ही जगण्याची श्रावण धून…

0
54
  • डॉ. अनुजा जोशी

श्रावण महिना म्हणजे भक्तिरसात भिजलेला रंगारंग जल्लोषाचा व आनंदाचा तर आहेच, मनभावन गाणे गाणाराही आहे, पण बुद्धीला सुविचारांचे खतपाणी देणाराही आहे. जीवनमूल्यांना भक्कम आधार देणाराही आहे. तो नव्या नजरेने वाचायला हवा. हिरव्या पावसातची रंगीत श्रावणधून यासाठीच नवीन होऊन श्रद्धेने गायला हवी!

किती पावसाळे बघितले त्यावर आयुष्यातला अनुभव ठरतो आणि किती श्रावण बघितले त्यावर आयुष्यातल्या अनुभवांचं सौंदर्य! किंबहुना किती बघितले म्हणण्यापेक्षा श्रावण कसे बघितले, श्रावण कसे साजरे केले यावर आयुष्य कसं जगलंय हे ठरतं असं म्हटले तरी वावगं ठरणार नाही. पावसाळा बघणं म्हणजे अवघं जीवन बघणं. रूजणं, वाढणं, फुलणं, बहरणं, विस्तारणं, संघर्ष करणं, धडपड, पडझड, कोलमडणं, वादळवाटांवर उभं राहाणं, तग धरणं असं सगळं एका पावसाळ्यात अनुभवता येतं. आणि हे सगळं किती श्रद्धेने, सात्त्विकतेने, समरसून आणि रसरसून अनुभवलंय हे एक श्रावण सांगतो. श्रावण हे जगण्याच्या कंठातलं ओलं हिरवं गाणं आहे. श्रावण हा सोनसळी सुखाचा स्पर्श आहे. श्रावण श्रद्धेचं रूप आहे. भक्तीची चव आहे. श्रावण हा आनंदाचा गंध आहे. म्हणून असंही म्हणता येईल की, पावसाळा बघणं म्हणजे जगणं आणि श्रावण बघणं म्हणजे सजणं!
उन्हाळ्यातल्या कडक उन्हाची काहिली संपते. क्षितिज काळंसावळं होतं. जड होतं. ओथंबतं. वारा ओलागार वाहू लागतो. काळेभोर ढग मनसोक्त बरसतात. उष्ण वाफांबरोबर सगळी तगमग उडून जाते. मृगाचा गारवा पसरतो. माती पोटुशी होते. रूजते. अंकुरते. कंचओल्या तुंबळ पावसात सचैल न्हाऊन निघते. तिच्या कुशीतून नव्या नवलाची हिरवळ उगवते. पानापानांत, रानावनांत आणि मनामनांतही हिरवा उत्सव सुरू होतो. पाऊसराजाची मिरवणूक आपल्या नऊ नक्षत्रांना घेऊन वाजतगाजत निघते.

मृग, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा, उत्तरा आणि हस्त ही ती पावसाची नऊ नक्षत्रे. इथे अकबर-बिरबलाची गोष्ट आठवते ना? अकबर बादशाह दरबारात प्रश्न विचारतो, ‘सत्तावीस वजा नऊ किती?’ तर बाकीचे सगळे उत्तर देतात, ‘अठरा!’ बादशाह म्हणतो चूक! सर्वांना आश्चर्य वाटतं. चूक कसं काय? मग बिरबल अचूक उत्तर देतो- ‘सत्तावीस वजा नऊ, शून्य!’ पुन्हा सगळे आश्चर्यचकित होतात. असं कसं काय? तर बिरबल सांगतो, सृष्टिचक्राची एकूण नक्षत्रे 27, त्यातून पावसाची 9 नक्षत्रे वजा केली तर बाकी काय उरते? शून्यच ना! किती योग्य उत्तर. अकबराला बिरबलाने दिलेलंच उत्तर नव्हे तर जगण्याच्या हर एका प्रश्नाचं ‘पाऊस’ हेच सार्थ व समर्पक उत्तर. सृष्टिचक्रातून ‘पाऊस’ वजा केला तर शून्यच बाकी उरेल ना?
जगण्याच्या प्रश्नाचं ‘पाऊस’ हे उत्तर तर मिळालं, पण खरी मजा पुढेच आहे. ‘पाऊस’ हे उत्तर जगणाऱ्या हर एका जिवाने आपापल्या शैलीमध्ये आपापल्या कागदावर कसं लिहिलं त्याचीही पुढची गोष्ट ऐकायला हवी. ‘पाऊस’ हे उत्तर झाडांनी हिरव्या शाईने आपल्या पानांवर लिहिलं. फुलांनी सुगंधी शाईने पाकळ्यांवर लिहिलं. पाखरांनी रंगीत शाईने पंखांवर लिहिलं. प्राण्यांनी तलम तुकतुकीत शाईने आपल्या पाठीवर लिहिलं. कीटकांनी, जीवजंतूंनी आपल्या तुडतुडत्या- गुणगुणत्या- भिरभिरत्या- किडुकमिडुक लिपीमध्ये आपापल्या श्वासांवर लिहिलं. मुखाशी आलेल्या इवल्या इवल्या घासांवर लिहिलं. माणसाने काय केलं? कसं लिहिलं? माणसाने प्रत्येकाची बोली, भाषा, लिपी शिकून घेतली. तो बोलू लागला. लिहू लागला. नाचू-गाऊ लागला. वाजवू-सजवू लागला. माणूस पानांवर, दगडांवर, कागदावर लिहू लागला. झाडांचं हिरवं उत्तर गाण्यातून गाऊ लागला. फुलांचं रंगीत उत्तर वाद्यांतून वाजवू लागला. पंखांचं भरारतं उत्तर भक्तीत भिजवू लागला. जीवजंतूंच्या जगण्याचं उत्तर आपल्या जगण्यात श्रद्धेने सजवू लागला.

