अंगणातील माटव

0
184

– संदीप मणेरीकर
पाहुण्यांचे पहिले स्वागत
दारातील मंडप करीतो
नंतर उंबर्‍यावरील यजमान
दिलखुलासपणे हसतो

कोकण म्हटलं की डोळ्यांसमोर पहिल्यांदा उभा रहातो दोन्ही हातांनी भरभरून देणारा निसर्ग. उतरत्या छपराची घरं, चारी बाजूंनी निसर्गानं ओतलेला समृद्ध खजिना. घराच्या पाठीमागे झुळूझुळू बारामाही पाण्यानं वाहणारा पाट, घरासमोर विशाल अंगण आणि त्या अंगणात उभा असलेला माड आणि पोफळींच्या झावळांचा (चुडतांचा) मंडप किंवा माटव. संपूर्णपणे निसर्गातून निर्माण होणार्‍या गोष्टींतून हा मंडप तयार केलेला असतो. त्यामुळे पूर्णपणे पर्यावरणीय संतुलन राखूनच तो केलेला असतो. पावसाळ्यानंतर दिवाळीच्या सुमारास हा मंडप घातला जातो. तो पहिला पाऊस पडेपर्यंत दारात दिमाखात डौलदारपणे उभा असतो. मंडपाला कोकण व गोमंतकात माटव असं म्हटलं जातं. आमच्या घरी जो मंडप उभारला जातो तो पोफळीच्या मेढी, त्यावर परत आडव्या पोफळी, त्यावर पोफळींच्या कांबी व त्यावर माड आणि पोफळींची झावळं. त्याला कोकणी व मालवणी भाषेत चुडतं असं म्हणतात. आमच्या घरी अंगणात भला मोठा हा मंडप उभारला जातो. पायर्‍या उतरून खाली उतरलं की पहिलं स्वागत हा मंडप करतो आणि येणारा पाहुणा जाम खूष होतो. या मंडपाखाली शेणानं सारवलेलं अंगण, मंडपात झुलणारा झोपाळा, आजूबाजूला फुलझाडांवर फुललेल्या नानाविध फुलांचा सुगंध, पलीकडे उंचच उंच आंब्या-फणसाची झाडं, पाठीमागे पोफळीची बागायत, सारं कसं स्वप्नातील गाव कसं वाटावं.
या मंडपावर पूर्वी फणस-आंबापोळी घालण्यात येत होती. फणसपोळी व आंबापोळी वरती वाळत घालत असल्यामुळे त्यांचे आपोआपच संरक्षण होत असे. अन्यथा खाली असल्यानंतर म्हशी, कुत्रे किंवा अन्य प्राणी येऊन त्या खाऊन जाण्याची भीती जास्त असते. अर्थात वर ठेवल्यानंतर कावळे किंवा इतर पक्षीही येण्याची भीती असते. पण तसा कावळ्यांनी किंवा इतर पक्ष्यांनी त्रास दिल्याचे काही मला माहित नाही. आमच्याकडे त्यावेळी खूप मोठ्या प्रमाणात फणसपोळी घातली जायची. अख्खा माटव त्या फणसपोळ्यांनी भरून जायचा एकेकदा. मात्र त्यासाठी खटपट व कष्ट खूप पडायचे. आम्ही सगळी अगदी आजीपासून ते सारीजण सकाळपासून यात गुंतलेलो असायचो. पहाटे पाच वाजता उठून फणस फोडायचे. त्यातील गरे काढायचे. गरे काढून त्यातील आठळा बाहेर टाकायच्या. गर्‍यांचे दोन तुकडे करायचे व ते एका पातेल्यात टाकायचे. मग दादा किंवा भाई ते एका मोठ्या लाकडी पेटीत घ्यायचे. त्याला ग्रामीण भाषेत कोडबा म्हणतात. त्यात ते गरे घेऊन बांबूच्या काठ्या एकत्र घट्ट बांधलेल्या असायच्या त्यांच्याद्वारे ते गरे अगदी पातळ होईपर्यंत कुटायचे. त्याला गरे कुटणे असाच शब्दप्रयोग केला जात असे. बारीक झालेल्या