अखेर कुस्तीपटू नरसिंगला नाडाकडून दिलासा

0
113

>> बंदी उठविल्याने रिओ ऑलिम्पिक सहभाचा मार्ग मोकळा

रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पदकाचा एक दावेदार असलेल्या कुस्तीपटू नरसिंग यादव याला अखेर डोपिंगप्रकरणी नॅशनल अँटीडोपिंग एजन्सी तथा नाडाकडून दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून हा विषय गाजत होता. मात्र काल नाडाने नरसिंगवरील बंदी उठविल्याने रिओ ऑलिम्पिकमध्ये त्याला सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

गेल्या २५ जून रोजी नरसिंग याची डोपिंग चाचणी घेण्यात आली होती. आठवडाभराच्या या नाट्यावर अखेर काल नाडाचे महासंचालक नवीन अगरवाल यांनी वरील निर्णयाद्वारे पडदा टाकला.
रिओ ऑलिम्पिक स्पर्धेआधी घेण्यात आलेल्या डोपिंग चाचणीत नरसिंग दोषी आढळला होता. तथापि या प्रकरणात त्याचा दोष नसून त्याच्या पेयात कोणीतरी बंदी घातलेले पदार्थ मिसळवल्यामुळे तो चाचणीत दोषी ठरल्याचा दावा करीत नाडाने त्याच्यावरील बंदी उठविण्याचा निर्णय जाहीर केला.
नरसिंग हा राष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो. दोन वेळच्या ऑलिम्पिक पदक विजेत्या सुशीलकुमार यांच्याविरुद्धची न्यायालयीन लढाई जिंकून नरसिंगने यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत सहभाग निश्‍चित केला होता. चाचणीत दोषी ठरल्याने बंदी घातल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्यासाठी प्रयत्न केले होते.
नवीन अगरवाल यांनी नरसिंग संदर्भातील आपला निवाडा काल जाहीर केला. ‘नाडाच्या डोपिंग विरोधी आचार संहितेच्या कालम १०-४ लाभ मिळण्यास नरसिंग पात्र ठरतो असा निष्कर्ष नाडाच्या पॅनलने काढला आहे. या पार्श्‍वभूमीवर तो एका कटाचा बळी ठरल्याचेही लक्षात घेऊन पॅनलने डोपिंग संदर्भातील त्याच्यावरील बंदी उठविण्याचा निर्णय घेतला आहे’ असे अगरवाल म्हणाले.

हा सत्याचा जय : नरसिंग
नाडाच्या निवाड्यामुळे आनंदित झालेल्या नरसिंगने आपण रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी होऊन देशासाठी पदक आणण्यासाठी आतूर असल्याची प्रतिक्रिया त्याने व्यक्त केली. निवाड्यामुळे आपण अत्यंत समाधानी झाल्याचे तो म्हणाला. आपली बाजू योग्य असल्याची जाणीव असल्याने आपल्याला योग्य न्याय मिळेल अशी आशा आपल्याला होती असे त्याने सांगितले.
या पार्श्‍वभूमीवर भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिज भूषण सिंग यानी सांगितले की नरसिंगला भारतीय ऑलिम्पिक चमूत सहभागी करून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ७४ किलो वजन गटात नरसिंगच्या ऐवजी परवीन राणा याचे नाव वरील प्रकरण उद्भवल्यानंतर समाविष्ट करण्यात आले होते.