हे मृगा, ये मृगा!!

0
39
  • मीना समुद्र

हे मृगा, तुझे सर्वांगसुंदर रूप सार्‍या सृष्टीला दावीत ये. तुझे चपल चरण चौखूर उधळीत ये… तुझे वात्सल्य, तुझी करुणा या सृष्टीवर उधळीत ये… या धरणीवर तुझी आभाळमाया रसत ये… तुझी शांत, शीतल छाया पसरीत ये… धरतीशी तुझे रेशिमबंध जडवीत ये… स्नेहल करांनी जगताचे जीवन घडवीत ये… तुझी चंदेरी, रुपेरी पावले मातीच्या कणाकणात रोवीत ये… तिने आपल्या आत आत सांभाळलेली सृजनबीजे रुजवीत ये. ये मृगा ये… धावत ये, पळत ये….

ये मृगा ये!
आमचे डोळे तुझ्याच वाटेकडे लागले आहेत. आमचे कान तुझीच चाहूल घेत आहेत. आमचे हात तुझ्यासाठी जोडले गेले आहेत. आमच्या मनातून फक्त तुझ्यासाठी प्रार्थना उमटत आहे. आमचे सर्वांग तुझ्या, केवळ तुझ्या स्पर्शासाठी आतुरलेले आहे.
…ये मृगा ये!
अश्‍विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृगशीर्ष, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्‍लेषा, मघा, पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाती, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा, शततारका, पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा, रेवती या नक्षत्रमंडळात तुझे स्थान पाचवे. पण अत्यंत महत्त्वाचे. ‘मृगशीर्ष’ या नावाचे तुझे नक्षत्र पाऊस घेऊन येते. जलसंजीवन देते. त्यामुळे तू सगळ्यांचा जीव की प्राण. तुझा डौल आगळा, तुझा नूर वेगळा. तुझे अतिसुंदर, कल्याणकारी, मनोहारी रूप आम्हा सर्वांनाच भावते; अगदी मनापासून. म्हणूनच तुझे सर्वांगसुंदर रूप सार्‍या सृष्टीला दावीत ये. तुझे चपल चरण चौखूर उधळीत ये… तुझे वात्सल्य, तुझी करुणा या सृष्टीवर उधळीत ये… या धरणीवर तुझी आभाळमाया बरसत ये… तुझी शांत, शीतल छाया पसरीत ये… धरतीशी तुझे रेशिमबंध जडवीत ये… स्नेहल करांनी जगताचे जीवन घडवीत ये… तुझी चंदेरी, रुपेरी पावले मातीच्या कणाकणात रोवीत ये… तिने आपल्या आत आत सांभाळलेली सृजनबीजे रुजवीत ये. ये मृगा ये… धावत ये, पळत ये… तुझे ब्रीद सांभाळीत ये…

