केरये – खांडेपार येथे फुटलेल्या ९०० मिमी जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम काल सकाळी पूर्ण झाल्यानंतर दुपारपासून जलवाहिनीतून कमी दाबाने पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. ओपा येथील पाणी प्रकल्पातून पणजीत पाणी पोहोचण्यासाठी सात-आठ तासांचा कालावधी लागला. काल रात्री ९ वाजता आल्तिनोे, पणजी येथील पाण्याच्या टाकीला पाण्याचा पुरवठा होण्यास प्रारंभ झाला. त्यामुळे पणजी परिसरातील नागरिकांना गुरूवारी पहाटेपासून पाण्याचा पुरवठा होणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्यांनी दिली.
ओपा पाणी प्रकल्पातून बुधवारी सकाळी सुरुवातीला दुरुस्त केलेल्या जलवाहिनीमध्ये १ राऊंड पाणी सोडण्यात आले. त्यानंतर हळूहळू पाण्याचे राऊंड वाढविण्यात येत होते. जलवाहिनीच्या दुरुस्तीनंतर पाण्याचा दाब कमी ठेवण्यात आला आहे. त्यामुळे मध्यरात्री आल्तिनो, पणजी येथील पाण्याच्या टाकीला पाणीपुरवठा होणार आहे. ही पाण्याची टाकी भरण्यासाठी किमान तीन तास लागणार आहे.
केरये, खांडेपार येथे फुटलेल्या दोन जलवाहिन्यांपैकी ९०० मिमी जलवाहिनीच्या दुरुस्तीला तब्बल सात दिवसांचा कालावधी लागला. गेल्या १५ ऑगस्ट रोजी सकाळी राष्ट्रीय महामार्गाची संरक्षक भिंत कोसळल्याने तिसवाडी आणि फोंडा तालुक्यातील काही भागांना पाण्याचा पुरवठा करणार्या दोन प्रमुख जलवाहिन्या फुटल्या होत्या. त्यामुळे तिसवाडी व फोंडा तालुक्यातील काही भागात पाण्याची समस्या निर्माण झालेली आहे. सलग सातव्या दिवशी या भागातील नळ कोरडे होते. नागरिकांना केवळ टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. टँकरद्वारे होणारा पाण्याचा पुरवठा योग्य नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
६५% लोकांची
टँकर मागणी पूर्ण
सांतइनेज, पणजी येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणीपुरवठा विभागाकडे टँकरद्वारे पाणी पुरवठ्यासाठी नोंदणी केलेल्या साधारण ६५ टक्के नागरिकांना पाण्याचा पुरवठा करण्यात यश प्राप्त झाले आहे. पाणीपुरवठा विभागाकडून २० ऑगस्टपर्यंतची आकडेवारी प्राप्त झाली आहे. टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ६८५ जणांनी नोंदणी केली होती. त्यातील ४४० नागरिकांना पाण्याचा पुरवठा करण्यात यश प्राप्त झाले आहे.
दुसर्या जलवाहिनीच्या दुरुस्ती कामाला प्रारंभ
केरये – खांडेपार येथे फुटलेल्या ७५० मिमी या दुसर्या जलवाहिनीच्या दुरुस्ती कामाला बुधवारपासून सुरुवात करण्यात आली. या जलवाहिनीच्या दुरुस्ती कामासाठी तीन ते चार दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता असल्याने कुंभारजुवा, माशेल, बाणस्तारी आदी भागातील नागरिकांना पाण्याच्या टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. ९०० मिमी या मुख्य जलवाहिनीतून माशेल, कुंभारजुवा या भागात पाण्याचा पुरवठा करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे, असे बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांनी सांगितले. ज्या भागात नळाद्वारे पाण्याचा पुरवठा होणार नाही, त्याठिकाणी टँकरच्या माध्यमातून पाण्याचा पुरवठा केला जाणार आहे, असेही मंत्री पाऊसकर यांनी सांगितले.