स्पर्धा-परीक्षांची तयारी करताना…

0
87
  • – डॉ. मनाली महेश पवार

मुलांना फक्त अभ्यासच महत्त्वाचा असतो का? आरोग्य नाही? वास्तविक अभ्यासाच्या नियोजनामध्ये आहार-पाणी, व्यायाम, योग-साधना यांची योग्य सांगड घातली तर, आणि तरच मुलं या ‘स्पर्धा-परीक्षांना’ न घाबरता तोंड देणार व यशस्वीही होणार!

आजचे युग हे स्पर्धेचे आहे. प्रत्येक बाबतीत संघर्ष, स्पर्धा चालूच असते. सध्या जीवनात कुठलीच परीक्षा दिल्याशिवाय पुढे जाता येत नाही. अगदी १० वी व १२ वी पासूनच स्पर्धा परीक्षांना सुरुवात होत असते. मुलंही स्पर्धा-परीक्षांना नको तेवढे महत्त्व देत आहेत. हे म्हणजे अगदी शिशुवाटिकेतील मुलांना ट्यूशन लावण्यासारखे आहे. छएएढ, गएए, णझडउ, चझडउ वगैरे अनेक स्पर्धा-परीक्षांना उधाण आलं आहे. सध्या विभक्त, छोटे कुुटुंब असल्याने मुलंही एक किंवा दोन. अशा स्थितीत प्रत्येक पालकाला आपल्या पाल्याने या स्पधार्र्-परीक्षांमधून घवघवीत यश मिळवून डॉक्टर, इंजिनिअर, आयएएस, आयपीएस वगैरे व्हावे असेच वाटते. मग त्यांना विशेष क्लासेस लावले जातात. यात विद्यार्थी पूर्ण थकून जातो.

वर्षभर हा अभ्यास करताना अनेक वेळा डोकेदुखी, अपचन, ऍसिडिटी, उलट्या, सर्दी, डोळ्यांचे विकार, त्वचेचे विकार, मुलींना पाळीच्या तक्रारी, लठ्ठपणा, मलावरोध इत्यादी शारीरिक तक्रारी, त्याचबरोबर ताण-तणावासारख्या मानसिक आजारांना सामोरे जावे लागते. बर्‍याचवेळा क्लासेससाठी हॉस्टेलमध्येही ठेवले जाते. अशा परिस्थितीत अभ्यासाच्या नियोजनासाठी वेळापत्रक व्यवस्थित मांडले जाते. मुलांनीही ते पाळण्याची सक्ती केली जाते. काही मुले स्वतःहूनच फक्त आणि फक्त अभ्यासाच्या मागे लागतात, तहान-भूकही विसरतात आणि नेमकी परीक्षेच्या आदल्या दिवशी आजारी पडतात. या स्पर्धा-परीक्षा क्रॅक करण्यासाठी फक्त क्लासेस व अभ्यासच महत्त्वाचा असतो का? आरोग्य नको? अभ्यासाचे नियोजन करताना आहार-पाणी, व्यायाम, योग-साधना यांना काहीच महत्त्व नसतं का? बरेचजण व्यायाम-योग तर त्या महत्त्वाच्या वर्षी बंदच करतात. वेळ फुकट जातो या कारणासाठी. आहार-पाण्याचे काय नियोजन करायचे अशा मताचेही बरेच पालक असतील. वास्तविक अभ्यासाच्या नियोजनामध्ये आहार-पाणी, व्यायाम, योग-साधना यांची योग्य सांगड घातली तर, आणि तरच मुलं या ‘स्पर्धा-परीक्षांना’ न घाबरता तोंड देणार व यशस्वीही होणार. आपल्याला आपल्या मुलांनी १६-१८ तास अभ्यास करायला हवा असे वाटते. पण हा एवढा अभ्यास करण्यासाठी त्यांना जी एनर्जी (शक्ती) हवी ती तर आहारातून येणार ना! पण या आहाराचे नियोजनच केलेले नसेल तर मुलं तरी कशी अभ्यास करणार?
अभ्यासात एकाग्रता साधण्यासाठी आहाराची गरज असते. निरोगी राहण्यासाठीही योग्य आहाराची गरज असते. नाहीतर मुलं नेमकी परीक्षेच्या वेळी आजारी पडतात. बुद्धी तल्लख बनवण्यासाठी आहाराची गरज असते. सगळीच मुलं हुशार असतात; गरज असते ती त्यांच्या बुद्धीवर येणार्‍या ताणाचे आवरण दूर करण्याची व त्यासाठीही योग्य आहाराचीच गरज असते. अभ्यासासाठी फक्त बुद्धिवर्धक औषधोपचार घेतले म्हणून होत नाही, अभ्यास योग्य दिशेने करण्यासाठी आपलं शरीर व मनही निरोगी असणे आवश्यक असते. शारीरिक व मानसिक ताकद उत्तम पाहिजे व ती ताकद आपल्याला आहारातून मिळते. आहार हितकर असला तरच रस, रक्त, मासांदी सप्तधातूंचे पोषण योग्य तर्‍हेने होते. या सप्तधातूंचे पोषण योग्य झाल्यास शरीर निरोगी राहते.

