बातमी

0
164

– डॉ. राजेंद्र रामचंद्र साखरदांडे
वर्तमानपत्रातील बातमी वाचली ना? नाही वाचली तरी चालेल. लगेचच ती बातमी (ताजी) सोशल नेटवर्कवर आलीच म्हणून समजा. वाचून थोडे शांत झाले. कारण बायकांचा सल्ला ऐकणारे ते, मग ऍटेकने मरणार नाही याची त्यांना खात्री झाली. थोडे साशंक झाले. वाटले आता आपली वाचण्याची धडकत नाही. कारण आपण आपल्या बायकोचेच कशाला कुणाही बायकांचे ऐकत नाही. ऐकले तरी मान्य करत नाही. फक्त आपल्याच बायकोचा सल्ला ऐकायला हवा असा खुलासा मात्र तिथे नव्हता. म्हणजे मैत्रिणींचा सल्ला ऐकला तर ऍटेक येणार नाही ना!खरंच, मला हार्ट ऍटेकने मरायचे नाही हो! ‘‘मला वाचवा, काका मला वाचवा!!’’ म्हणत नारायणराव पेशवे टाहो फोडत होते. आता बायको मला वाचवा म्हणायची पाळी आली म्हणायची. चला रे, परता घरी… आपापल्या बायकांचे ऐका, दुसर्‍यांच्या बायकांचे नका हं! ती सांगेल तसे वागा. बघा, मरणार नाही तुम्ही ऍटेकने. पण मी म्हणतो – मेल्यावर ऍटेकने मेलो असे कसे समजणार?
प्रश्‍नांची लांबलचक यादी चक्क डोळ्यांसमोर नाचू लागली. बायकांचे सल्ले ऐकणारे ऍटेक येऊन मरणार नाही. म्हणजे दुसर्‍या कुठल्यातरी रोगाने ते नक्कीच मरतील; पण मरतील नक्की! देवा, तू सांगतो ते करतो, पण मला नाहीच मरायचे! मी काय करू सांग…!
अमेरिकेत कॅलिर्फोनिया या शहरात फक्त २८१ लग्न झालेल्या पुरुषांची जबानी घेतलेली. त्यातल्या बायकांचे ऐकणारे व न ऐकणारे यांच्यावर प्रश्‍नांची सरबत्ती झालेली. अहवाल सादर झाला. हा अहवालच थोतांड आहे. तिथे अमेरिकेत पुरुषांबरोबर राहणार्‍या बायका त्यांच्या लग्नाच्या बायका नसतात. त्यात लीव्ह इन रिलेशनशीपमधील जोडपी फार. तिथे स्त्री-पुरुषामधील संबंध शारीरिक असतो. तेव्हा ते लोक ऍटेकने मरणारच नाही. कारण हृदय हे मुळी त्याच्या हृदयात नसतेच. आज एक बाई तर उद्या दुसरी! बायकोला आपल्या इथे बायको म्हणतात – तिथे तर ती फक्त बाईच असते व तो नर!
पुढे तो अहवाल काय सांगतो ते ऐका तरी! सल्ला ऐकणार्‍याच्या धमन्या म्हणे लवचीक होतात. त्या आकुंचित पावत नाहीत. हे काही सत्य नाही. वय वाढल्यावर सगळ्या धमन्या आपला लवचीकपणा विसरतात. आता पूर्वीसारखे राहिलेले नाही. काळाबरोबर पुरुषही बदललाय. आजचा पुरुष स्त्रीसारखा दिसतो व स्त्री पुरुषासारखी… हो की नाही? कारण आजची स्त्री पुरुषाच्या बरोबरीने बाहेर पडलेली आहे. ती कामावर जाते. पुरुषांच्या बरोबरीने कमावते.
पूर्वी स्त्री घरी असायची. तिची कर्तव्ये ठरलेली असायची. घर सांभाळा, मुलांची देखभाल करा, वरून नवरा, सासू-सासरा यांची सेवा करा. मिळेल ते शिल्लक राहिलेले खाऊन जगा. रात्री सगळे झोपल्यावर सगळे आवरा… शेज सजवा… नंतर झोपी चला. तुम्ही जेवलात का… तुमचे हात दुखतात का? कुणीही काहीही तुम्हांला विचारणार नाही.
बरे झाले बाई हा बदल होऊन. आज समाजात मानसिकता बदललेली आहे. सगळे काही बरोबरीने करायचे. प्रत्येकाचे काम ठरलेले. हल्ली तर पतीदेव पत्नीपेक्षा चांगला स्वयंपाकही करायला लागलेत. ‘नवर्‍या मुलाला स्वयंपाक करता येतो का?’ हा प्रश्‍न होणार्‍या सासू आता करायला लागल्यात. तेव्हा पाककलेचा कोर्स पूर्ण केल्यानंतरच नवरा मुलगा बोहल्यावर चढणार! मला हे केव्हाच जमले नाही, हा भाग वेगळा. तेही जमत नसेल तर शहरात हॉटेलांची कमी नाही. हार्ट ऍटेक कशामुळे येतो हे प्रत्येकाला ठाऊकच आहे.
हल्ली सगळीकडे टेंशन वाढलेले आहे. कॉलेस्ट्रॉल नॉर्मल आहे. कामावर टेंशन… साहेब रागावतात… मॅमो देतात. कामाची डॅडलाइन देतात. साहेबांची बोलणी खाऊन डोके पहिल्यांदाच जाम जड झालेले असते. त्यात घरची महामाया दारावरच कमरेवर हात ठेवून हातात लाटणे घेऊन तुम्हांला ठेचायला दारातच उभी असते. ‘‘ हां… आजही उशीर झाला… कुणा मेनकेला भेटायला गेला होता की काय?’’
