१००० लोकांच्या नोंदणीनंतरच देवदर्शन

0
17

>> राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची माहिती

राज्य सरकारच्या देवदर्शन यात्रेसाठी १००० लोकांनी अर्ज सादर करून नोंदणी केल्यानंतरच देवदर्शन योजना राबवली जाणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत काल सांगितले.

राज्य सरकारच्या देवदर्शन योजनेअर्तंगत शिर्डी आणि वेलंकणी तीर्थक्षेत्री भाविकांना पाठविण्यात येणार आहे. गोवा विधानसभा निवडणुकीपूर्वी या देवदर्शन योजनेची घोषणा करण्यात आली होती. या देवदर्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी केवळ ३५० नागरिकांनी अर्ज सादर केले आहेत. या योजनेसाठी १ हजार लोकांना नोंदणी केल्यानंतर रेल्वेचे बुकिंग केले जाणार आहे. रेल्वेच्या बुकिंगसाठी सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणार्‍या नागरिकांनी उपजिल्हाधिकारी आणि समाज कल्याण खात्याकडे अर्ज सादर करावेत, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कंत्राटी कर्मचारी वार्षिक १५ दिवस रजा घेण्यास मान्यता काल देण्यात आली. कंत्राटी पद्धतीने काम करणार्‍या कर्मचार्‍यांना यापूर्वी वार्षिक रजेची तरतूद नव्हती. आता, कंत्राटी कर्मचारी वर्षाला १५ दिवसांची रजा घेता येणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
केंद्र सरकारच्या वीज योजनेखाली ट्रान्स्फॉर्मरच्या खरेदीसाठी मान्यता देण्यात आली आहे. लोकायुक्त कार्यालयात कंत्राटी पद्धतीवरील एका कर्मचार्‍याला मुदतवाढ देण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच जीएमसीच्या न्यूरोलॉजी विभागासाठी अंदाजे ११ लाख रुपये खर्चून नवीन मशीन खरेदीला मान्यता देण्यात आली. तसेच जीएमसीमध्ये कंत्राटी पद्धतीवर डॉक्टराची नियुक्तीला मान्यता देण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पोलीस तक्रार प्राधिकरणाच्या
सदस्यपदी आय. डी. शुक्ला
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत माजी पोलीस महासंचालक आय. डी. शुक्ला यांची पोलीस तक्रार प्राधिकरणाचे सदस्य म्हणून नियुक्तीला मान्यता देण्यात आली आहे. माजी आयपीएस अधिकारी आय. डी. शुक्ला यांची राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाचे सदस्य म्हणून शुक्ला यांच्या नियुक्तीचा आदेश लवकरच जारी केला जाणार आहे.