- सुधाकर रामचंद्र नाईक
कोरोनाचा क्रीडाविश्वालाही ‘न भूतो….’ फटका बसलेला आहे. जागतिक क्रीडास्पर्धांची वेळापत्रके पूर्णतया विस्कटली आहेत. क्रीडाविश्वातील मानबिंदू मानली जाणारी ऑलिंपिक स्पर्धा तसेच भारतातील सर्वाधिक लोकप्रिय इंडियन प्रिमियर लीग स्पर्धाही सध्या तरी अनिश्चित कालावधीसाठी लांबणीवर टाकलेली आहे.
‘कोरोना व्हायरस’च्या महामारीमुळे जगभरात हाहाकार माजला असून हजारो लोक मृत्यूच्या खाईत लोटले गेले आहेत. बहुसंख्य प्रगत तसेच नवप्रगत देशांना या जीवघेण्या विषाणूच्या प्रादुर्भावाचा प्रलयंकारी फटका बसलेला असून यावर मात करण्यासाठी सर्वांचे जीवाच्या आकांताने प्रयत्न सुरू आहेत. कोरोनापीडित प्रदेशांमधील बहुश: दैनंदिन व्यवहार ठप्प झाले असून क्रीडाविश्वालाही ‘न भूतो….’ फटका बसलेला आहे. जागतिक क्रीडास्पर्धांची वेळापत्रके पूर्णतया विस्कटली आहेत. विशेषत: क्रीडाविश्वातील मानबिंदू मानली जाणारी ऑलिंपिक स्पर्धा तसेच भारतातील सर्वाधिक लोकप्रिय इंडियन प्रिमियर लीग स्पर्धाही सध्या तरी अनिश्चित कालावधीसाठी लांबणीवर टाकलेली आहे.
प्रतिष्ठेची ऑलिंपिक स्पर्धा दोन महायुद्धांनंतर प्रथमच अडचणीत आलेली आहे. यंदा 4 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत टोकयो 2020 ऑलिंपिक प्रतियोगिता जपानमध्ये होणार होती. पण कोरोना विषाणूच्या प्रलयंकारी हाहाकारामुळे ऑलिंपिक पुढे ढकलण्यात येणार असल्याची घोषणा जपानचे प्रधानमंत्री शिन्झो अबे यांनी केली आहे. 2021 मध्ये ऑलिंपिक आयोजनाबाबतचा आशावाद त्यांनी व्यक्तविलेला आहे.
याआधी जागतिक महायुद्धांच्या पार्श्वभूमीवर तीन वेळा ऑलिंपिक रद्द झालेली आहे, पण पुढे ढकलण्याची ही पहिलीच वेळ होय. 1916 मध्ये पहिल्या जागतिक महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर जर्मनीमधील ऑलिंपिक रद्द झाली होती. 1940 मध्ये टोकयो गेम्स आणि 1944 मध्ये लंडन गेम्स दुसर्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर रद्दबातल करण्यात आली होती. यावेळी जीवघेण्या कोरोना विषाणूच्या वैश्विक प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ऑलिंपिक आयोजन समितीला नाइलाजाने हा निर्णय घ्यावा लागलेला आहे.
