८७० खाण कामगारांवर बेरोजगारीचे मोठे संकट

0
14

खाण संचालनालयाने ४ मे २०२२ रोजी खाण लीज खाली करण्याची नोटीस बजावली आहे. त्याचबरोबर खनिज व्यवसाय पुन्हा सुरू करण्याचा कोणताही पर्याय नसल्याने वेदांता सेसा गोवा, सेसा रिसोर्सेस लिमिटेड, सेसा मायनिंग कॉर्पोरेशन लिमिटेडच्या खाण कामाशी संबंधित सर्व कामे बंद करून खाण युनिटमध्ये कार्यरत असलेल्या ८७० कामगारांना नोकरीतून कमी करण्यासाठी औद्योगिक कायद्याखाली नोटीस बजावण्यात आली आहे, असा खुलासा वेदांता कंपनीकडून काल करण्यात आला.
सेसा वेदांता कंपनीने कामगारांना सेवेतून कमी करण्यासाठी तीन महिन्यांची नोटीस बजावल्याने कामगारांत खळबळ माजली आहे. कंपनीने कामगारांना कमी करण्यासंबंधीचा अर्ज केंद्रीय कामगार मंत्रालयाकडे पाठवला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ७ फेब्रुवारी २०१८ रोजी राज्यातील खनिज व्यवसाय बंद करण्याचा आदेश जारी केल्यानंतर गेली चार वर्ष खनिज व्यवसाय बंद आहे.

गेली चार वर्षे खनिज व्यवसाय बंद असताना सुध्दा कंपनी आपल्या कामगारांच्या हिताकडे लक्ष देत आहे. कंपनीने मागील चार वर्षे खनिज व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी कायदेशीर मार्गाने प्रयत्न केला; परंतु, खनिज व्यवसाय पुन्हा सुरू करण्याच्या प्रयत्नांना यश प्राप्त झालेले नाही. औद्योगिक विवाद कायदा १९४७ च्या कलम २५ एन अंतर्गत कंपनी कामगारांना कमी करण्यासाठी अर्ज दाखल करण्याची कारवाई करत असून, कायद्याच्या तरतुदींचे पूर्ण पालन करत आहे, असेही वेदांता कंपनीने म्हटले आहे.