सृष्टीतल्या प्राणिमात्रांनी जगण्याची ‘कृती’ केली; माणसाने आपल्या जगण्याची ‘संस्कृती’ केली.
उष्ण कटिबंधात, नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी वाहून आणलेल्या पावसात, लाल-काळ्या मातीत, हिरव्यागार रूजलेल्या आपल्या कृषिप्रधान संस्कृतीने ‘पाऊस’ हे जगण्याचं उत्तर पुराणकाळापासून एका वेगळ्या भाषेत लिहिलं. ईश्वरतत्त्वावरच्या श्रद्धेय शब्दात सांगितलं. जीवनभक्तीच्या गाण्यात गायलं. जगण्याच्या त्या सुंदर रंगीबेरंगी ओल्या गाण्याचं नाव श्रावण!
मृगनक्षत्राचा पाऊस हरणाच्या पावलांनी मातीवर बागडून जातो. शेतात पिकाची पेरणी होते. हिरवागार तरवा तरारतो. आर्द्रा नक्षत्राच्या थपथपीत यथेच्छ पावसात मनमुराद भिजतो. कोंबरी-कोंबरीत जीव धरतो. पावसाच्या दुधाने हवेचं दही होतं. मातीचं लोणी होतं. लोण्यासारख्या चिखलात पुनर्वसू नक्षत्रात तरव्याचं पुनर्वसन होतं. गच्च तरवा पाय पसरून सुटा सुटा होतो. मळ्यांत, कुणग्यांत त्याची लावणी होते. पुनर्वसूत झालेला तरवा वादळमारात तग धरतो. टिकतो. ताठ उभा राहतो. पीक होऊन डोलू लागतो. पुष्यनक्षत्र पिकाचं भरण-पोषण करू लागतं. पीक पोटरीशी येऊ लागतं. धष्टपुष्ट होऊ लागतं. मग ‘हसळसा’ लागतात. ‘आश्लेषा’ नक्षत्र लागतं. बाळपाऊस, सुकुमार पाऊस आता तरुण होतो. हसळसांचा पाऊस हसत हसत घसघसत येतो. ऊन-पावसाचा रिमझिमता चमचमता खेळ चालू होतो. संगतीला श्रावण घेऊन येतो. लावणी होऊन पिकानं मुळं घट्ट धरलेली असतात आणि शेतकामातून घडीभर विसावा मिळालेला असतो. बारीकसारीक नडणी, काढणी करून झालेली असते. राबल्या जिवाला थोडी उसंत मिळालेली असते. बरोब्बर याच दरम्यान कष्टकऱ्यांच्या हातांचं ओझं घडीभर उतरवायला, चार निवांत हिरवे क्षण घेऊन श्रावण येतो. आता पिकाच्या दुधाळ दाण्यांची लोंबी आशेने बघायची असते. कणसात दाणा भरायची वाट बघायची असते. सगळी श्रद्धा, सगळी आस पणाला लावायची. आभाळावर भरवसा ठेवायचा. मातीवर विश्वास ठेवायचा. वाऱ्यावर मदार ठेवायची. चमकत्या उन्हासारखी इच्छा लखलखत ठेवायची. असोशीने पेरलेलं, कष्टानं रूजवलेलं, घामानं फुलवलेलं सत्कर्म फळाला येईलच अशी डोळस श्रद्धा बाळगायची. देवाचं नाव घ्यायचं आणि एकेक दिवस जगण्याचा एकेक नेम, एकेक व्रत करायचं. आषाढ- श्रावणापासून सुरू झालेल्या चातुर्मासाचा वसा वसायचा. श्रावण जगण्याची ही सकारात्मकता घेऊन येतो.

