बायडन विजयापासून केवळ सहा जागा दूर

0
228

>> अमेरिकेत अजूनही मतमोजणी सुरू

अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी अजूनही सुरूच आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन विजयाच्या समीप पोहोचले आहेत. ज्यो बायडन यांना आतापर्यंत २६४ इलेक्टोरल कॉलेज मते मिळाली असून राष्ट्राध्यक्षपदावर आरुढ होण्यासाठी त्यांना केवळ सहा मतांची आवश्यकता आहे.

विद्यमान राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे सध्या २१४ इलेक्टोरल मते आहेत.असोसिएटेड प्रेसनुसार एरिझोना, मिशिगन आणि विस्कॉन्सिन या राज्यांमध्ये बायडेन यांच्या विजयाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ही तिन्ही राज्ये इलेक्टोरल व्होटसच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहेत. नेवाडामध्येही बायडन सरशी साधू शकतात, असे चित्र आहे. व्हाइट हाऊसमध्ये दाखल होण्यासाठी आवश्यक असलेली सहा मते बायडन यांना नेवाडामधून मिळू शकतात. पण आठवडाअखेरपर्यंत निकाल लागण्याची शक्यता कमी आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे सध्या २१४ इलेक्टोरल मते आहेत. पेन्सिलवेनिया, नॉर्थ कॅरोलिन आणि जॉर्जिया या राज्यांमध्ये ट्रम्प आघाडीवर आहेत. पण जॉर्जिया आणि पेन्सिलवेनियामध्ये मतांचे अंतर बायडन भरुन काढत आहेत.

दरम्यान, बुधवारी ट्रम्प यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या विजयाचा दावा केला होता, त्याचवेळी त्यांनी बायडन आणि डेमोक्रॅटसवर घोटाळ्याचा आरोप करत मतमोजणी रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशाराही दिला होता. विसकॉनसीनच्या अनेक काऊंटीमध्ये गैरप्रकार झाले असून तिथे ट्रम्प यांची टीम फेरमतमोजणीची मागणी करणार आहे.