Home आयुष स्वयंपाकघरातील प्रथमोपचार द्रव्ये

स्वयंपाकघरातील प्रथमोपचार द्रव्ये

0
  • डॉ. मनाली महेश पवार

स्वयंपाकघर हे आपलं प्रथमोपचार केंद्रच आहे. परंतु स्वयंपाकघरात उपलब्ध असलेली द्रव्ये कशी वापरावी, किती वापरावी, कशावर वापरावी याचे योग्य ज्ञान हवे. पहिल्या भागात आपण ओवा, सुंठ याबद्दल माहिती करून घेतली. आता अन्य काही द्रव्ये पाहू-

प्रथमोपचार म्हणजे अपघात किंवा आजार झाल्यावर व्यावसायिक वैद्यकीय मदत मिळेपर्यंत जखमी किंवा आजारी व्यक्तीला दिलेली पहिली आणि तत्काळ मदत होय. यामध्ये जीव वाचवणे, स्थिती आणखी बिघडू नये म्हणून प्रतिबंध करणे आणि व्यावसायिक उपचार सुरू होईपर्यंत आराम देणे यांसारख्या गोष्टींचा समावेश होतो. तुम्हाला तीव्र दुखापत किंवा आजार असल्यास प्रथमोपचार ही प्रारंभिक मदतक्रिया किंवा तुम्हाला मिळू शकणारी वैद्यकीय सेवा होय. तसं पाहिलं तर आपलं स्वयंपाकघर हे प्रथमोपचार केंद्रच आहे. परंतु स्वयंपाकघरात उपलब्ध असलेली द्रव्ये कशी वापरावी, किती वापरावी, कशावर वापरावी याचे योग्य ज्ञान हवे. प्रथमोपचार म्हणून डॉक्टरांकडे न्यायला उशीर होत असेल तर या ज्ञानाचा आपल्याला नक्की उपयोग होईल. पहिल्या भागात आपण ओवा, सुंठ याबद्दल माहिती करून घेतली. आता अन्य काही द्रव्ये पाहू-

धने
भारतीय स्वयंपाकघरात धने व ताज्या कोथिंबिरीला मानाचे स्थान आहे. ताजी कोथिंबीर जुडी कितीही महाग असली तरी पदार्थाला चव ही शेवटी टाकलेल्या कोथिंबिरीनेच द्विगुणित होते. भाजी-आमटीला जशी कोथिंबीर हवीच, तसेच खड्या मसाल्यात धन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

  • धने दीपन, मधुर, शीत, कषाय, रूक्ष, मूत्रविरजनीय, पिपासाघ्न, दाहप्रशमन, वायुनाशी आणि अभिष्यंदाप्रशमन आहे.
  • तापामध्ये शरीरातील जलद्रव्य कमी होते, शोष पडतो अशा वेळेस धन्याच्या पाण्याचा फार उपयोग होतो. धने कधीही पाण्यात उकळू नये, कारण त्यातील उडनशील तेल वाफेबरोबर उडून जाते. त्याकरिता एक चमचा धने ठेचून रात्री एक कप पाण्यात भिजत टाकावे. सकाळी ते चावून खावे व वर तेच पाणी प्यावे.
  • अंगाला खाज येत असल्यास अशाप्रकारे तयार केलेले पाणी पिल्यास खाज लगेच थांबते.
  • लघवी खळखळून होत नसल्यास धन्याचे पाणी प्यावे.
  • धन्याची पावडर करून त्यात चार पट खडीसाखर घालून हे मिश्रण हवाबंद डब्यात ठेवावे. सकाळ-संध्याकाळ 1-1 चमचा हे मिश्रण पाण्यासोबत सेवन केल्यास ॲसिडिटीमध्ये चांगला आराम मिळतो. लघवीही खळखळून होते.
  • रक्तप्रदर किंवा शरीर दाह होत असल्यास 3-4 ग्रॅम धने 100 मि.लि. पाण्यात रात्री भिजत ठेवावे व सकाळी थोडेसे कोमट करून घ्यावे. त्यात मध घालावे आणि धने चांगले कुस्करून पाण्यासकट सेवन करावे.
  • गर्भावस्थेमध्ये जेव्हा उलट्या होतात किंवा लहान मुलांना उलटी होत असल्यास 400 मि.लि. पाण्यात 2-3 ग्रॅम धने चांगले कुटून घालावे व साधारण दोन-तीन तास भिजत ठेवावे. नंतर त्यात थोडेसे मध घालून तासा-तासाने पिण्यास द्यावे म्हणजे बेचैनी व उलट्या शांत होतात.
  • 4-5 ग्रॅम धने व ताज्या कोथिंबिरीची पाने यांची पेस्ट करून चेहऱ्यावर लावल्यास चेहरा सुंदर होतो व चेहऱ्यावरील मुरमे, डाग कमी होण्यास मदत होते.

जिरे
जीरकं कटुकं रुक्षं च वातहृत्‌‍ दीपनं परम्‌‍।
गुल्माध्मान अतिसारघ्नं ग्रहणी कृमिहृत्‌‍ परम्‌‍॥
सगळ्यांच्याच स्वयंपाकघरात जिऱ्याला एक अढळ स्थान आहे. जिरे आपल्या मसाल्यामध्ये असल्याशिवाय स्वयंपाकाला रूची येत नाही.

