॥ मनःशांती उपनिषदांतून ॥ सूर्यशून्य प्रदेशात की प्रकाशाच्या देशात?

0
313
  • प्रा. रमेश सप्रे

 

 केवळ स्वतःच्या देहसुखाचा विचार करणार्‍या आसुरी वृत्तीपेक्षा इतरांचा विचार करणारी, दुसर्‍यासाठी त्याग करणारी दैवी वृत्ती असायला हवी. लहानपणापासूनच मुलांना ‘अहंकेंद्री’ (स्वार्थी) न बनवता ‘सहकेंद्री’ बनवलं पाहिजे. त्यांच्यावर सहकार्य, सहसंवेदना, सहजीवन, सहयोग असे ‘सह’त्वाचे म्हणजे सर्वांचा विचार करण्याचे संस्कार करायला हवेत.

 

मानवजन्माला कर्मयोनी म्हणतात. इतर पशु-पक्षी सार्‍यांची भोगयोनी असते. म्हणजे फक्त जगणं, जिवंत राहणं एवढाच उद्देश त्यांच्या अस्तित्वाचा असतो. त्यांचं सारं वर्तन हे नैसर्गिक प्रेरणांनुसार होतं. आहार, निद्रा, भय, मैथून (नर-मादी संयोग) हे त्यांच्या जीवनात महत्त्वाचे असतात. याशिवाय कोणतंही उद्दिष्ट, ध्येय, संस्कृती अशा गोष्टी त्यांच्या बाबतीत शक्यच नसतात. याउलट मानवाला कर्म करण्याचं स्वातंत्र्य आहे. त्यासाठी आवश्यक ती बुद्धी व शरीराची रचना त्याला लाभलीय. त्यामुळे चांगलं – वाईट कर्म करण्याचं म्हणजेच पुण्य- पाप करण्याचं स्वातंत्र्यही त्याला आहे, यातूनच गुण, संस्कार, तत्त्वं, मूल्यं अशा अमूर्त गोष्टी मानवाच्या जीवनात निर्माण होतात. नीती- अनीतीचा विचार त्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा ठरतो. राम, कृष्ण यांच्यासारखे देवांचे अवतार, ज्ञानेश्‍वर- तुकारामादी संत ही माणसंच होती आपल्या कृतीनं, जीवनशैलीनं त्यांनी जीवनाची अत्युच्च पातळी गाठली. असं असूनही बहुसंख्य माणसं फक्त देहाच्या सुखाभोवती, उपभोगांभोवतीच फिरत राहतात. यासाठी त्यांना हवा असतो भरपूर पैसा जो सत्ता, भ्रष्टाचार अशा मार्गांनी मिळवला जातो. यातून देहसुखं मिळाली तरी मनःशांती, आनंद मात्र मिळत नाही.

अशा फक्त देहाच्या भरण- पोषण- रक्षण याकडेच केवळ लक्ष देणार्‍या लोकांना ‘असुर’ म्हटलं जातं. ‘आसुषु रमन्ते इति असुरः’ अशी असुर शब्दाची व्याख्या आहे. ‘आसुः म्हणजे प्राण, जीव’. फक्त त्याच्यासाठीच जगायचं म्हणजे पशुतुल्य जीवन होय.

* साहित्य संगीत कलाविहीनः | साक्षात्पशुः पुच्छविषाणहीनः ॥

म्हणजे साहित्य, संगीतादी कला यांच्या माध्यमातून सुसंस्कृत बनण्याऐवजी माणूस म्हणून जन्मूनही सारं वागणं एखाद्या जनावरासारखं करायचं. अशा मंडळींना असुर म्हटलंय.

ईषावास्य उपनिषदाचे ऋषी आपल्याला सांगताहेत –

* असुर्या नाम ते लोका अंधेन तमसाऽऽवृताः |

तान् ते प्रेत्य अभिगच्छन्ति ये के च आत्महनो जनाः ॥

अर्थ – ते लोक आत्महत्या करणारे असतात जे असुरांसारखं जीवन जगतात. फक्त देह म्हणजे मी एवढीच त्यांची धारणा असते. असे लोक जिवंतपणीही नरकात असल्यासारखेच असतात, जिथं अज्ञान, दुःख, क्लेश, चिंता इ. गोष्टींचा घनदाट अंधार असतो. (ज्ञानाचा प्रकाश नसतो). हे लोक मेल्यानंतर (प्रेत्य)सुद्धा अशाच नरकासारख्या अवस्थांना प्राप्त होतात.

