मुख्यमंत्र्यांसह दहाजणांना मंत्रीपदाची शपथ
गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची माळ काल शेवटी भाजपचे एक ज्येष्ठ नेते व मावळते आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या गळ्यात पडली. काल संध्याकाळी ४ वा. राजभवनवर झालेल्या एका सोहळ्यात त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी अन्य नऊ जणांचेही मंत्री म्हणून शपथग्रहण झाले. त्यात फ्रान्सिस डिसोझा, सुदिन ढवळीकर, दयानंद मांद्रेकर, रमेश तवडकर, महादेव नाईक, दिलीप परुळेकर, मिलिंद नाईक, दीपक ढवळीकर व एलिना साल्ढाणा यांचा समावेश होता.आठ जणांनी घेतली मराठीतून शपथ
फ्रान्सिस डिसोझा यांनी कोकणीतून, एलिना साल्ढाणा यांनी इंग्रजीतून शपथ घेतली. अन्य आठ जणांनी मराठीतून शपथ घेतली. राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी या सर्वांना मंत्री म्हणून शपथ दिली. पुढील आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार असून त्यावेळी आणखी दोघाजणांचे मंत्री म्हणून शपथग्रहण होणार आहे. आवेर्तान फुर्तादो हे एक सोडल्यास मनोहर पर्रीकर यांच्या मंत्रिमंडळातील अन्य सर्व मंत्र्यांचे काल पुन्हा मंत्री म्हणून शपथग्रहण झाले.
मंत्रिमंडळ विस्तार पुढील आठवड्यात
पुढील आठवड्यात आवेर्तान फुर्तादो व अन्य एका आमदाराचा मंत्री म्हणून शपथविधी होणार आहे. केंद्रीय मंत्री म्हणून पदभार स्वीकारण्यासाठी मनोहर पर्रीकर यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर लक्ष्मीकांत पार्सेकर हे मुख्यमंत्री बनल्याने एक मंत्रीपद रिक्त झालेले आहे. त्या जागी आता एका आमदाराची मंत्री म्हणून निवड होणार आहे. बारा जणांचे मंत्रिमंडळ करण्याची मर्यादा गोव्यावर असून मुख्यमंत्र्यासह काल १० जणांचे मंत्रिमंडळ स्थापन झाले आहे. फ्रान्सिस डिसोझा यांची मुख्यमंत्रीपदी निवड न झाल्याने दुखावल्या गेलेल्या ख्रिस्ती समाजाला खूष करण्यासाठी ख्रिस्ती समाजातील एका आमदाराला मंत्री बनवले जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
काल राजभवनवर झालेल्या शपथविधी सोहळ्याला मावळते मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, सभापती राजेंद्र आर्लेकर, विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे, कॉंग्रेसचे आमदार मॉविन गुदिन्हो व भाजपचे सर्व आमदार तसेच भाजपाध्यक्ष विनय तेंडुलकर आदी उपस्थित होते. कॉंग्रेसच्या बहुतेक आमदारांनी मात्र शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार घातला होता. भाजपचे निरीक्षक राजीव प्रताप रुडी, येडियुरप्पा, रुपाला हे नेतेही यावेळी हजर होते. राजभवन बाहेर उभारण्यात आलेल्या शामियान्यात हा सोहळा पार पडला. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या पत्नी, कन्या, पुत्र जवळचे नातेवाईक, मांद्रे मतदारसंघातील कार्यकर्ते तसेच पक्षाचे अन्य कार्यकर्ते व हितचिंतक हे यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, राज्याच्या नव्या मुख्यमंत्रीपदासाठी काल शेवटपर्यंत चुरस निर्माण झाली होती. लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या नावाला खरे म्हणजे शुक्रवारीच नवी दिल्लीतून मान्यता मिळाली होती. मात्र, शर्यतीतील दुसरे एक उमेदवार राजेंद्र आर्लेकर व फ्रान्सिस डिसोझा यांनी शेवटच्या क्षणापर्यंत आपले प्रयत्न चालूच ठेवले होते. फ्रान्सिस डिसोझा यांनी तर शुक्रवारी आपणही मुख्यमंत्री पदासाठीच्या शर्यतीत असून आपली निवड न झाल्यास आपण नव्या मंत्रिमंडळात राहणार नसल्याचा उघड पवित्रा घेतला होता. या पार्श्वभूमीवर काल शपथग्रहण सोहळ्यापर्यंत अधिकृतपणे नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली नव्हती. काल सकाळी १२ वा. भाजपच्या विधीमंडळ पक्षाची बैठक भाजपच्या पणजी कार्यालयात सुरू झाली. तर पक्षाचे निरीक्षक राजीव प्रताप रुडी व येडियुरप्पा यांचे दुपारी २ च्या दरम्यान तेथे आगमन झाले. त्यांनी यावेळी भाजपच्या सर्व मंत्री-आमदारांचे म्हणणे ऐकून घेतले. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दुपारी १२.३० च्या दरम्यान मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. दुपारी १ वाजल्यापासून लक्ष्मीकांत पार्सेकर यांचे नाव नवे मुख्यमंत्री म्हणून निश्चित झाल्याची जोरदार चर्चा ऐकू येत होती. मात्र, त्याबाबत अधिकृतपणे सांगण्यास कोणीही नेता तयार नव्हता. शेवटी ४ वा. राजभवनवर शपथग्रहण सोहळा पार पडला व गेल्या तीन दिवसांपासून राज्यात चालू असलेल्या राजकीय नाट्यावर एकदाचा पडदा पडला.
मंत्रीमंडळ असे –
लक्ष्मीकांत पार्सेकर – मुख्यमंत्री
फ्रान्सिस डिसोझा
सुदिन ढवळीकर
दयानंद मांद्रेकर
रमेश तवडकर
महादेव नाईक
दिलीप परुळेकर
मिलिंद नाईक
दीपक ढवळीकर
एलिना साल्ढाणा