अखेर पूनम पांडेला व्हिडिओप्रकरणी अटक

0
273

>> निरीक्षकासह दोन पोलीस निलंबित

>> काणकोणात बंद शांततेत

जलस्त्रोत खात्याच्या मालकीच्या चापोली धरणावर दिवसाढवळ्या अश्‍लिल व्हिडीओ काढल्याप्रकरणी प्रमुख संशयित आरोपी अभिनेत्री पूनम पांडे हिला तिचा मित्र सनी बॉम्बे याच्यासह अटक करण्यात आली. तसेच या प्रकरणी काणकोणचे पोलीस निरीक्षक तुकाराम चव्हाण यांच्यासह दोन पोलिसांनाही सरकारने निलंबित केले आहे. यावेळी तेहरान डिसोझा यांची काणकोणच्या पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करतानाच त्यांच्याच नेतृत्वाखाली या संपूर्ण प्रकरणाची तपासणी होणार असल्याचे दक्षिण गोवा पोलीस उपअधीक्षक नेल्सन आल्बुकर्क यांनी सांगितले.

स्वंयस्फूर्तीने काणकोण बंद
काणकोण तालुक्यातील निसर्गरम्यस्थळी परप्रांतातील एक अभिनेत्री अश्‍लिल व्हिडिओचे चित्रिकरण करते. त्याचे समाजमाध्यमावर प्रदर्शन केल्यानंतर ज्या व्यक्तींच्या सहकार्याने हे दुष्कृत्य झालेले आहे त्यांना सजा होण्याची मागणी करीत काणकोणच्या जागृत नागरिकांनी बुधवारी काणकोण बंदचे आवाहन केले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पोलीस निलंबनाचा व पूनम पांडे हिला अटक केल्याचा मुख्यमंत्र्यांचा आदेश उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांनी व्यापार्‍यांना ऐकविल्यानंतर सम्राट भगत, संदेश तेलेकर यांनी व्यापार्‍यांना फोन करून दुकाने सुरू करण्याचे आवाहन केले. काणकोणच्या जागृत नागरिकांनी काणकोण बंदची हाक दिल्यानंतर वडामळ, शेळेर, चार रस्ता चावडीवरील मासळी मार्केट बंद होते.

निलंबनाचा आदेश उपस्थित व्यापार्‍यांना ऐकवल्यानंतर दुकाने पूर्ववत सुरू झाली. यावेळी उपसभापती इजिदोर फर्नांडिस, माजी मंत्री रमेश तवडकर, काणकोणचे उपजिल्हाधिकारी सतीश प्रभू, मामलेदार विमोद दलाल उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचे काणकोणच्या जागृत नागरिकांनी स्वागत केले.

दरम्यान, या प्रकरणात संशय असलेल्या काणकोण पोलिस स्थानकावरील दोन पोलीस कॉन्सटेबल, काणकोणच्या जलस्त्रोत खात्याचे अधिकारी यांच्या बाबतीत चौकशी करत या प्रकरणी लवकरात लवकर काणकोणवासीयांना न्याय मिळवून द्यावा. या प्रकरणात सहभाग असलेल्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी काणकोण जागृत संघटनेने केली. तसेच यावेळी उपस्थित असलेले सम्राट भगत, सिद्धार्थ देसाई, रमाकांत गावकर, शांताजी गावकर, गोवा फॉरवर्डचे प्रशात नाईक, मोहनदास लोलयेकर, आम आदमी पक्षाचे संदेश तेलेकर, गोंयकार संघटनेचे जॅक फर्नांडिस, कॉंग्रेसचे जनार्दन भंडारी, भाजपचे नंदीप भगत, नगरसेवक श्यामसुंदर देसाई, गुरू कोमरपंत, हेमंत गावकर, भूषण प्रभुगावकर, सामाजिक कार्यकर्ते शिरीष पै, बबेश बोरकर, संजय कोमरपंत यांनी यापुढे चापोली धरणाजवळ कडक सुरक्षा ठेवण्याची जोरदार मागणी केली.
आपण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी या बाबतीत प्रत्यक्ष बोललो असून मुख्यमंत्र्यांनी जी भूमिका दाखविली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतानाच काणकोणवासीयांनी ही जी एकजूट दाखविली ती अशीच कायम ठेवावी असे आवाहन माजी मंत्री रमेश तवडकर यांनी यावेळी केले. तसेच शांततेने आंदोेलन केल्याबद्दल सर्वांचे अभिनदंन केले आहे. यापुढे चापोली धरणाजवळ कडक सुरक्षा ठेवली जाईल आणि यासाठी आपण जातीने लक्ष देणार असल्याचे उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांनी यावेळी स्पष्ट केले.