संतुलित आहार सेवन केल्यास आहार-रस प्राकृत तयार होतो, म्हणजे रसधातूचे प्रीणन हे कार्य उत्तमरीत्या होते. रसधातू प्राकृत असल्यास रक्तधातू आपले जीवन रक्षण करण्याचे कार्य उत्तमरीत्या करतो. थकव्यासारखी लक्षणे येत नाहीत. अभ्यासामध्ये लक्ष व्यवस्थित लागते. रक्तधातू प्राकृत असल्यास मेद धातूचे स्नेहन हे कार्य होते. मेदधातू प्राकृत असल्यास अस्थिधातूचे पोषण व्यवस्थित होते, म्हणजे शरीराला जे कॅल्शियम पाहिजे ते योग्यरीत्या मिळते. याने हाडे मजबूत होतात. अस्थिधातू बलवान असला म्हणजे मुलं नेहमी उत्साही राहतात. शारीरिक व बौद्धिक कष्ट सहन करू शकतात. म्हणजे १८ ते २० तास अभ्यास सहन करू शकतात. अस्थिधातू प्राकृत असल्यास मज्जाधातूचे पोषण व धारण योगरीत्या होते. शरीरात स्नेहभाव निर्माण करणे, बल निर्माण करणे, अस्थिधातूतीच पोकळी भरणे हे मज्जाधातूचे कार्य. डोक्याच्या कवटीच्या आत असणार्‍या मेंदूचा अंतर्भाव मज्जाधातूमध्ये असतो, म्हणून हा मज्जाधातू कमी झाला तर मुलांना अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही. नैराश्य येते. आळशीपणा वाढतो. बुद्धी काम करेनाशी होते. आत्मविश्‍वास कमी होतो. म्हणून यासाठीच आहाराचे नियोजनही व्यवस्थित पाहिजे.

अस्थीच्या आत असणारा आणि अधिक सत्त्वयुक्त प्रसादभूत असा मज्जाधातू आहे. डोक्यात असणारा मेंदू, डोळे, सांधे हे मज्जाप्रधान अवयव आहेत. बुद्धी, विविधकला, शास्त्राबद्दल प्रेम, डोळ्यांचे तेज इत्यादी गोष्टी मज्जाधातूवर अवलंबून असतात. शरीरातील इंद्रियांचा स्निग्धपणा, क्रांती, तेज शरीरात, तसेच मनाची शक्ती या गोष्टीदेखील मज्जाधातूवर अवलंबून असतात. मज्जाधातूचा क्षय झाल्यास मुलांना चक्कर येणे, अंधारी येणे, निरुत्साह, आकलनशक्ती- स्मरणशक्ती, मनाची सहनशीलता कमी होणे, चिडचिड होणे यांसारख्या तक्रारी सुरू होतात. म्हणूनच मुलांना मज्जाधातू वाढवणारा आहार दिला पाहिजे व त्याचबरोबर वैद्यांच्या सल्ल्याने ब्राम्ही, शंखपुष्पी, अश्‍वगंधा, अभ्रकभस्म, रौप्यभस्म, बदाम, पिस्ता, आक्रोड, तुपासारखे योग वापरावेत. ही औषधयोजना वैद्याच्या सल्ल्यानेच घ्यावी व तीही आहाराचे योग्य नियोजन करून. फक्त बुद्धिवर्धक औषधे घेतली म्हणून बुद्धी वाढत नसते. योग्य आहारानेच रस-रक्तादी धातूंचे योग्य पोषण झाल्याशिवाय मज्जाधातूचे कार्य योग्य तर्‍हेने होणार नाही. म्हणून आहाराचेच नियोजन योग्य पाहिजे.

स्पर्धा-परीक्षांची तयारी करताना सकाळच्या नाष्टाला खूप महत्त्व आहे. जी मुुलं हॉस्टेलमध्ये राहतात त्यांनीसुद्धा नाष्ट्यासाठी वेगळा पर्याय निवडावा. रात्रीचे जेवल्यानंतर साधारण ८-१० तास पोट रिकामे असते. त्यामुळे ऍसिड लेव्हल वाढलेली असते. ते शांत करण्यासाठी योग्य नाष्ट्याची गरज असते. नाष्टा फक्त पोट भरण्यासाठी करू नये, म्हणजे नाष्ट्यामध्ये तळलेले पदार्थ जसे- सामोसा, भजी, वडा, साबुदाणा, बटाट्याचे पराठे इत्यादी पदार्थ खाऊ नयेत. आपल्याला दिवसभराची एनर्जी (शक्ती) नाष्टा देतो. पण अशा प्रकारच्या नाष्ट्याने पोट जड होणार, ऍसिडीटी वाढणार, सुस्ती येणार, फेटस् वाढणार. मुलांना असा नाष्टा द्यावा जेणेकरून त्यातून त्यांना कॅल्शियम, प्रोटिन, व्हिटॅमिन- बी, व्हिटॅमिन- सी, फायबर इत्यादी पोषक तत्त्व मिळेल. हे पोषक तत्त्व शरीरातील हॅप्पी हार्मोन्स सिरोटिनीन वाढवते व संपूर्ण दिवस मुलांना ऊर्जा मिळते.
सकाळी उठल्याबरोबर साधारण दोन तासांच्या आत नाष्टा करावा. हा नियम सगळ्यांनी लक्षात ठेवावा. सकाळी रात्री भिजत घातलेले दोन बदाम, दोन अक्रोड, पाच काळ्या मनुका खाव्यात. कधी एक मूठ शेंगदाणे रात्री भिजत घालून सकाळी भिजवलेले शेंगदाणे व गूळ खावे. कधी खारीक, बदाम, पिस्ता, काजू, मकाणे, डिंक, गूळ, खोबरे तूप घालून तयार केलेला एक लाडू खावा. अशा प्रकारे आलटून-पालटून वरील पदार्थ रोज सकाळी सेवन करावेत.
त्यानंतर पोहे, उपमा, उप्पीट, इटली-सांभार, डोसा, मूग, मटकी, मोड काढून केलेली उसळी, उकडलेले अंडे, उपमा, त्याप्रमाणे विविध धान्य घालून व भाज्या घालून तायर केलेले थालीपीठ हे उत्तम नाष्ट्याचे स्रोत होऊ शकते.

