२० पर्यटकांसह तारकर्लीत बोट बुडाली; दोघांचा मृत्यू

0
19

>> ७ जण उपचारार्थ इस्पितळात दाखल

मालवणमधील तारकर्ली येथील समुद्रात पर्यटकांची बोट बुडाल्याची दुर्घटना काल घडली. या दुर्घटनेमध्ये दोन पर्यटकांचा मृत्यू झाला असून, दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. या बोटीमध्ये एकूण २० पर्यटक होते. त्यापैकी १८ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले. बोट बुडत असल्याचे दिसताच स्थानिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. स्कुबा डायव्हिंगवरुन परतत असतानाच या बोटीचा अपघात झाला. बोटीमधील बहुतांश पर्यटक मुंबई व पुणे येथील आहेत.

जय गजानन नवाच्या बोटीचा स्कुबा डायव्हिंगवरुन समुद्रकिनार्‍याकडे परतताना काल अपघात झाला. या अपघातानंतर बोट बुडू लागली असताना किनार्‍यावरील स्थानिकांबरोबरच तेथे उपस्थित असणार्‍या सुरक्षा यंत्रणांमधील कर्मचार्‍यांनी तातडीने हालचाल करून घटनास्थळी अन्य बोटींच्या मदतीने पोहोचले. बोटीवरील २० पर्यटकांपैकी १८ जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले; मात्र दोन जणांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. त्यांच्या नाका-तोंडामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी गेल्याने गुदमरुन त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जाते आहे. वाचवलेल्या पर्यटकांपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
आकाश देशमुख (३०, रा. अकोला) आणि डॉ. स्वप्नील पिसे (४१, रा. पुणे) अशा मृतांची नावे आहेत. ७ जणांवर सध्या इस्पितळा उपचार सुरू आहेत, तर ११ जणांना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले.