- पौर्णिमा केरकर
या बंदिस्त दिवसांत त्यांना या मातीच्या लोकपरंपरेतील पदार्थ तरी चाखू द्या. वेळ नाही या सबबीवर आठ दिवसांच्या चपात्या लाटून फ्रिजमध्ये प्लिज ठेवू नका. ताजे, सकस अन्न सुदैवाने काही दिवस तरी आपल्याला वेळेत जेवता-खाता येईल.
त्या दिवशी अचानक रिनाचा फोन आला. अचानक याचसाठी की सहजासहजी काही काम असल्याशिवाय ती फोन करीत नसते. मला विचार करायला वेळही न देता म्हणाली, “माझं स्टेट्स बघ अन् तुझी प्रतिक्रिया मला दे!” आणखी कसलीच खबरबात न घेता तिने फोन कट केला. एवढं आणि काय महत्त्वाचं असेल स्टेट्समध्ये असा मनातल्या मनात विचार करून मी नेट ऑन केले तर त्यात मला दिसले ते विविध प्रकारचे खाद्यपदार्थांचे फोटो, तेसुद्धा यू-ट्युबवर सर्च मारून, त्याच्याच मार्गदर्शनाखाली केलेले हे पदार्थ होते. लॉकडाऊनमुळे जे काही फायदे कुटुंबासाठी झाले त्याच्यातील घरच्या घरीच पदार्थ करून खाणे, हा फायदा महत्त्वाचाच. अलीकडे सर्रास सर्वसाधारण स्टेट्स असेच दालगोना कॉफी, पिझ्झा, फ्राईड राईस, आणखीनही बरेच पदार्थ. एरव्ही याच नावाचे पदार्थ एकतर हॉटेलमध्ये जाऊन नाहीतर मग घरपोच पार्सल सुविधेच्या माध्यमातून खाण्याची सवयच मुलांना जडली होती. मुळात घरच्यांना असे प्रेम, माया मिसळून तयार केलेले पदार्थ करण्यासाठी वेळच नव्हता त्यामुळे जिभेची चव रेडिमेड झालेली.
रीना सारखी मला चकित होऊनच विचारायची, एवढे सगळे करूनही तू वैविध्यपूर्ण स्वयंपाक कसा काय करू शकतेस…? मला बाई वेळच नाही. आमच्या घरी एखाद-दुसरा जरी पाहुणा यायचा झाला तरी मी ऑनलाईनच ऑर्डर करते. कोण काढणार त्या रांधा-वाढाच्या उठाबशा. मी मग म्हणायचे तिला, घरी मागवून वाढण्यापेक्षा पाहुण्यांना सरळ हॉटेलमध्येच घेऊन जा, तेवढेच ते पदार्थ गरम करण्याचे, वाढण्याचे, भांडी घासण्याचेही श्रम वाचतील. यातील विनोद जरी बाजूला ठेवला तरी ही परिस्थितीच एवढी भयानक आहे की मानवी मनाला आहार, आरोग्य हवे की नुसतीच मौजमजा आणि बँक बॅलन्स, विविध वस्तुरूपी धनदौलत? एवढा विचार करण्याची क्षमतासुद्धा या वेगवान जीवनशैलीने अंगिकारली नव्हती का?
आताच्या सद्यस्थितीत काही उपायच नाही. तरीही काही महाभाग असे आहेत की इथं जीवन-मरणाचा प्रश्न असतानाही चिकन, दारू मिळत नाही म्हणून छाती पिटत आहेत. त्यांना तर जगाने ‘न भूतो न भविष्यति’ असा जो पॉज घेतला आहे त्याचेही सोयरसुतक नाही. पंचवीस वर्षांपूर्वीचा काळ आठवून बघा. गावे, गावागावांतील प्रत्येक घर स्वावलंबी होते. पैसा हातात नसायचा, पण प्रत्येकच हात मातीत राबणारे. ते एकमेकांना सामूहिक मदत करायचे. माझ्या बालपणी आई पोरसू करायची. त्याची तयारी तुळशीची लग्ने उरकली की सुरू व्हायची. वाड्यावरील प्रत्येक घर पोरसू करायचे. ज्यांना जमीन नसायची ती दुसर्याच्या जमिनीत करायची. त्याच्या बदल्यात मिरची, भाजीपाला जमीनमालकाला दिला जायचा. तो द्यायलाच हवा अशी काही सक्ती नसे, पण कृतज्ञतेने ते केले जायचे. वाड्यावरील महिलांचा या पोरसात मोठा वावर. घरामागची भवानी काकी, इमला काकी, पेटीवालो दाजी, मनोहर कामत, झिलूआबा गेली वयनी, आणखीन अनेकजण पोरसू करायचे. दिवस ठरवून एकमेकांना मदत करून ही कामे व्हायची. पोरसू लावणे, रोप काढणे, लाटीच्या पाण्याने ते शिंपणे यासाठी कामेरी लागतात हे तर आम्हाला कधी जाणवलेच नाही. सगळीच सगळ्यांसाठी राबायची. आलेलं मिरचीचं उत्पन्न वर्षभर पुरायचं. भाजी कोणी पिकवीत नसत त्यांना दिली जायची. जास्तीची गुरावासरांसाठी वापरात यायची. हिरव्या मिरच्यांचा फुटो सवराक, वालींची वांगी घालून केलेली भाजी, कधीकधी उकड्या तांदळाची पेज, सोबत खारातली आमली आणि वाल-वांगीची भाजी. बेत मस्त जमून यायचा. ही सगळी समृद्ध, सुदृढ परंपरा कालौघात शिकल्यासवरलेल्यांना अडाणी, अशिक्षितपणाची वाटू लागली. गावांना शहराचे वेध लागले, गावांचेही शहरीकरण होऊ लागले. जमिनीचा भाव वाढला. जमिनी ज्यांनी मातेसमान मानल्या त्यांच्या पुत्रपौत्रांनी मात्र बक्कळ पैसा मिळतोय म्हणून भराभर विक्रीस काढल्या. घरे बांधली, किनारी भागात तर विदेशीना भाडेपट्टीवर देण्यासाठी खास बंगले नियमांची पायमल्ली करून बांधले. असेही बरेचजण आहेत की ते पाच महिने स्वतः एका छोट्या खोलीत राहतात आणि महिन्याकाठी एक दीड लाख रुपये मिळतात म्हणून विदेशीना आपले मोठे नवीन घर राहण्यासाठी देतात.
