महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज रत्नागिरीच्या न्यायालयाने काल दुपारी फेटाळल्यानंतर त्यांना संगमेश्वर पोलिसांनी नाशिक, पुणे आदी ठिकाणच्या विविध अटक वॉरंटच्या आधारे ताब्यात घेतले. राणे यांचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासंबंधीचे विधान, त्याविरुद्ध शिवसैनिकांत उमटलेली संतप्त प्रतिक्रिया आणि राणेंच्या बचावाखातर सध्या या वादात ओढला जाऊन फरफटणारा भाजपा यांनी महाराष्ट्राचे राजकीय वातावरण बरेच ढवळून निघाले आहे.
राणे यांचे ठाकरे यांच्यासंबंधीचे विधान अशिष्टपणाकडे झुकणारे होते यात शंका नाही, परंतु तो एखाद्या उच्चपदस्थाला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेण्याएवढा दखलपात्र गुन्हा ठरतो का हा प्रश्नही आहे, परंतु आजकालच्या राजकारणाची पातळीच एवढी खाली घसरलेली आहे की कोणी कोणाला दोष देण्यात अर्थ नाही. स्वतः आयकर, सीबीआय, ईडीपासून सीडीपर्यंतच्या गोष्टींचा बेबंद वापर आपल्या विरोधकांना शह देण्यासाठी करणार्यांनी पोलीस कारवाईचा कितीही कांगावा केला तरी सहानुभूती मिळणार नाही.
काल महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची राणेंचे समर्थन करताना कशी तारांबळ उडाली ते दिसत होतेच. राणेंच्या विधानाशी सहमत नाही, परंतु भाजप त्यांच्या पाठीशी राहील ह्या त्यांच्या म्हणण्यामध्ये भारतीय जनता पक्षाची सध्याची फरपट स्पष्ट दिसून येते. कणकवलीचे भाजपचे नेेते प्रमोद जठार यांनी एकेकाळी गुंडगिरी आणि दहशतीविरोधात खंबीरपणे उभे राहत दक्षिण कोकणात भाजपाचा झेंडा धैर्याने आणि हिंमतीने फडकवत ठेवला होता, तेव्हा ते सर्वांच्या आदरास पात्र ठरले होते. परंतु काल राणे यांच्या अटकेनंतर ते ज्या प्रकारे तावातावाने त्यांचे समर्थन करताना दिसले, त्यात त्यांची आणि त्यांच्या पक्षाची सध्याची हतबलता स्पष्ट दिसून येते.
भारतीय जनता पक्षाला कोकण सर करायचे आहे आणि ते करण्यासाठी सध्या नारायण राणे या नावाचा जास्तीत जास्त वापर करून घ्यायचा आहे. त्यांना दीर्घ प्रतीक्षा करीत राहायला लावून अखेरीस केंद्रात दिलेले मंत्रिपद ही त्याचीच बक्षिसी आहे. आताही जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने यापूर्वी केवळ दक्षिण कोकणपुरता प्रभाव असलेल्या राणेंचा प्रभाव उत्तर कोकणापर्यंत पसरवण्यासाठी भाजपने आपल्या ताकदीचा टेकू त्यांना लावला होता. परंतु जनआशीर्वाद यात्रेचे मूळ उद्दिष्ट राहिले बाजूला, राणेंच्या वादग्रस्त विधानामुळे आज त्यांच्या यात्रेपेक्षा त्यांच्या वर्तनाची चर्चाच अधिक होऊ लागली आहे. भाजपचे केंद्र आणि महाराष्ट्रातील नेते आज भले छात्या पुढे काढून त्यांचे समर्थन करीत असले, तरी हे अवघड जागेचे दुखणे आहे ह्याची त्यांनाही पुरेपूर कल्पना आहे. त्यामुळे सहन होत नाही आणि सांगताही येत नाही अशा पेचात भाजप अडकलेला आहे.
वास्तविक, शिवसेनेने हे आंदोलन केवळ राणे यांच्यापुरते सीमित ठेवले असते तर कदाचित राज्यस्तरीय भाजपा यामध्ये एवढ्या आक्रमकपणे उतरलाही नसता, परंतु ज्या प्रकारे मुंबई – ठाण्यात आणि इतरत्र भाजपाच्या कार्यालयांवर दगडफेक करण्यात आली, त्यामुळे आता ह्या संघर्षाला सेना – भाजप संघर्षाचे स्वरूप प्राप्त झालेले आहे.
कोणत्याही विषयाला कसे चतुर वळण द्यायचे यामध्ये काही राजकीय पक्ष फारच वाकबगार असतात. भाजपने सध्याच्या वादात शर्जील उस्मानीचे हिंदुत्वविरोधी वक्तव्य ओढून महाराष्ट्रातील महाविकास आघाडी कसे हिंदुत्वविरोधी आहे हे जनतेच्या मनावर ठसवण्याचा आटोकाट प्रयत्न चालवला आहे. केंद्रात अत्यंत प्रबळ सत्ता असूनही महाराष्ट्रात आपल्या हाती सत्ताशकट येऊ शकले नाही हे भाजपच्या आणि विशेषतः फडणवीस यांच्या किती वर्मी लागले आहे ते त्यांच्या सततच्या ठाकरे सरकारविरोधी तोफगोळ्यांतून दिसून येतेच. आताही राणे यांच्यावरील कारवाई ही जोरजबरदस्तीची कारवाई आहे असे चित्र केंद्रापुढे निर्माण केले जाईल यात शंका नाही.
राणेंविरुद्ध अटकेचे फर्मान जारी करणारे नाशिकचे पोलीस आयुक्त स्वतःला छत्रपती समजतात काय असे फडणवीस काल म्हणाले. ज्या संगमेश्वरात राणेंना काल अटक झाली, तेथेच इतिहासात संभाजीराजेंनाही अटक झाली होती. पण म्हणून त्यांची तुलना उद्या ह्या अटकेशी केली जाणार का? देशात न्यायालये आहेत, कायदाकानून आहे, काय योग्य – अयोग्य होते ह्याची शहानिशा न्यायदेवतेला करू द्यात. सरकारचे चुकले असेल तर तोंडघशी पडेल आणि राणेंचे विधान गैर असेल तर त्यांनी किमान दिलगिरी तरी व्यक्त करीत ह्या वादावर पडदा पाडावा.