  • जिरे चवीने कडू व किंचित गरम असते. त्याला एक विशेष सुगंध असतो. जिऱ्यात 4 टक्के सुवासिक तेल आहे. या तेलामुळे जिरे पचनविकारात उपयुक्त ठरते. लहान व मोठ्या आतड्यातील तुंबलेला वायू तत्काळ मोकळा करते.
  • वर्षानुवर्षे ज्यांना अंगावर पांढरे जाणे, धुपणी वा श्वेतप्रदर असा त्रास होतो, अशा महिलांनी/मुलींनी ढेचलेल्या जिऱ्याचे चूर्ण (1 चमचा) एक ग्लास पाण्यात भिजत ठेवून ते पाणी प्यावे. दिवसातून दोन वेळा घ्यावे म्हणजे साधारण एका आठवड्यात उपशय मिळतो.
  • शीघ्रपतनामध्ये पुरुषांनी जिरकाद्यारिष्ट भोजनोत्तर दोन वेळा घ्यावे. हळूहळू हा त्रास कमी होतो व नष्ट होतो.
  • कफवातप्रधान मूळव्याधीमध्ये मोड खूप वाढले असता थंड पाण्यात जिरे वाटून त्याचा मोडावर दाट लेप करावा. पोटातही जिरेचूर्ण घ्यावे.
  • उन्हाळ्यामध्ये अन्न नकोसे वाटल्यास जिरेचूर्ण किंवा जिरकाद्यारिष्ट घ्यावे.
  • किडा-मुंगी चावल्यास जिरे चूर्णाचा तुपात खलून लेप लावावा.
  • जीर्ण अपचनात काही काळ जिरकाद्यारिष्ट दोन्ही जेवणानंतर घ्यावे.
  • हगवण लागल्यास 4-5 ग्रॅम जिरे हलके भाजून त्याची पावडर बनवावी व दह्यात किंवा लस्सीत कालवून खावी.
  • थोडे जिरे व तेवढीच बडीशेप हलकी गरम करून पावडर करून ठेवावी व ही पावडर 1-1 चमचा दिवसातून 3-4 वेळेस सेवन केल्यास पोटात मुरड मारून होणारा संडास कमी होतो.
  • 3-4 ग्रॅम जिरा 400 मि.लि. पाण्यात उकळून 1/4 शेष राहिल्यावर ते पाणी रोज दिवसातून दोनदा पिल्यास आंत्रज कृमी नष्ट होतात.
  • 3-4 ग्रॅम जिरा पाण्यामध्ये उकळून त्यात मिश्री घालून पिल्याने मूत्र-विकार, रक्तप्रदर या रोगामध्ये आराम मिळतो.
  • 25 ग्रॅम जिरे आणि 25 ग्रॅम धने याची पावडर बनवून घ्यायची. त्यात 50 ग्रॅम खडीसाखर घालून हे मिश्रण डब्यात भरून ठेवायचे. एक मिश्रण साधारण अर्धा-अर्धा चमचा सकाळी व रात्री खाल्ल्यानंतर अर्ध्या तासाने घ्यावे.
  • 1 चमचा जिरे दोन ग्लास पाण्यामध्ये 1/4 शेष उरेपर्यंत उकळावे व गाळावे आणि कोमट असताना त्यात एक चमचा मध घालून चटाप्रमाणे प्यावे. याने कण्टार्तवातात लाभ मिळतो.
  • 1 चमचा जिरे, 1/4 चमचा खडीसाखरेचे मिश्रण करून सकाळ-संध्याकाळ सेवन केल्याने स्तन्याल्पतामध्ये लाभ मिळतो.

हिंग
हिंग हा एक प्राचीन भारतीय पाककृती घटक आहे. ताकासोबत त्याची पावडर पोटफुगीवर घेणे हा एक अतिशय प्रसिद्ध घरगुती उपाय आहे.
आयुर्वेदशास्त्राप्रमाणे हिंग दीपनीय, संज्ञास्थापक आहे. चव तिखट, उष्ण, तीक्ष्ण आहे. कफ-वात संतुलित करते, पण पित्त वाढवते.

  • हृदयासाठी चांगले असे हे एक अतिशय नैसर्गिक रक्त पातळ करणारे द्रव्य आहे.
  • चक्षुण्य म्हणजे डोळ्यांसाठी चांगले.
  • बद्धकोष्ठता, पोट फुगणे, कृमींचा प्रादुर्भाव, पोटात गाठ तसेच गोळा येणे, पोटात दुखणे यामध्ये हिंग अतिशय उपयोगी ठरतो.
  • हिंगामध्ये शक्तिशाली अँटिबायोटिक, अँटी-व्हायरल आणि अँटी-बॅक्टेरियल संयुगे असतात.
  • पारंपरिक उपायांमध्ये पोट फुगणे, श्वसनाच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी आणि पुरुष व महिला दोघांमध्येही प्रजनन आरोग्य सुधारण्यासाठी हिंगाचा वापर सुचवला जातो.
  • मुलांमध्ये सर्दी-खोकला जास्त दिवस टिकल्यास हिंगाची पेस्ट करावी व ती छातीभोवती व नाकाखाली लावावी.
  • आले हिंगात मिसळून खाल्ल्याने पोटाची चरबी कमी होते.
  • अर्धा चमचा हिंगाची पावडर अर्धा ग्लास पाण्यात 5-7 मिनिटे उकळावे व कोमट असता या पाण्याच्या गुळण्या केल्यास कृमिदन्त (दात-किडो) वर लाभ मिळतो.
  • 1 चमचा दुधात एक चिमूट हिंग घालून 2-2 थेंब नाकात घातल्यास कर्णबधिर्यामध्ये लाभ मिळतो.