कडक पोलीस बंदोबस्त
काणकोण जागृत नागरिकांनी काणकोण बंदचे आवाहन केल्यानंर कायदा आणि सुरक्षेसाठी त्याचबरोबर काही विपरित घटना टाळण्यासाठी दक्षिण गोव्यातील पोलिस स्थानक आणि राखीव दलातील मिळून ५०० पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी काणकोणला तैनात करण्यात आले होते.
धरणाजवळ सुरक्षा नव्हती?
चापोली लघुधरणाचा परिसर ज्या अश्‍लिल व्हिडीओच्या चित्रिकरणासाठी वापरण्यात आला तेव्हा तिथे सुरक्षा रक्षक नसल्याचे उघड झाले आहे. काणकोण भाजप मंडळ समितीने जलस्त्रोत खात्याचे साहाय्यक अभियंते अल्लाबक्ष यांची भेट घेतली आणि खुलासा मागितला. तसेच ज्या दिवशी या व्हिडीओचे चित्रीकरण झाले त्यावेळी ज्या रिक्षाचालकाने पूनम पांडे आणि त्याच्या मित्राला धरणावर नेऊन सोडले होते त्या रिक्षाचालकाची जबानी घेण्यात येणार असून ती खूप महत्त्वाची असल्याचे श्र्‌री. आल्बुकर्क यांनी सांगितले.

विविध पक्षांचा पाठिंबा
ज्या ज्या वेळी काणकोणवासीयांवर अन्याय झाला आहे त्यावेळी कॉंगे्रस पक्ष नेहमीच लोकांबरोबर राहिलेला आहे आणि यापुढे देखील नेहमीच राहील असे कॉंग्रसचे जनार्दन भंडारी, प्रलय भगत आणि महादेव देसाई यांनी पत्रपरिषदेत सांगितले. तर गोवा फारवर्डचे प्रशांत नाईक आणि मोहनदास लोलयेकर यांनीही या सकारात्मक लढ्याबद्दल काणकोणवासीयांचे अभिनंदन करून यापुढेही आपल्या पक्षाचे सहकार्य असेल असे सांगितले.

काणकोण पोलीस या प्रकरणी तपास करीत आहेत. संशयितांनी काणकोणच्या न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला असून सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यानंतरच न्यायालयात सादर केले जाईल अशी माहिती श्री. आल्बुकर्क यांनी दिली.

पलायनापूर्वी अटक
अभिनेत्री पूनम पांडे आणि तिचा मित्र सनी बॉम्बे यांना सिकेरी कळंगुट येथील एका तारांकित हॉटेलातून अटक करून संध्याकाळी काणकोणच्या पोलिसांच्या स्वाधीन केले. अत्यंत कडक पोलीस सरंक्षणात त्या दोघांना पोलीस स्थानकावर आणले. त्यावेळी दक्षिण गोव्याचे पोलीस उपअधीक्षक नेल्सन आल्बुकर्क, पोलीस निरीक्षक रवी देसाई, दीपक पेडणेकर, तेहरान डिकॉस्टा आणि पन्नासपेक्षा अधिक महिला आणि पुरूष पोलीस तैनात करण्यात आले होते. दोघेही आज शुक्रवार दि. ६ रोजी दाबोळीहून विमानाने पलायन करण्याच्या तयारीत होते. त्याचवेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

पोलीस निलंबित
या प्रकरणी संशय असलेले काणकोणचे पोलीस निरीक्षक तुकाराम चव्हाण, यांच्यासह दोन पोलीस कर्मचारी आणि जलस्त्रोत खात्याचे दोन सुरक्षा रक्षक यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यापूर्वी एकूण ७ सुरक्षा रक्षकांना बोलावून घेऊन त्यांच्या जबान्या घेण्यात आल्या. चापोली धरणाच्या टाकीची रंगरंगोटी करणे आणि चित्रिकरणासाठी जागा उपलब्ध केली म्हणून संशय असलेल्या साहाय्यक अभियंते ़श्र्‌री. अल्लाबक्ष यांनाही निलंबित करायला हवे अशी मागणी जागृत नागरिक करत आहेत. त्या संबधी खात्यातर्ंगत चौकशी चालू आहे.