ऋषींचं म्हणणं स्पष्ट आहे – मनुष्यजन्मासारखी मुक्तीची दुर्लभ संधी घालवून पुन्हा पुन्हा जन्म-मरणाच्या चक्रात अडकणं ही आत्महत्याच आहे. ज्या लोकांचा जन्म-मरण चक्र म्हणजे पुनर्जन्मावर विश्‍वास नसेल त्यांच्यासाठीही हा संदेश तितकाच उपयोगी आहे. समर्थ रामदासांनी दासबोधात हाच विचार मार्मिकपणे सांगितलाय-

* अग्न गृहासि लागला | आणि हा सावकाश निजेला |

तो कैसा म्हणावा भला | आत्महत्त्यारा ॥

घराला लागलीय आग नि हा स्वस्थ, शांत, गाढ झोपून राहिलाय, अशा माणसाला भला कसं म्हणायचं? तो तर आत्महत्यारा म्हणजे आत्महत्या करणारा आहे,

एरवी आत्महत्या करतात ती एकदाच केलेला जीवनाचा शेवट असते. पण दरक्षणी जगण्याऐवजी मरणार्‍या म्हणजे आपणहून स्वतःची हत्या करणार्‍या लोकांना असुर म्हणजे राक्षस म्हणायचं नाही तर काय म्हणायचं?

राक्षस म्हणजे राखून ठेवणारा. स्वतःसाठी संपत्ती, उपभोगाची साधनं राखून ठेवतो, साठवून ठेवतो तो राक्षस. हा अतिशय लोभी, लालची असतो. याची वृत्ती गिधाडासारखी अधाशी असते, आपल्या मिळकतीतला कणभरही तो इतरांसाठी खर्च करत नाही, अतिशय संकुचित नि स्वार्थी अशी त्याची वृत्ती असते.

दुर्दैवानं आजचा सुशिक्षित मध्यमवर्ग असा असुर बनलेला आहे, शासन यांच्या उत्पन्नाचा काही भाग लोककल्याणासाठी कररूपात (टॅक्स) काढून घेतं ही गोष्टही यांना आवडत नाही, ‘माझ्या कष्टाचा, घामाचा पैसा दुसर्‍यांसाठी कशाला द्यायचा?’ असा प्रश्‍न विचारताना यांची जीभ चाचरत वा अडखळत नाही. पैसा मिळवण्यासाठी, काही सन्मान्य अपवाद सोडल्यास, आपण किती कष्ट केलेयत, किती घाम गाळलाय याचाही विचार ही मंडळी करत नाहीत.

मी – माझी पत्नी (किंवा पती) आणि असतील तर मुलं (एखादंच मूल असतं बहुतेक सर्वांना) एवढंच यांचं जग असतात. सारे जण विहिरीतल्या बेडकांसारखे कूपमंडुक म्हणजे संकुचित वृत्तीचे असतात. चांगलं खाणं, चांगलं पिणं, चांगले कपडे- दागिने घालणं, निरनिराळी स्थळं (देश- विदेशातील) पाहणं, जीवन छानछोकीत नि ऐषआरामात घालवणं एवढीच यांची जीवनाबद्दल कल्पना असते. ही जरा वरच्या पातळीवरील किडामुंगी, पशुपक्षी यांच्यासारखीच जीवनपद्धती आहे, यांना कुणाबद्दलही प्रेम, करुणा, सहसंवेदना अशा भावना नसतात, इतर कुणालाही यांच्याबद्दल कृतज्ञता, प्रेम अशा भावना नसतात. अशा व्यक्ती नि कुटुंब एखाद्या बेटासारखी असतात. सर्वबाजूंनी उपभोग सुखांचं पाणी असतं. इतरांशी काहीही संबंध नसतो.

हे फार भयानक चित्र आहे. मुख्य म्हणजे दरवर्षी यात कोटी- कोटी व्यक्तींची, कुटुंबांची भरच पडतेय. याला उपनिषदात दाट अंधकारांने ग्रासलेली नरकासारखी अवस्था म्हटलंय. याची जाणीव होण्यासाठी जे सदाचरण, सद्विचार, सद्ग्रंथवाचन नि सत्संग यांची खरी गरज असताना, या गोष्टींचं वावडं (ऍलर्जी) मात्र आहे.