‘नेमेचि येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा’ असे म्हणणार्‍या प्रामाणिक कवीचा विश्‍वास खोटा ठरवू नकोस. ऋतुचक्राच्या फेर्‍यातली तुझी वाट कुठे चुकली? का असा थांबला आहेस? कुठे बरे अडला आहेस? कुणी तुला फसवले आहे? कुठल्या जाळ्यात तुझे पाय अडकले आहेत? काही असले तरी तुझ्याविना आमचा निभाव लागणार नाही हे तुला चांगलेच ठाऊक आहे. आणि आमची स्थिती तर तुला चांगलीच ठाऊक आहे. तुझे शुभारंभी पाऊल केवढे सुखद आहे आमच्यासाठी… त्याची चाहूल आम्ही किती उत्सुकतेने, किती उत्कंठेने घेत आहोत हे कळते आहे ना तुला? तू उदारहस्त. मग तुझे हात कुणी बांधून घातले आहेत?
चैत्रसखा वैशाख आम्ही खूप उपभोगला. सृष्टीतल्या फळाफुलांचे रसपान आणि सौंदर्यपान केले. ‘तेजोनिधी लोहगोल भास्कर हे गगनराज’ म्हणून आम्ही त्या झळाळत्या सूर्याची स्तवने गायली. खरे आहे की त्याच्या दिव्य तेजाने हे भुवन झगमगून उठते. कोटी-कोटी किरणांचे अग्निबाण अमृतकण होऊन आमचा अणुरेणू उजळतात. त्याच्या दाहक पण संजीवक असणार्‍या ज्योतिर्मय मूर्तीतून किरणांची दिव्य प्रभा फाकून जीवनाचा विकास होऊ दे अशी विनवणीही करून झाली. पण हे मृगा, आता ते तेज अतिदाहक बनले आहे. चैतन्य देणारे चैत्री ऊन वैशाखात सारे अनिष्ट नष्ट करते. पण ते आता खूपच त्रासदायक बनले आहे. फक्त मानवप्राणीच नव्हे तर चराचर सृष्टीच आता त्रासून गेली आहे. मदोन्मत्त सम्राटाचा ससेमिरा सार्‍यांच्याच मागे आहे. हा ताप, हा अग्निदाह आता असह्य झाला आहे… घडोघडी ‘कुमारसंभवा’तल्या पंचाग्निसाधन करणार्‍या उमेची आठवण येत आहे.

सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत चढत्या-वाढत्या झळा छळाचे रूप घेत आहेत. उष्म्याने धरणी कोरडीठक्क बनून तिला भेगा पडल्या आहेत. हिरवी सृष्टी हतबल झाली आहे. सारे चैतन्य हरवून बसली आहे. या उष्म्याने सगळे प्राणिजन हताश, निराश झाले आहेत. आवडेल का तुला तुझी सृष्टी अशी हतबल झालेली? पाहवेल का तुझ्या दयार्द्र नजरेला तिची करपून कोळपून दुर्दशा झालेली? साहवेल तुझ्या दयाघन हृदयाला तिची ही अवस्था? तुझ्या मेघाला महाकवी कालिदासानं किती गौरवलं आहे! ‘संतप्तानां त्वमसि शरणं’ म्हणून तुझी शुभागमनी सावळी पावलं किती विनम्रतेनं वंदिली आहेत! तूच खरोखर जगताचा त्राता आहेस. मृगा, जल हेच जीवन. जल हेच संजीवन. असे हे संजीवनाचे थेंब तू नेहमीच देत आला आहेस. सृष्टीचे प्राणभूत असणारे जलतत्त्व- ते ईश्‍वरी वरदान देण्याचं काम. त्याचा मुळारंभ तुझ्यापासून होतो. त्यामुळे तू आम्हाला प्राणप्रिय आहेस. मृगा, तूच आहेस सृजनकर्ता, दुःखहर्ता. तापहरण, तापशामक, तापनाशक, तृषाशमन करणारा… अन्न, धनधान्य, घास-चारा देणारा भर्ता, विकसन करणारा, उपचार उपकारकर्ता सुखकर्ता, वनलक्ष्मी, धनलक्ष्मी, सौंदर्यलक्ष्मी, संतानलक्ष्मी सारे तुझ्यापासून सुरू होते. विकास, विलास, सृजन, नर्तन, गायन सारे तुझ्यामुळे शक्य होते. हिरवाईची आस, मार्दव, लाघव, तृप्तता, शांतताही तुझ्यामुळेच मिळते.