घर हे मंदिर असे मानणारी आपली संस्कृती. पण या भाडेपट्टीवर दिलेल्या घरात मात्र सर्व तर्हेची अनैतिक कृत्ये चालूच असतात. पैशांसाठी तेही खपवून घेतले जाते. पैसा मोठा आणि माणूस छोटा झाला. कोरोनाने या सगळ्यालाच जबरदस्त चपराक दिली. माणसाची सगळीच गणिते उलटीपालटी केली. आजपर्यंतच्या इतिहासात माणसाने निसर्गावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न तर केलेलाच आहे, शिवाय माणसाने माणसावर अधिराज्य करतानाचे मनसुबे आखताना त्यालाच मारण्यासाठी वैविध्यपूर्ण हत्यारे बनविली. त्यासाठी अमर्याद खर्च केला. कोरोनाने मात्र बिनखर्चानेच जातपात, धर्म पंथ, गरीब-श्रीमंत असे भेद न मानता सगळ्यांनाच वठणीवर आणले. म्हणूनच तर जेव्हा सगळेच बंद झाले तेव्हा लोक धावले ते दुकानावर पोटासाठी अन्न आणायला. पैसे, गाडी आहे, पण मॉल, हॉटेल, पब पार्ट्या करता येत नाहीत. जीव जगविण्यासाठीची धडपड. आहे ते जपून खायचे. घरीच करून खायचे. शेतकरी पिकवीत आहे म्हणून आम्हाला मिळते आहे, या जाणिवा टिकून राहायला हव्यात. आपल्याकडे खूप चांगल्या परंपरा होत्या, पण आपण मूळच विसरून गेलो. भूकलाडू, तहानलाडू वळून ते प्रवासाला जाताना शेल्यापदरी बांधून नेले जायचे. आजही असे लाडू करता येतील. या सक्तीच्या रजेत ते शिकायचे. कोवळ्या फणसाच्या कुवल्याची भाजी, शेवग्याच्या शेंगांची, वाल, वांगी, गवन, शिरवळयो, नाचणीच्या पिठाचे पोळे, लाडू, सत्व, खांटोळी, खप्रोळी इ. याच दिवसांत कच्चा कैर्या भरपूर मिळतात. त्यांपासून घरगुती लोणचे, पन्ह
करता येण्यासारखी आहेत. नाचणीची भाकरी आणि चुलीत रसरसून भाजून केलेले वांग्याचे भरीत. त्याला दिलेली खोबरेल तेलाची खमंग चुरचुरीत फोडणी… याच दिवसांत पोरसातील पालेभाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात, त्यांचा आहारात वैविध्यपूर्ण वापर करावा. त्यासाठी जुन्या जाणत्यांचा सल्ला घ्यावा. आपले हे पारंपरिक पदार्थ तयार करून त्याचे व्हिडिओ यू-ट्युबवर अपलोड करावेत. घरातील सदस्यांना ते पदार्थ खाऊ घालावेत, त्यासाठी त्यांचीही मदत घ्यावी. दालगादो, मोकटेल, कॉकटेल हे पदार्थ आताच्या पिढीला माहीत आहेतच. ते तीच ओळख घेऊन वाढले. या बंदिस्त दिवसांत त्यांना या मातीच्या लोकपरंपरेतील पदार्थ तरी चाखू द्या. वेळ नाही या सबबीवर आठ दिवसांच्या चपात्या लाटून फ्रिजमध्ये प्लिज ठेवू नका. ताजे, सकस अन्न सुदैवाने काही दिवस तरी आपल्याला वेळेत जेवता-खाता येईल. यानिमित्ताने आपण सकस, अर्थपूर्ण जगण्याचे महत्त्व जाणून घेऊ. घरच्या घरी पदार्थ करताना आता आपण मुलांना पण सोबत घेऊ शकतो. तीसुद्धा नवीन काहीतरी शिकतील. पुढे त्यांची मदतही होईल.