जीवन हे अतिशय सुंदर आहे, या जगण्यावर शतदा प्रेम करावे- असं नुसतं आपण म्हणतो. प्रत्यक्षात चिंता, व्याधी, अशांती, अतृप्ती यांनी व्याप्त असलेलं जीवन आपण जगत असतो, याला फक्त तगणं किंवा जगणं (सर्वाय्‌व्हल) म्हणतात. ही पशूंसारखी जीवनसरणी झाली.

काही ठिकाणी ‘असुर्या नाम ते लोकाः’ म्हणजे असुरांचा लोक (प्रदेश, जग) असं म्हटलंय तर काही ठिकाणी ‘असूर्या नाम ते लोकाः’ असं म्हटलंय. याचा अर्थ असूर्य म्हणजे सूर्यशून्य, सूर्यरहित प्रदेश. अंधाराप्रदेश. प्रकाशरहित प्रदेश. इथं रमायचं का?

हल्ली लख्ख प्रकाशात नव्हे तर मेणबत्तीच्या मंद प्रकाशात जेवणं (कँडल् लाइट डिनर्), अंधार्‍या वातावरणात चित्रपट, नाटकं पाहणं, सार्‍या खाजगी (प्रायवेट) गोष्टी सर्वांपासून लपवून करणं, आपलं उत्पन्न लपवणं, फक्त आपल्यापुरतं पाहणं, जगणं हे सारं सूर्यशून्य देशातलं जिणं आहे,

प्रार्थना मात्र करायच्या – तमसो मा ज्योतिर्गमय |

तिमिरातुनी तेजाकडे, फिटो अंधाराचे जाळे, होवो मोकळे आकाश इ. इ. प्रत्यक्ष जीवनप्रवास मात्र उलट्या दिशेनं. प्रकाशाकडून अंधाराकडे . विशेष म्हणजे प्रकाश म्हणजे काय हे कळूनदेखील, प्रकाशाची पूुजा करण्याची प्रेरणा असूनदेखील तसं न करणं ही आत्महत्याच नव्हे काय?

निवड तशी उघड आहे. ‘सूर्यशून्य प्रदेशाऐवजी प्रकाशाच्या देशात राहणं’. पण निवड उघड असूनही तशी आवड नाही नि नडही नाही. मग प्रकाशाची, प्रेमाची, आनंदाची तड लागणार तरी कशी?

तेच तर पाहू या –

* प्रकाशाचा देव सूर्य. त्याची (भास्कराची) उपासना करणार्‍यांचा देश ‘भा-रत’. आपली परंपराच दान, त्याग, सहभाग नि सहभोग (सह नौ भुनक्तु) यावर आधारित आहे. सूर्य जसा प्रकाशाचं महादान देत असतो, तितकं जरी नाही तरी थोडंसं दान आपण नियमपूर्वक करायला नको का? आपल्याकडे गरजेपेक्षा खूप अधिक असलेल्या वस्तकूंचं दान कर्तव्यभावनेनं केलं पाहिजे. दाताभावनेनं नको. यात आपलंच कल्याण आहे.

* गोग्रास याचा अर्थ गाईसाठी काढून ठेवलेला भाग. उरलेलं किंवा उष्टं अन्न गाईला देणं हा गोग्रास नव्हे तर जेवणापूर्वी वाढून ठेवलेलं ताट. शक्यतो ते आपण भोजन करण्यापूर्वी गाईला देणं हा खरा संस्कार आहे, मुलांना बरोबर घेऊन हे करणं अतिशय प्रभावी आहे.

* हल्ली गाई कुठं मिळणार? अनाथाश्रमाला देणगी द्यायचीय, पण अनाथाश्रम जवळ नाही. अशा अडचणींवर सोपा उपाय म्हणजे आपल्या उत्पन्नातला काही भाग काढून ठेवणं नि तो पैशाच्या रुपात त्या त्या संस्थांना पाठवणं. हे शक्यतो नियमितपणे (दर महिन्याला किंवा वर्षाला) करणं. यामुळे् पुण्य जरी नाही (कारण काहींना पुण्य हा शब्द आवडत नाही) तरी पुण्याई म्हणजे चांगल्या वर्तनामुळे मिळणारी आत्मशक्ती, इतरांकडून मिळणारं सहकार्य मात्र निश्चित मिळते,

* सूर्य हा ज्ञान, बुद्धी, विचार यांचं प्रतीक आहे, त्याच्या देशात राहण्यासाठी ज्ञानसाधना, विद्येची उपासना करणं आवश्यक आहे. आजच्या माहिती समाजाचं (इन्फर्मेशन सोसायटी) ज्ञान समाजात (नॉलेज सोसायटी) रुपांतर झालं पाहिजे. यासाठी वाचन- मनन- चिंतन याबरोबरच एकाग्रता, ध्यान यांचीही आवश्यकता आहे.