ऑलिंपिकच्या तयारीसाठी यजमानांनी प्रचंड पैसा खर्च केलेला आहे आणि ऑलिंपिक आयोजनाने तो पुरेपूर वसूल होणार होता. बीजिंग, लंडन, रिओ दी जानैरो या गेल्या तीन ऑलिंपिक यजमानांना ऑलिंपिक आयोजनाने भरपूर आर्थिक लाभ मिळवून दिला असून यंदा जपानलाही यशस्वी आयोजनानंतर तीन अब्ज डॉलर्सचा आर्थिक लाभ होण्याची अपेक्षा होती. 1961 मध्ये जपानने प्रथमच एक आशियाई देश म्हणून प्रतिष्ठेच्या ऑलिंपिक प्रतियोगितेचे भव्यदिव्य तथा यशस्वी आयोजन करण्याचा मान मिळविला होता आणि आता लंडन, पॅरिस, लॉस एंजलिसनंतर ऑलिंपिकचे एकहून अधिक वेळा यजमानपद भूषविणारा देश बनण्याचा मान जपानला मिळणार होता. यशस्वी आयोजनाने सध्या आर्थिक संक्रमणातून गुजरणार्या जपानला आपल्या अर्थव्यवस्थेची घडी नीट बसविण्याची आशाही होती. पण सद्यस्थितीत सर्व आवाक्याबाहेरचे ठरलेले आहे. ऑलिंपिकमधील अनेक क्रीडाप्रकारांतील पात्रता फेर्याही पूर्ण झालेल्या नाहीत. ऑलिंपिक पात्र ठरलेल्या खेळाडूंना ‘कोरोना’मुळे प्रशिक्षणस्थळी जाऊन पुरेसा सरावही करणे शक्य नाही. ऑलिंपिक पात्रतेचा उच्चतम दर्जा राखणे हेच मोठे अवघड आव्हान आहे. इटाली, चीन, द. कोरिया, अमेरिका आदी ऑलिंपिकमधील प्रमुख प्रतिस्पर्धी देशांतील अॅथलेट्स या बिकट स्थितीत सहभागी होण्याची जोखीम पत्करतील अशी अपेक्षा बाळगणेही धारिष्ट्याचे ठरावे. या जीवघेण्या विषाणूने संपूर्ण विश्वच हादरविले असून अन्य क्रीडाजगतही अपवाद राहिलेले नाही.
अमेरिका, युरोप या क्रिकेटेतर देशांतील क्रीडाव्यवहारही ठप्प झाले असून जून-जुलैमध्ये होणार्या प्रतिष्ठेच्या युरो चषक, कोपा अमेरिका या बहुराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धाही लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. टेनिसविश्वही याला अपवाद नसून विम्बल्डन, फ्रेंच ओपन, अमेरिकन ओपन या स्पर्धांच्या आयोजनाबाबतही साशंकता निर्माण झालेली असून त्याही लांबणीवर टाकल्या जाण्याची शक्यता आहे.
भारतीय क्रीडाजगतही ‘कोरोना’ महामारीच्या विळख्यात अडकलेले असून विलक्षण लोकप्रिय अशा इंडियन प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे भविष्य अंधूक बनलेले आहे. परिस्थितीचे गांभीर्य जाणून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 29 मार्चपासून सुरू व्हावयाची ही प्रतियोगिता एप्रिलमध्यावधीपर्यंत लांबणीवर टाकली होती, पण कोरोनाचा कहर संपण्याची चिन्हे नसल्याने प्रधानमंत्र्यांनी ‘लॉकडाऊन’चा कालावधी 3 मेपर्यंत वाढविल्याने आयपीएलच्या 13व्या मोसमावरील अनिश्चिततेचे सावट अधिक गडद बनले असून बीसीसीआयने अनिश्चित कालावधीसाठी प्रतियोगिता लांबणीवर टाकण्याचा निर्णय सहभागी फ्रँचाइज तसेच भागधारक, ब्रॉडकास्टर आदी सर्वसंबंधितांना कळविलेला आहे. सौरव गांगुलीच्या अध्यक्षतेखालील बीसीसीआय कार्यकारिणीने हा निर्णय घेण्याआधी सर्व बाबींचा साधकबाधक विचार केलेला आहे.
