इराणने होर्मुझमधून तेल वाहतूक करणाऱ्या टँकर्सवर हल्ले केले असल्यामुळे या भागातून होणारी वाहतूक बाधित झाली आहे. त्यातच गुजरातकडे येत असलेल्या जहाजावर हल्ला झाला असून जहाजाला आग लागली. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून जहाजावरील 20 कर्मचाऱ्यांची सुखरुप सुटका करण्यात आल्याचे वृत्त आहे. बुधवारी 11 मार्च रोजी होर्मुझच्या सामुद्रधुनीत थायलंडचा झेंडा असलेल्या ‘मयूरी नारी’ या महाकाय मालवाहू जहाजावर अज्ञात क्षेपणास्त्राने भीषण हल्ला केला. या हल्ल्यात हे जहाज आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. जहाजाला झालेल्या नुकसानाबद्दल अद्याप सविस्तर माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, आता या हल्ल्याविरोधात भारताने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हे कृत्य अत्यंत संतापजनक असल्याचे सांगत भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने जहाजावरील हल्ल्याचा निषेध केला आहे. व्यावसायिक जहाजांना लक्ष्य करणे ही अत्यंत चिंताजनक बाब असल्याचे भारताने म्हटले आहे. या हल्ल्यांमुळे निर्दोष नागरिक आणि भारतीय कर्मचाऱ्यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाल्याचे भारताने म्हटले आहे.