गर्‍यांना मलमा म्हणतात. हा मलमा एवढा बारीक केला जात असे की, सारे गरे एकजीव होऊन जात असत. मग तो प्लास्टिक कागदावर चौरसाकृती पसरायचा. एका प्लास्टीकवर दोन असे चौरस तयार करायचे. असे कितीतरी प्लास्टीकचे तुकडे माटवभर पसरून उन्हात वाळवून ठेवले जात. त्यानंतर संध्याकाळी ते सूर्यास्तापर्यंत वाळत असत. ते वाळले की त्यांच्या घड्या घालून ती प्लास्टिक तशीच माटवावर ठेवून त्यावर रात्रीचा दव पडू नये म्हणून चुडतं ठेवली जात. त्यानंतर दुसर्‍या दिवशी सकाळी उन्ह पडायच्या अगोदर ती सोडवून दुसर्‍या बाजूने वाळवायची. संध्याकाळी घड्या करायच्या आणि मग तिसर्‍या दिवशी संध्याकाळी वाळवून त्या पोळ्या घरात आणायच्या. अशा रितीने किमान तीन दिवस तरी एक पोळी व्हायला लागत असेे. मी या संपूर्ण कार्यक्रमात केवळ गरे काढणे, त्यानंतर ते असलेच तर कुटणे व माटवावर चढून उन्हापूर्वीची कामं करणे यातच सहभागी व्हायचो. उन्हं आली की मला दादा तू चल खाली म्हणून सांगायचे. मी ती प्रमाण आज्ञा मानून खाली यायचो. संध्याकाळी मात्र बहुतेक त्या पोळ्या (त्याला साटं असं म्हणतात) काढण्यासाठी मी माटवावर चढायचो. तसंच दादांनी काढून ठेवलेले फणस आणण्याचं एक मोठं काम आम्हांला करावं लागत असे.
या वेळेत आई व आजी असल्याच तर आंब्याच्या पोळ्या करत. त्या मात्र कमी असल्यामुळे बहुतेक खालीच त्यांना स्थान असे. त्या विकण्यासाठी केल्या जात नसत म्हणजेच व्यापारी दृष्टीकोन त्यांना नव्हता. त्यामुळे त्यांना जास्त महत्त्व दिलं जात नव्हतं. त्यांचा वापर केवळ घरात खाण्यासाठी केला जात असे. कधीतरी जास्त झाल्याच तर विकल्या जात. पण फणसपोळी हाच त्या काळी मोठा उद्योगधंदा होता.
या माटवावरून लहानपणीची एक आठवण झाली. आम्ही लहान असताना उन्हाळ्यातील दिवसांत आम्ही माटव घालत असू. सावंतवाडीहून वर्षा, पराग वगैरे आले की आमचा उद्योग सुरू होत असे. बहुतेक मे महिन्यातील सुट्टीत आम्ही हे उद्योग करत असू. चार मेढी, त्यावर चार कांबी टाकल्या व झावळं टाकली की आमचा माटव तयार होत असे. त्यासाठी किमान चार ते पाच दिवस लागत. एकदा आम्ही माटव तयार करण्याची तयारी केली. त्यावेळी चार मेढी हव्या होत्या. पण तीन मिळालेल्या होत्या. आणखी एक हवी होती. शेवटी आमची चुलत बहिण रुपा हिने आपल्या बागायतीतील एक छोटा सागवान दाखवला व हा तोडा असं सांगितलं. आम्ही तो तोडून माटवासाठी वापरला. संध्याकाळी घरी आलो. दुसर्‍या दिवशी सकाळीच आमच्या व शेजारच्या घरातून आम्हां सगळ्या मुलांच्या नावे ठो ठो सुरू होतं. पण आमच्यावर काही तसा परिणाम झाला नाही. आम्ही माटव पूर्ण केला. त्यात आम्ही चूल टाकून चहा करून प्यायलो. त्यानंतर परत कधीच आम्ही माटव घालण्यासाठी काही पोहोचलो नाही.
