हैदराबाद पोलिसांकडून ड्रग्स प्रकरणी दोघांना अटक

0
10

अमली पदार्थांसंबंधीच्या तपासकामात गोवा पोलिसांकडून कोणतेही सहकार्य मिळत नसल्याचा आरोप करणार्‍या हैद्राबाद पोलिसांनी काल हणजूण येथे स्टीव्ह डिसोझा या रेस्टॉरंट मालकाला अमलीपदार्थप्रकरणी अटक केली. स्टीव्ह डिसोझा हा हणजूण येथील प्रसिद्ध हिल टॉप या रेस्टॉरंटचा मालक आहे. यावेळी हैद्राबाद पोलिसांनी तुकाराम साळगावकर यालाही अटक केली आहे. अमलीपदार्थविरोधी कायद्याखाली दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी हैद्राबाद शहर पोलीस आयुक्त सी. व्ही. आनंद यांनी गोवा पोलीस अमलीपदार्थ व्यवहारप्रकरणी हैद्राबाद पोलिसांना हव्या असलेल्या आरोपींना पकडण्यासाठी सहकार्य करीत नसल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली होती. हैद्राबाद येथील अमलीपदार्थ व्यवहारांत गुंतलेल्यांकडून आम्हाला गोव्यातील या व्यवसायातील मोठ्या हस्तकांची माहिती मिळाली होती; मात्र यासंबंधी गोवा पोलिसांना माहिती देऊनही त्यांनी त्यांना अटक करण्यासाठी कोणतेही सहकार्य केले नसल्याचा आरोप हैद्राबाद पोलिसांनी केला होता.