आषाढातल्या देवशयनी एकादशीला सृष्टीचे पालनकर्ता भगवान विष्णू झोपी जातात. आता पुढचा चार महिन्यांचा काळ सृष्टीवर महादेव श्रीशंकराचे राज्य. शिव हे शुभंकर, कल्याणकारी तत्त्व आहे. सृजनात्मक ब्रह्मतत्त्वाने रूजवण केलेल्या, वर्धिष्णू विष्णुतत्त्वाने पालन-पोषण करून फुलवलेल्या सृष्टीला सुफळ संपूर्ण करण्याचे कल्याणकारी काम आता शिवाने करायचे असते. ज्याच्या मस्तकी विधायकासाठी संहार करणारा तिसरा डोळा आहे, त्या शिवाच्या मुठीत कल्याणकारी शक्तीही आहे. त्या सांबसदाशिवाच्या हाती सृष्टीचे कल्याण सामावलेले असण्याचा चार महिन्यांचा काळ म्हणजे चातुर्मास. या काळात वेगवेगळी व्रतं-वैकल्ये करतात. श्रावण महिन्यातले नेम, निष्ठा, वसे खूप भक्तिभावाने चालतात. पूर्वीच्या काळी लहान वयात मुलामुलींची लग्ने होत. मासिक पाळीही न आलेल्या मुली सासरी नांदायला जात. रूढी-परंपरांमध्ये अंधपणे अडकलेल्या समाजामध्ये स्त्री ही शोषित घटक होती. विवाहसंस्था, कुटुंबसंस्था व एकूणच समाजव्यवस्थेने स्त्रीवर अन्यायकारक बंधने लादलेली होती. यच्चयावत सगळे सण, उत्सव, प्रथा, परंपरा, व्रत, वैकल्ये या साऱ्या स्त्रियांनी करण्याच्या गोष्टी, असाच प्रवाह आजवर वाहत राहिला. आता मात्र स्त्रीच्या जाणिवा, आत्मसन्मान, आत्मनिर्भरता व हक्कांचा बराच बोलबाला झाल्यानंतर नव्या काळात या पौराणिक धार्मिक गोष्टींकडेही नव्या वेगळ्या नजरेने बघितले जायला हवे. आज या जुन्या गोष्टी जुन्या म्हणून टाकून न देता त्या तर्कसुसंगत करून नव्या रूपात नव्या काळाशी जोडून घ्यायला हव्यात. श्रावणमासातल्या व्रत-वैकल्यांमधला भाव, आशय व विचार समजून घेऊन स्त्री-पुरुष दोघांनीही त्यात सकारात्मक सहभाग द्यायला हवा. काही छान उदाहरणांवरूनच जुन्या गोष्टींचा नवा विचार कसा करायचा हे पाहिले तर? जुन्या गोष्टींशी नवा काळ कसा बांधायचा हे मनापासून समजून-उमजून घेतले तर? बघूयाच काही उदाहरणे.

श्रावणी सोमवारच्या ‘शिवामुठीचे व्रत’ हे एकसंधतेची, एकत्रितपणाची, नात्यातल्या बांधिलकीची विधायक धारणा तर देतेच, शिवाय इथे ‘मूठभर’ या परिमाणातली प्रतीकात्मकताही लक्षात घेण्यासारखी आहे. एकेका सोमवारी तांदूळ, तीळ, गहू, जवस असे मूठभर धान्य पिंडीवर वाहून शिवामुठीचं व्रत करण्याची प्रथा आहे. मूठ ही आपली क्षमता आहे. सामर्थ्य, बळ, दानत सारं काही आहे. किंवा अगदी हव्यास, लोभ, मोहही केवढा हवा? मुठीएवढाच! माफक, अवाजवी नाही. मूठभर दान द्यावं. द्यायचंय तर जास्तीत जास्त कितीही द्या, पण कमीतकमी मूठभर तरी द्या. आणि शिवामूठ घालताना तर सव्वा मूठ धान्य पिंडीवर घालतात. आपण दहा, पन्नास, शंभर, पाचशे असे दान न देता वर एक रूपया घालतो आणि त्याचे अकरा, एकावन्न, एकशे एक, पाचशे एक करून देतो. वरचा एक रुपया हा दिले त्यापेक्षा अधिक दान देण्याच्या प्रवृत्तीचे प्रतीक असे म्हणता येते. शिवामुठीतही एक मूठ धान्य घातल्यावर, वर आणखी चिमटीभर धान्य घालून मुठीची सव्वामूठ करून देण्याची वृत्ती जोपासायला सांगितलं आहे. सव्वामूठ धान्य किंवा सव्वामूठ शिधा हा एकावेळी एका माणसाच्या भुकेचा घास होऊ शकतो. अन्नदानासारखे कल्याणकारी दान आणखी कोणते? शेतात नव्या पिकात, कणसात दाणा भरला जात असताना घरातल्या जुन्या धान्याचे एक भूक भागेल एवढे मूठ-मूठ दान श्रद्धेने करण्याइतकी सहिष्णू गोष्ट दुसरी कोणती? धार्मिक, आध्यातिक, सांस्कृतिक गोष्टी अशा जीवनमूल्यांच्या आधारावर शतकानुशतके भक्कमपणे उभ्या आहेत. काळाच्या ओघात या गोष्टींमागचा भाव व विचार मागे पडला व भोवतीच्या झुली-झालरी नि अवडंबरे तेवढी शिल्लक राहिली.

