रज्वलित केले आहे. विजनवासाच्या अस्वस्थतेच्या काळात आपल्या सृजनशीलतेच्या ऊर्मी या मुक्ताम्याने कशा अबाधित ठेवल्या हे जाणून घेणे उद्बोधक ठरेल.
१९०९च्या जून महिन्यात सावरकरांचे बंधू गणेशपंत यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. त्यानंतर लगोलग धाकटे बंधू बाळ यांनाही अटक झाली. यासंबंधी गणेशपंतांची पत्नी यशोदाबाई यांनी वि.दा. सावरकराना विलायतेस कळविले. भावजयीचे मनोधैर्य खचून जाऊ नये म्हणून त्यांनी ‘सांत्वन’ या कवितेतून जे उत्तर पाठविले ते त्यांच्या धीरोदात्त वृत्तीवर प्रकाश टाकणारे आहे. ते उद्गारतात ः

अनेक फुले फुलती | फुलोनिया सुकोन जाती
कोणी त्यांची महती गणती | ठेविली असे?
परी जें गजेंद्रशुंडेने उपटिलें| श्रीहरिसाठी मेलें
कमलफूल तें अमर ठेलें| मोक्षदातें पावन

‘माझे मृत्युपत्र’ या कवितेतही सावरकरांच्या आंतरिक निष्ठांचे उत्कट दर्शन घडते. संवेदनक्षम वयात तरुण सहकार्‍यांच्या सहाय्याने राष्ट्रासाठी आत्मार्पण करायला सिद्ध झालेल्या धुंद क्षणांची संस्मरणे या कवितेत आहेत.

विश्‍वाचिया अखिल मंगल धारणाला
बोला असे कवण भक्ष्य हुताशनाला

या आवाहनाला अंतःप्रेरणेने प्रतिसाद देण्याचे त्यांच्या जीवनातील ते मंतरलेले क्षण होते. मातृविमोचनासाठी कटिबद्ध झालेल्या सुपुत्राच्या हृदयातील अभंग आवेश या कवितेत प्रकट झालेला आहे.
‘‘तुझ्या यज्ञकुंडावर प्रिय बाळ बळी ठरला. तुझ्या स्थंडिलावर मी माझा देह ठेवत आहे. एवढेच नव्हे तर आम्ही सात बंधू असतो तरी आम्ही याच बलीवेदीवर बळी जाण्यास सिद्ध झालो असतो. हे दिव्यदाहक वेड आपण बुद्ध्याच स्वीकारलेले आहे. हे सतीचे वाण आहे याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे.’’ अशा आशयाचा दृढनिर्धार सावरकरांनी व्यक्त केला आहे.
मार्सेलिस बंदरातून सावरकरांनी बोटीवरून निसटण्याचा प्रयत्न केला. त्यांची ती उडी इतिहासात गाजली. त्यानंतर आपला अमानुष छळ होणार या जाणिवेतून स्वतःचे मनोधैर्य वाढविण्यासाठी त्यांनी ‘आत्मबल’ ही ओजस्वी कविता लिहिली. मनस्वी आणि कृतिशील पुरुषाचे दर्शन या कवितेत घडते. त्यांच्या उत्कट ध्यासातून स्फुरलेल्या या कवितेत प्रज्ञा आणि प्रतिभा यांचा अपूर्व संगम आढळतो.

अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला|
मारिल रिपु जगति असा कवण जन्मला

पुढे ते असेही उद्गारतात ः

अग्नि जाळी मजसी ना खड्‌ग छेदितो
भिऊनि मला भ्याड मृत्यू पळत सुटतो

पाशवी सत्तेला उद्देशून सावरकर शेवटी उद्गारतात ः

आण तुझ्या तोफांना क्रूर सैन्य ते
यंत्र तंत्र शस्त्र अस्त्र आग ओकते
हलाऽ हलाऽ | त्रिनेत्र तो
मी तुम्हांसि तैसाची गिळूनि जिरवितो

कवीच्या निर्भय वृत्तीचे दर्शन येथे घडते. ‘मूर्ती दुजी ती’ मध्येही त्यांचे मनोबलदर्शन उत्कट शब्दांत घडते. त्यांच्या जीवनचिंतनाचा परिपाक या दीर्घकवितेत आहे.
भोवताली कडक थंडी… कोठडीच्या भिंतीही दगडी… फरशी दगडी… सर्वत्र गारवा… अंथरूण नाही… पुरेसे पांघरुण नाही… दिवसरात्र पाय आपटावे … हात चोळावे… पंधरा-वीस पावलांच्या अवकाशात भरभर् पावले टाकावीत, तेव्हा कुठे गारठलेल्या देहात किंचित उष्णता निर्माण व्हावी. अशा या भीषण अवस्थेत सावरकरांनी आपला मनोनिग्रह टिकविण्यासाठी ही कविता लिहिली… आत्माभिव्यक्तीची सारी शक्ती एकवटून ही कविता त्यांनी लिहिली आहे. हिमनगाच्या अधःस्तराखालील वेदनांचा कल्लोळ या कवितेत व्यापून राहिला आहे.