काही फ्रँचाइजनी बंद स्टेडियममध्ये सामने खेळविण्याचा प्रस्ताव पुढे केला होता पण आयपीएलसाठी सप्टेंबर-ऑक्टोबरचा प्रस्ताव मंडळाच्या विचाराधीन आहे असे समजते. भारतात मेअखेरीस मन्सूनचे आगमन होत असते आणि सप्टेंबरपर्यंत तो सुरू सक्रीय होतो. त्यामुळे मे मध्यावधीपर्यंत कोरोनाचा कहर मंदावला तरी अल्पावधीत आयपीएल होणे शक्य नाही. यंदाची प्रतियोगिता 50 ऐवजी 44 दिवसांत खेळविण्यात येणार होती. आठ संघांचे देशभरातील 9 प्रमुख शहरात प्रत्येकी 14 सामने तसेच दोन उपांत्य सामने, एक नॉकआउट आणि 24 मे रोजी वानखेडेवर अंतिम सामना होणार होता. पण ‘कोरोना’ कहराने सर्व वेळापत्रक बिघडवून टाकले. आयपीएलमधील आठ संघांत 189 खेळाडूंत 64 विदेशी स्टार्सचा समावेश आहे. विद्यमान परिस्थितीत सर्व आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद आहेत, त्याशिवाय कुठलाही देश अशा भयावह परिस्थितीत आपल्या खेळाडूंना भारतात पाठविण्याचा विचार करणार नाही.
कोरोनाचा कहर संपल्यास मान्सूननंतर आयपीएल खेळविण्याची अंधूक आशा आयोजक बाळगून आहेत. त्यामुळे सप्टेंबर-ऑक्टोबरचा काल विचाराधीन आहे. पण ऑस्ट्रेलियात होणारी आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धाही या कालखंडात असल्याने डिसेंबरपर्यंत तरी आयपीएलसाठी मुहूर्त मिळेल असे वाटत नाही.
आयपीएलचा 13 वा मोसम विसरून जाणेच संयुक्तिक ठरेल असे बीसीसीआय प्रमुख सौरव गांगुली खाजगीत म्हणतात. या वैश्विक महामारीने संपूर्ण जग पार हादरले असून बहुतेक सर्व लोक आपापल्या घरामध्ये बंदिस्त आहेत. एअरपोर्ट, रेल्वेज, बसवाहतूक सर्व ठप्प झालेले असून सर्व सुनसान बनलेले आहे. एकंदर परिस्थिती अत्यंत बिकट बनलेली असून 46 वर्षांच्या जीवनात असा भयावह अनुभव कधी आला नाही, असेही भारताचे माजी कर्णधार म्हणतात.
2014 मध्ये सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचा प्रारंभिक टप्पा आखाती देशात खेळविला होता तोही पर्याय उपलब्ध नाही. पण परिस्थिती पूर्वपदावर आल्यास 2009 प्रमाणे छोट्या ‘फॉर्मेट’मध्ये स्पर्धा होऊ शकते. काही पदाधिकारी सप्टेंबरमध्ये आयपीएल आयोजन करण्याचे संकेत देतात पण आशिया कप, तसेच टी-20 विश्वचषक आदीमुळे हे शक्य होईल असे वाटत नाही.
आयपीएल रद्दबातल ठरल्यास बीसीसीआयला सुमारे 4000 कोटींचा आर्थिक फटका बसेल. ब्रॉडकास्टरनाही जबरदस्त आर्थिक फटका बसणार आहे. स्पर्धा रद्द झाल्यास मानधन मिळणार नसल्याने खेळाडूंनाही आर्थिक नुकसान होईल. फ्रँचाइजनाही 2.5 ते 4 कोटीपर्यंत आर्थिक नुकसानीची झळ बसेल. आयपीएलमध्ये आपली गुणवत्ता झळकविण्यास उत्सुक असलेल्या नैपुण्यकुशल युवा खेळाडूंच्या आशाही मंदावल्या आहेत. त्यामुळे डिसेंबरपर्यंत आयपीएल खेळविण्याच्या बीसीसीआयच्या अपेक्षांना यश येवो.
‘कोरोना’ विषाणूच्या वैश्विक संक्रमणाने तमाम विश्व संभ्रमित, भयभीत बनलेले आहे. ‘लॉकआउट’ आदी अनेक उपाययोजनांद्वारे त्यावर मात करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळो आणि सर्वांना सुखासमाधानाचे जीवन जगण्याची संधी मिळो अशी प्रार्थना करूया!!