श्रावणात येणारे सगळे सण, प्रथा, रूढी या जगण्याच्या मूल्यांची जोपासना करणाऱ्या आहेत. आरोग्याविषयी मार्गदर्शन करणाऱ्या आहेत. नातेसंबंधांतले ताणेबाणे, समस्या सोडवण्यासाठी सुविचार देणाऱ्या आहेत. साधारणपणे कोणत्याही व्रताची एक पूजा असते. पूजा झाल्यावर मनोभावे आरती करून व्रताची कहाणी वाचायची, ऐकायची असते. या कहाण्या म्हणजे अनुभव असत. अनुभवाचे बोल असत. जाणत्यांनी नेणत्यांना केलेलं हे समुपदेशन असे. त्याकाळची ती स्पेशल कौंन्सेलिंग सिस्टीमच होती असे म्हणायलाही हरकत नाही. शिवाय या सगळ्याला असणारं भक्तीचं, श्रद्धेचं अधिष्ठान कुटुंबाला कठीण प्रसंगातून, समस्यांतून पार होण्याची शक्ती देणारं असे. जगण्याच्या विविध समस्यांची सोपी सोपी उत्तरं म्हणजे या श्रावणातल्या व्रतांच्या कहाण्या आहेत.

‘खुलभर दुधाच्या कहाणी’तला राजा राज्यातलं सगळं दूध पिंडीवर घालूनही गाभारा भरत नाही म्हणून दु:खी असतो. तर एक म्हातारी घरात भुकेने रडणाऱ्या पोराच्या तोंडात अर्धा पेला दूध घालते आणि उरलेलं अर्धा पेला म्हणजे ‘खुलभर दूध’ राजाच्या अभिषेकासाठी घेऊन येते व पिंडीवर घालते. त्याक्षणी गाभारा दुधाने भरून जातो अशी गोष्ट आहे. कर्तव्यबुद्धीने संसार नेटका करत करत केलेलं छोटं-मोठं सामाजिक काम हीच ईश्वरसेवा, हेच पुण्य असल्याचं भान ही कहाणी देते. शुक्रवारच्या कहाणीत संकटाला धीराने सामोरी जाणारी, नात्यातला गोडवा कटू होऊ न देता जपणारी स्त्री आहे. वर्णसठीच्या कहाणीत स्वत:च्या क्षमतांवर विश्वास असणारी स्त्री आहे.

मंगळागौरीच्या कहाणीत सासूने सुनेचा मोठेपणा मोठ्या मनाने स्वीकारला आहे. नागपंचमी, वसुबारसेच्या कहाणीत नैसर्गिक संपत्तीच्या रक्षणाची दृष्टी दिली आहे. ज्येष्ठागौरीच्या, बुध बृहस्पतीच्या, शिळा सप्तमीच्या कहाणीत पुरुषांचाही सहभाग आहे. मला हे खूप महत्त्वाचे वाटते. एकेक कहाणी वेगवेगळे सामाजिक, कौटुंबिक, आर्थिक, भावनिक, आरोग्यविषयक समस्या व दु:ख सांगते. त्या समस्येचे निराकरणही करते. संस्कृतीने दिलेले हे जगण्याचे सार व संचित त्यातले दोष काढून टाकून नव्या काळाला उपयुक्त करून वापरायला हवे.
श्रावण महिना म्हणजे भक्तिरसात भिजलेला रंगारंग जल्लोषाचा व आनंदाचा तर आहेच, मनभावन गाणे गाणाराही आहे, पण बुद्धीला सुविचारांचे खतपाणी देणाराही आहे. जीवनमूल्यांना भक्कम आधार देणाराही आहे. तो नव्या नजरेने वाचायला हवा. हिरव्या पावसातची रंगीत श्रावणधून यासाठीच नवीन होऊन श्रद्धेने गायला हवी!