लोखंडी जबडा वांसूनि आपला
कर्तव्य प्रकट आज| मज चिरावया
दातांच्या कवळ्यांच्या करवतील दो|
दगडाहुनि निर्दय हे हृदय तयाचे
वेषही न बर्बरता झांकी अशी ही
त्याच्या अजि नंगी तरवार तनूची|
आणि बाप रे| थंडी ही भयंकरा|
निर्दयतेहुनि थंड थंड| गोठले
नदनदीत पाणी या आणि शरीरीं
रक्तपिंड पिंड अहो जात शिजोनी|

या तपशिलातून सावरकरांना भोगाव्या लागलेल्या यातनांचे चित्र दिसून येते. याच सद्रुचिसंपन्न मनाने केलेला आत्मसंवादही तितकाच त्यांची उभारी दर्शविणारा आहे.

सूर ललित ना| रुणुझुणु ताल तोल ना!
आवडते ज्याचे आघात कोवळे
हृदयकुंजि नाचविती गोड गुदगुल्या
मंजु गीतगोविंदांतील छंद ते
अबलांच्या अबल हृदा अधिक अबल जे
करिती जे बिल्हणीय करूण छंद वा
परि, कविते, भेरीचे सूर ते दुजे
छेड आजि, अबलांच्या अबल हृदांनी
करिते ते प्रबल प्रलयोर्मि सिंधुसे|

सावरकरांच्या कवितेत ज्याप्रमाणे त्यांचा वज्रनिर्धार व्यक्त झालेला आहे; त्याचप्रमाणे कुसुमकोमल भावनाही व्यक्त झालेल्या आहेत त्यांच्या प्रतिभेचे सरसरमणीय रूप ‘तारकांस पाहून’ या कवितेत पाहावयास मिळते. मुंबई सोडून बॅरिस्टर होण्यासाठी १९०६ साली ते विलायतेस जायला निघाले. समुद्रप्रवास करीत असताना कित्येक दिवस खाली समुद्र आणि वरती आकाश यापलीकडे दुसरे काही दिसत नव्हते. त्यावेळचे वर्णन त्यांनी केले आहे ः

सुनील नभ हें, सुंदर नभ हें, नभ हें अतल अहा
सुनील सागर, सुंदर सागर, सागर अतलचि हा

नक्षत्रांही तारांकित हें नभ चमचम हांसे
प्रतिबिंबाही तसा सागरही तारांकित भासे
नुमजे लागे कुठें नभ कुठें जलसीमा होई
नभात जल तें, जलांत नभ तें संगमुनी जाई
खरा कोणता सागर यातुनि, वरती की खाली
खरें तसें आकाश कोणतें, गुंग मती झाली

‘प्रभाकरास’ ही कविता करूणरसाने ओथंबलेली आहे. या विलापिकेत पुत्रनिधनाने व्यथित झालेल्या प्रेमळ परंतु धीरोदात्त पित्याच्या भावना प्रकट झालेल्या आहेत. तो शोक करीत नाही. संयमाने अश्रू आवरतो. ‘तनुवेल’मधील कोमल भाव अधोरेखित करण्यासारखा आहे.
वि.दा.सावरकर यांची आत्मनिष्ठ कविता जितकी उत्कट; तितकीच राष्ट्रीय भावना व्यक्त करणारी कविता ओजस्वी आहे. त्यांच्या जाज्वल्य निष्ठेचे प्रांजळ रूप या कवितेत पहावयास मिळते. ही कविता चैतन्याने रसरसलेली आहे. या कवितेत पराक्रमाची पूजा आहे. भीरुतेविषयी आत्यंतिक चीड आहे. स्वत्वरक्षण हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय. त्यांच्या विजिगीषू वृत्तीचे प्रतिबिंब या कवितांत आहे.
तुजसाठि मरण ते जनन
तुजविण जनन ते मरण
तुज सकल चराचर शरण
सूत्रमयतेतून अंतःकरणातील गहिरेपणा प्रकट करणारी सावरकरांची सैली अनोखे सामर्थ्य दर्शविणारी आहे. त्यांचे काव्य विशेष जसे त्यांच्या स्फुट कवितेत आहेत; तसेच ते ‘गोमान्तक’, ‘कमला’, ‘सप्तर्षी’ आणि ‘विरहोच्छ्‌वास’ या दीर्घ स्वरूपाच्या काव्यात आहेत.
वि.दा. सावरकरांच्या कवितेचा तलम पोत आणि कळिकाळाला आव्हान देणारा लखलखत्या सौदामिनीसारखा वाणीचा प्रवाह सूक्ष्मपणे अभ्यासणे हा आनंदानुभव आहे. या आनंदाला नकळत चैतन्याची जोड मिळते हा अंतर्मुखतेचाही प्रवास आहे.
अशी महाकवीची प्रतिभा आणि असे क्रान्तदर्शित्व असलेला प्रज्ञावंत या भरतभूमीत होऊन गेला याबद्दल अभिमान वाटतो. या वैनतयासमोर हात जुळले जातात. सावरकरांची समग्र कविता ही ‘वैनतेया’ची कविता आहे. हे अम्लान पुष्प मराठी कवितेच्या फुलबागेत अक्षय आनंद देणारे आहे. प्रेरणा देणारे आहे.