घरच्या माटवावर आम्ही रात्रीच्यावेळी बसून शारदीय चांदण्याचा नाही पण चांदण्यांचाही आस्वाद घेतलेला आहे. आम्ही माटवावर अंताक्षरीने खेळलोय, गप्पा मारल्यात. आज फणसपोळ्या बंद झाल्यात कारण माणसं नाहीत, कामाला, मदतीला, आणि त्या कामाच्या कष्टाप्रमाणे फळ मिळत नाही. फणसाची झाडं कमी झालीत. काही मोडून पडलीत, खाण्यापुरते फणस आज मिळतात आणि अगदी कमी प्रमाणात खाण्यापुरत्याच फणसपोळ्या केल्या जातात. आंबापोळी तर जवळ जवळ बंदच झाली आहे.
आज असे माटव कुठे फारसे दिसत नाहीत. दिसतात ते कायमस्वरूपी पत्र्याचे. उन्हाळा किंवा पावसाळ्यातही राहणारे, पण त्यात नैसर्गिकता काहीच नसते. सारं काही प्लास्टिक व लोखंडाचं. वर झावळांच्या जागी पत्रे आलेत. त्यामुळे वर चढून बसण्याची मजा गेली. पत्रे असल्यामुळे कधीही खाली कोसळून पडण्याची भीती. त्यात पावसाच्या धारांचा भलामोठा आवाज… तसं पाहिलं तर शांतता नसते, या माटवात. आणि जो नैसर्गिक आपलेपणा तो त्यात मला तरी आढळून येत नाही. उगाच शहरी भागात आल्यासारखं वाटतं.
खरं तर माटव हा सुद्धा एकप्रकारे आपल्या मनावर, आपल्यावर संस्कार करत असतो. एक आपुलकी तो जपत असतो. दारात उभा राहिलेला माटव पाहिला की, मन किती प्रसन्न होतं. या प्रसन्नचा पहिला संस्कार हा माटव करत असतो. केवळ आपल्या माणसांवरच नव्हे तर आपल्याकडे येणार्‍या प्रत्येक व्यक्तीवर आपण माया करावी, सावलीसारखी! त्याच्यावर प्रेम करावं असंच जणू हा माटव शिकवत असतो. आपण उन्हातानात उभा रहातो; पण आपल्या सहवासात येणार्‍यावर तो शीतल छाया पसरवीत असतो. आपला प्रत्येक अवयव उपयोगात आणण्यासाठी धडपडत असतो. माटवाच्या या मेढींना बांबू बांधून त्यावर कपडे वाळत टाकता येतात. माटवावर धान्ये-कडधान्ये वाळत टाकता येतात. मेढींना झोपाळा बांधून त्यावर झुलता येतं. हाच माटव जेव्हा काढून टाकायचा असतो तेव्हा याच्या सर्व गोष्टींचा उपयोग करता येतो. झावळ्यांपासून पावसापासून रक्षण करण्यासाठी ज्याला कुडप असे म्हणतात ते करता येतं. पोफळी किंवा कांबींचा उपयोग जळणासाठी करता येतो. कितीतरी उपयोग असे करता येतात. थोडक्यात आपण नेहमी दुसर्‍याच्या उपयोगी पडावं हे सगळे संस्कार आपल्यावर हा माटव करत असतो. पण आपण यातून काय घ्यायचं हे आपल्यावर अवलंबून असतं. आज मात्र असे माटव दृष्टीस पडणं मुश्किल झालं आहे. सगळीकडे माणसांची वानवा जाणवत असल्यामुळे माटव घालणारे कोणीच सापडत नाही. सगळ्यांचा ओढा शहरीकरणाकडे असल्यामुळे ग्रामीण भागात सर्रासपणे आढळणारा निसर्गदत्त माटव आज आपल्यातून लुप्त होत आहे. त्याच्या जागी कसलीच संवेदना नसणारा प्लास्टिक व लोखंडी माटव दिसू लागला आहे.