२०१४ पासून गोव्यात साधनसुविधांवर २२ हजार कोटींचा खर्च

0
20

>> केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची माहिती; आणखी ३५०० कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी

२०१४ सालापासून आतापर्यंत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने गोव्यातील साधनसुविधा विकासावर तब्बल २२ हजार कोटी रुपये खर्च केलेले असून, गोवा सरकारने ३५०० कोटींचे जे नवे प्रकल्प मंजुरीसाठी पाठवले आहेत, त्यांनाही आपण मंजुरी दिली असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. २०१४ पासून आतापर्यंत गोव्यात १५ हजार कोटींच्या विकासकामांचे लक्ष्य होते. मात्र, प्रत्यक्षात महामार्ग मंत्रालयाने या काळात तब्बल २२ हजार कोटींची विकासकामे केल्याचे ते म्हणाले.

काल दोनापावला येथील एका पंचतारांकित हॉटेलात ३८४० कोटींची गुंतवणूक असलेल्या ४९ किमी लांबीच्या सहा राष्ट्रीय महामार्गांचे आभासी पद्धतीने राष्ट्रार्पण व दोन प्रकल्पांच्या पायाभरणीचा शुभारंभ केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी राष्ट्रार्पण करण्यात आलेल्या प्रकल्पांमध्ये पत्रादेवी ते करासवाडा हा चारपदरी राष्ट्रीय महामार्ग ६६, करासवाडा ते बांबोळी हा चारपदरी राष्ट्रीय महामार्ग ६६, मडगाव पश्‍चिम बगलमार्ग, बंदराला जोडला जाणारा रस्ता, लूप-१ या प्रकल्पांचा समावेश होता, तर पायाभरणीचा शुभारंभ करण्यात आलेल्या प्रकल्पांमध्ये एनएच-१६६५ हा मोप विमानतळाला जोडणारा रस्ता व जुवारी पुलावरील निरीक्षण मनोरे यांचा समावेश होता.
२०१४ साली केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेवर आल्यानंतर गोव्याचा विकास झपाट्याने झाला. गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी जे जे प्रकल्प केंद्राकडे पाठवले, त्या सर्व प्रकल्पांना मंजुरी देऊन केंद्राने गोव्यात महामार्ग व पुलांचे जाळे विणले, असे गडकरी म्हणाले.
दर्जाशी तडजोड नाही
भाजप सरकारने गोव्यात महामार्ग व पुलांची जी कामे केली आहेत, त्यांचा दर्जा हा फार चांगला असून, त्याबाबत कोणतीही तडजोड करण्यात आली नसल्याचा दावा गडकरी यांनी यावेळी केला.

गोवा-मुंबई व गोवा-कर्नाटक
महामार्गाचे काम २ वर्षांत पूर्ण

येत्या २ वर्षांच्या काळात गोवा-मुंबई व गोवा-कर्नाटक या महामार्गांचे काम पूर्ण केले जाणार असल्याची माहिती देखील गडकरी यांनी यावेळी दिली.

भाजपमुळे राज्याचा विकास ः मुख्यमंत्री
केंद्रात व गोव्यात भाजपचे सरकार आल्यामुळे गोव्याचा खर्‍या अर्थाने विकास झाला. भाजपच्या या डबल इंजिन सरकारमुळे राज्यात हा विकास होऊ शकला. भाजपने राज्यात महामार्ग व पूल उभारून जो पायाभूत साधनसुविधा विकास केलेला आहे, तो पुढील शंभर वर्षांचा विचार करून केला आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.

जुवारीवरील नव्या पुलाचे काम पुढील सहा महिन्यांत पूर्ण होणार आहे. या पुलावर जे दोन गगनचुंबी मनोरे उभारण्यात आले आहेत, ते गोव्यात येणार्‍या जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. गोव्यात येणार्‍या पर्यटकांना या मनोर्‍यांवरून गोव्याच्या निसर्ग सौंदर्याचे दर्शन घेता येईल. या मनोर्‍यांवर आर्ट गॅलरी व रेस्टॉरंटही असेल व तेथे गोमंतकीय जेवणाचा आस्वादही पर्यटकांना घेता येईल, अशी माहिती नितीन गडकरींनी दिली.

यापुढे झाडांची कापणी
न करता पुनर्रोपण
यापुढे कुठेही महामार्गांचे बांधकाम करताना झाडे कापण्यात येणार नसून, प्रकल्प स्थळावर असलेली झाडे मुळासकट उपटून काढून त्यांचे अन्यत्र पुनर्रोपण करण्यात येणार आहे. त्यासाठीचे तंत्रज्ञान आता उपलब्ध झाले आहे, अशी माहिती नितीन गडकरींनी दिली.