शेजारचा गणू म्हणत होता, ‘‘ तुम्ही कुणा एका बयेबरोबर हॉटेलात वडे खात होता व तुमची बोलणी पण रंगात आली होती म्हणे!’’
कोण हा गणू… आणि त्याला हा चोंबडेपणा करायला कुणी करायला सांगितलाय? त्या गणूला भेटायला हवे. समझोत करायला हवा; नाहीतर दररोज नवे काहीतरी सांगत राहणार!
‘‘ काय हो, आज माझा वाढदिवस… विसरलात ना! वाटलंच म्हणा!’
विसरलात म्हटल्यावर काही भेटवस्तू आणायचा प्रश्‍नच खुंटला. आता काही खैरियत नाही. आजच ऍटेक येणार बहुदा!
पाकिस्तानच्या वासिम अक्रम व वकार युनुसची गोलंदाजी खेळून काढणे सोपे होते. एकवेळ हॉल ग्रिफिथला सामोरे जाणे जमले असते; पण हिच्या फिरक्या गोलंदाजीसमोर त्रेधातिरपीट उडायची. बायका कुठून शिकतात ही फिरकी गोलंदाजी कोण जाणे? असा बॉल टाकणार की मधली दांडी गूल! आता चहाचे काही खरे नाही. म्हणा, आई गं… लावा छातीला हात व धडाम् करून पडा कॉटवर… मग बघा कशी घाबरगुंडी उडते ती. मग धावाधाव… डॉक्टर येईतोवर छातीवर धरलेला हात काढायचा नाही. नाहीतर तुमची काही खैर नाही; पण मी म्हणतो बायकोचा सल्ला ऐकायला काय जातेय!
ऍटेक पुरुषांनाच का? पुरुषाचे न ऐकणार्‍या बायकांना ऍटेक येतो का?? नाही ना! मी ठरवलेय हा प्रयोग गोव्यात आमच्या गावात करायचा. रेन्डम सर्वे करायची. कमीत कमी हजारभर लग्न झालेल्या पुरुषांचे परीक्षण करायचे. मग अहवाल सादर करायचा. सुरवात केली. ९०% नवरे बायकांचे सल्ले ऐकणारे निघाले. राहता राहिले १०%, पैकी अर्ध्यांच्या बायका वर गेलेल्या. न ऐकणार्‍या नवर्‍यांचे ऐकता ऐकता त्यांनाच ऍटेक तर नाही ना आला असावा? पेपरवर आलेल्या बातमीने सल्ला ऐकणार्‍या पुरुषांनीच खूष होण्याचे कारण नाही. कारण तुमचे मरण हे ठरलेले आहे.
पूर्वी लग्नाची जुळवाजुळव व्हायची. एकदुसर्‍यांचा स्वभाव कळण्यास काही मार्ग नव्हता. आज सगळे काही वेगळे. लग्नाअगोदर मुल-मुलींच्या बैठका होतात… हितगुज होते… एकमेकांना ओळखून घेतात. पटले तर लग्न. त्यात कुठे राहायचे… नोकरी कुणी व कुठे करायची, घरात कोणकोण असणार? सगळ्या प्रश्‍नांची उत्तरे मिळाल्यानंतरच बोहल्यावर चढायचे. लिव्ह इन रिलेशनशिप ठरले तर मग सवाल नाही. पटले नाही तर कॉन्ट्रॅक्ट फाडून टाकायचा. मग ऍटेकपण नाही.
त्या दिवशी कामावरून घरी परतलो तर आमच्या घरासमोर गर्दी उसळलेली. काळजाचा ठोका चुकला. रस्त्यावर गाड्या लागलेल्या. कपाळावर प्रश्‍नचिन्ह चढवत बायकोकडे बघितले. ती हलक्या आवाजात म्हणाली, ‘‘शेजारच्या बाळूकाकांना ऍटेक आला… वारले ते.’’
अरे! जन्मभर बायकोचे ऐकणारा ऍटेकने कसा काय वारला? मी प्रश्‍नार्थक मुद्रेने पाहत राहिलो. ही तर तर नेहमी म्हणायची. बघा… बघा त्या बाळूकाकांकडे कसे बायकोचे ऐकतात ते… नाहीतर तुम्ही? म्हणजे बायकोचा सल्ला ऐकणारा ऍटेकने वारला; मग आता कुणाचे ऐकायचे… बायकोचे?
हे बघा, आम्ही मध्यबिंदू ठरवू. नवरा-बायकोनी दर शनिवारी संध्याकाळी ६ वाजता बैठक घ्यावी. बैठकीचा मसुदा अगोदरच ठरवावा. आयत्यावेळी कोणत्याही विषयावर बोलू नये. बैठकीचे इतिवृत्त लिहावे. पोटात काहीही न ठेवता बोलावे. तावातावाने बोलले तरी चालेल. बैठकीची वेळ मर्यादा असावी. कमीत कमी अर्धा तास… महत्त्वाचा विषय पटावर असला तर एक तास. दोघांनीही बोलायचा वेळ समान वाटून घ्यावा. मग बघा कसे वाटते ते!
सकाळ झाली… पेपर हाती आला. लंडनची बातमी होती – नवर्‍यांचा सल्ला न ऐकणार्‍या बायांना मधुमेहाचा धोका! कधी एकदा ही बातमी हिच्या कानावर घालतो असे झालेले. पळत पळतच हिच्याकडे गेलो.
‘‘अगं, हा पेपर वाचलास का?’’
पेपर हाती घेऊन ती बातमी वाचताच ही मटकन सोफ्यावर कोसळली…
‘‘मी ऐकते ना तुमचे?’’
माझ्या कपाळावर पुन्हा प्रश्‍नचिन्ह उभे राहिले!