मूग व मटकीचे मोड काढून, थोडेसे उकडून, त्यात टॉमेटो, बीट, गाजर, कोथिंबीर घालून रोज खाता येते. सफरचंद, पपई, केळीसारखे एखादे फळ खावे. पनीर, सोयाबीन वापरून तयार केलेला एखादा पदार्थ खावा. फक्त तो जास्त जड नसावा याची काळजी घ्यावी. गोड पदार्थ शक्यतो नाष्ट्याला खाऊ नयेत. उदा. गोड शिर्‍याने सुस्ती येते, एनर्जी कमी होते.

नाष्टा कधीही जड असू नये, तो पोषक असावा.
अशा प्रकारे प्रत्येक विद्यार्थ्यान सकाळी पोषक आहार घ्यावा. पूर्ण आहारामध्ये साधारणतः व्हिटॅमिन- सी, व्हिटॅमिन- बी, लोह, मॅग्नेशियम, झिंकसारखे न्यूट्रिएन्ट्‌स असावेत. आहारामध्ये हिरव्या भाज्या, फळभाज्या, शेंगदाणे, डाळी, हिरवे मटार, भोपळा, केळी, आवळा, लिंबू, बदाम, खारीक, आक्रोड इत्यादीचा समावेश असावा.

आहाराप्रमाणे पाण्यालाही खूप महत्त्व आहे. काही मुलं फक्त जेवताना पाणी पितात, नंतर पाणी पितच नाहीत. काही मुलांना मुळात आपल्याला तहान लागली हेच समजत नाही. पाण्याचं प्रमाण शरीरात कमी झालं म्हणजे डिहायड्रेशन होतं. शरीर-मन थकतं. आपल्या मेंदूमध्येही साधारण ८०-८५ टक्के पाणी असतं. मग हे पाणी कमी झालं तर आपल्या शरीर-मनावर परिणाम नाही का होणार? आपण घेतलेला कॅल्शियम, प्रोटिन्सयुक्त आहार पचवण्यासाठी पाण्याची गरज असते. आपण पाणी प्यालो नाही किंवा कमी प्यालो तर थकवा येतो, ज्यामुळे एखादा विद्यार्थी ब्लॅन्क होऊ शकतो. परीक्षेत त्याला काहीच आठवत नाही. अभ्यास केलेला लगेच विसरतो. त्यामुळे रोज किमान दोन-अडीच लिटर पाणी प्यावे व उन्हाळ्यात जरा जास्तच पाणी प्यावे. सोबत नेहमी एक लिटरची पाण्याची बाटली भरून ठेवावी व त्या पाण्याच्या मापाने पाणी प्यावे. परीक्षेचा पेपर लिहिताना नक्की पाणी प्यावे. पाणी हे औैषधाप्रमाणे कार्य करते. पाण्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. योग्य पद्धतीने पाणी प्याल्याने लठ्ठपणा येत नाही. किडनी स्टोनसारखे विकार टाळता येतात. सर्दीसारखे ऍलर्जीक आजार होत नाहीत. म्हणून स्पर्धा-परीक्षांची तयारी करणार्‍यांनी पाण्याचे महत्त्व जाणून पाणी प्यावे.

स्पर्धा-परीक्षांची तयारी करणार्‍यांनी आहार व पाण्याबरोबर व्यायामालाही तेवढेच महत्त्व द्यावे. यात भरपूर व्यायाम अपेक्षित नाही. फक्त १५ मिनिटे किंवा १३ सूर्यनमस्कार रोज व पंधरा मिनिटे प्राणायाम (श्‍वासाकडे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करणे) करावा.
स्पर्धा-परीक्षेची तयारी करणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्याने फक्त अभ्यासाच्या मागे न लागता आहार, पाणी व योग याची सांगड घालून परीक्षेला सामोरे जावे. यश नक्की मिळेल.