हे मृगा, आता सारेच बदलले आहे. माणसाची मनमानी, त्याची स्वार्थांधता, त्याची मदांधता, त्याची बेपर्वा वृत्ती यामुळे झालेली निसर्गाची जीवित आणि वित्तहानी यामुळे तू बिचकत असशील. आता चांगला धडा शिकवावा म्हणून तू सज्ज झाला असशील. त्यामुळेच या बेबंद वृत्तीला आळा बसावा असे तुला नक्कीच वाटले असेल; पण निरपराधांनाही त्यामुळे जास्त शिक्षा मिळते असे तुला नाही का वाटत? थोडाफार कालावधी इकडेतिकडे ठीक आहे; पण गेल्या दोन वर्षांत उडालेल्या हाहाकारामुळे डोकी थोडीफार ताळ्यावर आली आहेत, येत आहेत. निसर्ग जपण्याचे, हानी होऊ न देण्याचे व्रत काहींनी अंगीकारले आहे. आम्ही झाडे लावतो आहोत. त्या प्राचीन ऋषितुल्य झाडांचे सत्त्व राखण्यासाठी तरी ये मृगा ये. तुझ्या संतानांच्या चुका पोटात घालून त्यांना नवीन बळ, नवीन सामर्थ्य देण्यासाठी ये. तुझा आशीर्वाद सर्वांना हवा आहे. तू ये मृगा ये. तुझे सहर्ष स्वागत होईल. तुझा शब्द मनामनांत अन् मातीच्या कणाकणात रुजवून घेऊन आमचे पाऊल पुढे पडेल.

हे मृगा, तुला माहीत आहे ना ती बिरबल बादशहाची कथा? २७ या अंकातून ९ उणे केले तर किती उरतील? या बादशहाच्या प्रश्‍नाचे उत्तर बिरबलाने एका झटक्यात सत्तावीस नक्षत्रांतून पावसाची नऊ नक्षत्रे वजा केली तर बाकी शून्य राहील असे उत्तर दिले होते. जगज्जीवना, त्याच्या हजरजबाबीपणाची दखल तू घेशील ना? तुझ्यापासून पाऊसपाण्याची सुरुवात होते. तुझे इवले इवले दूत- मिरगाचे किडे मातीतून आपल्या सोंडा वर काढतात आणि तुरूतुरू इतस्ततः फिरू लागतात. हा निसर्गसंकेत मिळाला की बळीराजा पेरणीला सुरुवात करतो. हे तुझे शुभलक्षणी मिरगाचे/मृगाचे किडे म्हणजे बीजपेरणीचा शुभारंभ. आता पाऊस चांगला पडेल आणि आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्‍लेषा, मघा, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, हस्त, चित्रा, स्वाती ही नक्षत्रे कालमानानुसार कमीजास्त प्रमाणात बरसतील.

ये मृगा ये!
आमच्या मराठी महाकवीने रेखाटलेले तुझे काव्यात्मक शब्दचित्र पाहायला ये, वाचायला ये. तुझ्या तुषारांना त्यांनी माउलीच्या दुधाची उपमा दिली आहे आणि तहानलेली, भुकेजलेली शेतेशिवारे तोंड पसरून ते दूध पीत आहेत असे म्हटले आहे. तू येतोस तेव्हा मेघांचे पडघम झडतात, सोन्याच्या कसाचा दगड असल्यासारख्या श्यामल मेघांवर बिजली कडाडते, वारा सुसाटतो, घोंघावतो… तो पिऊन खोंड वारेमाप धावतो. आणि तुझ्या जलदानाने संतुष्ट झालेल्या धरणीने कृतज्ञतेने अर्पण केलेला तिचा हृदयगंध, तिचा मृद्गंध दरवळ सगळीकडे पसरतो. त्या वासाने खोंड स्तब्ध होतो. मनाला शांत, सुगंधी वाटते. तू तसा खराच अत्तरिया आहेस. लपलेल्या सुगंधाला तू जाग आणतोस. पहिलेवहिले टपोरे थेंब पंखावर झेलत पक्षी खुशीने मातीत खेळतात, बैल वशिंड हालवतो, गाय वत्साला हंबरून बोलविते इतका तिचा पान्हा तटतटतो. निसर्गाने दिलेले धन दुसर्‍याला द्यावे हा धडा पागोळ्या शिकवतात आणि आपल्यावर साठलेले पाणी अंगणाला देतात. मुलंबाळं तुझ्या वर्षावात हर्षाने हात पसरून ‘काळ्याबाळ्या’ करतात. तुझ्या कृपेच्या वर्षावात सुस्नात झालेली धरणी अन्नब्रह्माच्या पूजेला बसते आणि बळीराजा आता शेतं पिकतील या विश्‍वासानं निःश्‍वास टाकतो.