* केवळ स्वतःच्या देहसुखाचा विचार करणार्‍या आसुरी वृत्तीपेक्षा इतरांचा विचार करणारी, दुसर्‍यासाठी त्याग करणारी दैवी वृत्ती असायला हवी. लहानपणापासूनच मुलांना ‘अहंकेंद्री’ (स्वार्थी) न बनवता ‘सहकेंद्री’ बनवलं पाहिजे. त्यांच्यावर सहकार्य, सहसंवेदना, सहजीवन, सहयोग असे ‘सह’त्वाचे म्हणजे सर्वांचा विचार करण्याचे संस्कार करायला हवेत.

* भिक्षा मागणं हे इतरांच्या कल्याणासाठी असतं. स्वतःसाठी भीक मागितली जाते. समर्थ रामदासांनी सांगितलंय की चार घरी भिक्षा मागावी. जी भिक्षा मिळेल तिचे चार भाग करावेत. एक भाग जनावरांसाठी, एक भाग पक्ष्यांसाठी, एक भाग अतिथीसाठी (जी कोणी व्यक्ती भेटेल तिच्यासाठी) नि एक भाग स्वतःच्या अन्नसेवनासाठी वापरावा. अशा रीतीनं जगल्यास असुर्या (असुरांच्या) किंवा असूर्य (सूर्य नसलेल्या अंधार्‍या) लोकात राहावं लागणार नाही. भिक्षेचाही त्यागातून भोग हे तत्त्व तसं अद्भुतच आहे., नाही का?

* नामकरण (बारसं), व्रतबंध (मुंज), विवाह (लग्न) हे केवळ विधी किंवा समारंभ नव्हेत. हल्ली सादर केला जाणारा (साजरा केला जाणारा नव्हे) इव्हेंट (प्रसंग) नक्कीच नाहीत. विशेषतः व्रतबंध केल्यावर कोणत्यातरी व्रताचं बंधन आनंदानं स्वीकारायचं असतं. काही वर्षांपूर्वी सच्च्या समाजसेवकांनी आपल्या मुलांना किंवा नातवांना मुंजीनंतर स्थानिक झोपडपट्टी, अनाथालय, महिलाश्रम, रुग्णालय इथं नेऊन तिथं आठवड्यातून काही तास प्रत्यक्ष सेवा करण्याचं व्रत घ्यायला (करायला) सांगितलं होतं. यातून जनसेवेतून आत्मोद्धार हा संस्कार मनावर ठसवला जातो. हा विचार सर्वांनीच स्वीकारायला हवा.

* ज्यांच्या जीवनात अंधार आहे अशा गरीब, वंचित, पददलित लोकांच्या जीवनात प्रकाशाच्या ज्योती पेटवणं म्हणजेच आनंद निर्माण करणं हे प्रकाशाच्या देशात जाण्यासाठी नि राहण्यासाठी उत्तम साधन आहे, यातून मनःशांतीचा मार्गही जातो.

उपनिषदांच्या काळीही असा उपदेश करावा लागणं हे मानवी वृत्तीचं लक्षण आहे. स्वतःसाठी राखतो तो राक्षस; दुसर्‍याला देतो तो देव आणि आपल्यातील भाग इतरांना देतो तो मानव. साधुसंतांना मनःशांती लाभलेली असते. तशीच ती ध्येयवादी क्रांतिकारक, वैज्ञानिक, संशोधक, तळमळीचे समाजसेवक यांनाही लाभते.

प्रकाशाच्या देशाचे कायमचे रहिवासी असतात साधुसंत. कारण येती घरा तोच दिवाळी दसरा. शिवाय ‘जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती | देह कष्टवीती उपकारें|’ असे संतमहात्मे प्रकाशाच्या देशात नुसते राहतातच असं नाही तर प्रकाशाचे नवनवे देश निर्माण करतात.