हे मृगा, तू आहेस तसा चंचल, खट्याळ… कधीकधी आता वर्षा होईल असे नाट्य घडवतोस. मेघाच्छादित आकाश पाहून मनमनाची तल्खली वाढत असतानाच बरसण्याचे विसरून तू ढगांना पळवून लावतोस आणि आपला बळीराजा, तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसलेला शेतकरी-
थांब थांब परतू नको रे घना कृपाळा
अजुनी जाळतोच जगा तीव्र हा उन्हाळा
अशी तुझी याचना करतो. आमच्या शेतीप्रधान देशातल्या गरीब शेतकर्‍याला सधन-संपन्न करणे हे मृगा केवळ तुझ्या हाती आहे. पावसाळी नक्षत्रांचा तू मुखिया आहेस. तुझ्या पावलावर पाऊल टाकून वेळेवर सर्व नक्षत्रांनी वर्षाव केला तर अवर्षण, दुष्काळ, कुपोषण कुठल्या कुठे पळून जाईल. सर्वत्र आबादीआबाद होईल आणि तुला सर्वांचे धन्यवाद मिळतील.

हे मृगा! तुझा डौल न्यारा. तुझे तेज न्यारे. तुझ्याच छायेमायेत वाढणारे, नांदणारे आम्ही सारे! मृगा, चार पावले पुढे दौडून पुन्हा मागे वळून पाहण्याची तुझी लकब माहीत आहे आम्हाला. वादळवार्‍याचे निमित्त करून पुढेपुढेच दौडू नकोस. तुझी वाट, तुझं येणं लांबवू नकोस. सारे जीवन ठप्प करू नकोस. जलाविना माणसे, मुकी जनावरे, सानपाखरे तरसत-तडफडत असताना निष्ठुर होऊन जाऊ नकोस. झाडापानाफुलांना जीवदान दे. सार्‍यांचे आयुष्य सुफलसंपूर्ण कर. सुगंधी, संपन्न कर. सुखी, स्वावलंबी कर. नुसतेच मृगजल नको दाखवू. उन्हातान्हातून फिरताना सर्वांनी त्याचा अनुभव घेतला आहे. घोटभर पाण्यासाठी नरटीने झरे-ओहोळ खरवडणारी, पाण्याअभावी निष्प्राण झालेली माणसे, पशुपक्षी तुला दिसताहेत ना? त्यांना संजीवनाने संतुष्ट, शांत करायला ये. ये मृगा ये! मंदिरात, घरादारांत तुझ्यासाठी अभिषेकपात्रे धरली गेली आहेत. तीर्थाचे पाणीच काय, डोळ्यात पाणी ऊरू नये अशी अवस्था करू नकोस. ‘अवस्था लावोनि गेला, अजुनी का न ये’ अशी धारणा होऊ देऊ नकोस. कृपावंत होऊन ये, दयावंत होऊन ये. गरजत ये, बरसत ये. ‘पड पड रे पावसा, होऊ दे ना वली माती गायीच्या चार्‍यासाठी, कुणबी झाला काकुळती’ अशा सार्‍यांचेच मनोगान समजून घे. उमजून घे. मोती पिकवायला आसुसल्या मातीवर आता कोसळ. ही जिवाची तल्खली मिटव. चातकचोतीत तुझे जलबिंदू पडू देत. जगाला अमृतसिद्धीचे पसायदान दे. ये मृगा ये! ये मृगा ये!!