स्नेहन, उद्वर्तनाने त्वचेची निगा

0
22
 • डॉ. मनाली महेश पवार

दिवाळीत थंडी पडायला सुरुवात होते. त्यामुळे शरीरातील व बाहेरील वातावरणातील वात वाढायला सुरुवात होते. म्हणूनच वाताचा रुक्ष, खर हा गुण वाढतो आणि शरीरावर म्हणजेच त्वचेवर रुक्षता किंवा त्वचेचे विकार उत्पन्न होऊ लागतात. स्नेहनाने म्हणजे स्निग्ध पदार्थाने ही रुक्षता कमी होते म्हणूनच या संपूर्ण थंड ऋतूत अभ्यंग (स्नेहन) करावे.

दीपावली सणाची सुरुवात अभ्यंगस्नानाने होते व हे अभ्यंगस्नान फक्त त्या दिवसापुरतीच नसते तर पुढेही संपूर्ण वर्ष नसेल करता येत तर हिवाळ्यात तरी चालूच ठेवावे. आपल्या भारतीय संस्कृतीत सण व आरोग्याची विशेष अशी सांगड आहे. दिवाळीत थंडी पडायला सुरुवात होते. त्यामुळे शरीरातील व बाहेरील वातावरणातील वात वाढायला सुरुवात होते. म्हणूनच वाताचा रुक्ष, खर हा गुण वाढतो आणि शरीरावर म्हणजेच त्वचेवर रुक्षता किंवा त्वचेचे विकार उत्पन्न होऊ लागतात. स्नेहनाने म्हणजे स्निग्ध पदार्थाने (तेल, तूप इत्यादीने) ही रुक्षता कमी होते म्हणूनच या संपूर्ण थंड ऋतूत अभ्यंग (स्नेहन) करावे.

सर्व शरीर व्यापून राहणारे त्वचा हे एकमेव ज्ञानेंद्रिय आहे, ज्याने स्पर्शाचे ज्ञान होते. आयुर्वेदशास्त्राप्रमाणे ज्याप्रमाणे दूध तापत असताना त्यावर साय येते, त्याचप्रमाणे पुरुषबीज व स्त्रीबीज यांचा संयोग होऊन गर्भ बनत असताना, रक्ताचे पचन होत असताना येणारी साय म्हणजे ‘त्वचा’ होय असे सांगितले आहे. म्हणून रक्तधातू जितका शुद्ध असेल तेवढी त्वचा अधिक तेजस्वी व नितळ असते. रक्तधातूबरोबर त्वचेच्या सौंदर्यासाठी व स्वास्थ्यासाठी रसधातू हाही महत्त्वाचा घटक आहे. नितळ, सतेज कांतीयुक्त त्वचा ही रसधातू उत्तम व सारवान असल्याचा पुरावाच आहे. त्रिदोषांपैकी वातदोष व पित्तदोष दोघांचेही त्वचा हे स्थान सांगितलेले आहे.

शरीरात पित्तदोषाच्या असंतुलनामुळे त्वचेचा वर्ण विकृत होतो, म्हणजेच त्वचेवर पिवळसर किंवा लालसर छटा येते. वातदोषाच्या असंतुलनामुळे त्वचा कोरडी, खरखरीत होते. काही वेळा त्वचेला भेगाही पडू शकतात. त्वचेचा रंग काळवंटतो. या दोन्ही दोषांमुळे रक्त दूषित झाले म्हणजे मूखदुषिका, रॅशेस, एक्झिमा, सोरियासिस आदी त्वचेचे विविध रोग होऊ शकतात.
त्वचेचे विकार होऊ नयेत म्हणून ऋतुचर्येनुसार आहार-विहार ठेवावा. साधारणतः थंडीच्या दिवसांत त्वचा निसर्गतः कोरडी होते व तिची योग्य काळजी घेतली नाही तर त्वचेच्या इतर व्याधी उत्पन्न व्हायला लागतात. थंडीच्या दिवसांत त्वचा कोरडी होणे स्वाभाविकच आहे. हवा कोरडी असेल तिथे त्वचा कोरडी होणारच आहे.
त्वचा कोरडी होणे म्हणजे संपूर्ण त्वचा- हात, पाय कोरडे होतात, डोळे कोरडे होतात, नखे कोरडी होतात, ओठ कोरडे होतात, योनीभाग-गुदभागदेखील कोरडा होतो. या कोरडेपणाचे मुख्य कारण वात वाढणे. आणि यावर मुख्य चिकित्सा म्हणजे स्नेहन (अभ्यंग). अभ्यंग म्हणजे नुसतं त्वचेला तेल लावणे नव्हे.

अभ्यंग ः

 • शरीराला तेलाचे मर्दन करणे या क्रियेला अभ्यंग म्हणतात. थंडीमध्ये अभ्यंगासाठी वापरण्याचे तेल कोमट करून घ्यावे. अभ्यंग सर्वांगालाच करावे. डोके व तळपायांना विशेषतः करावे.
 • कर्णपुरण म्हणजे कानांमध्येही तेल घालावे. त्याने कान, हनुवटी, मान यांना पुष्टी येते.
 • पदाभ्यंगाने पायांना स्थैर्य येते, डोळ्यांना थंड वाटते व झोप शांत लागते. थकवा नष्ट होतो.
 • डोक्यावर तेलाचा, तुपाचा पिचू ठेवावा किंवा तेलाने केसांच्या मुळांना मालीश करावे. ब्रह्मीसिद्ध तेल घेतल्यास अधिक फायदा होतो. डोके शांत राहते, डोळ्यांची जळजळ थांबते, झोप चांगली येते, केसांची मुळे दृढ होतात. केस अकाली पिकत नाहीत, गळत नाहीत व केसांत कोंडाही होत नाही.

नस्य ः नाकात तेल घालावे. तिळतेल, अणुतेल, षड्बिंदूतेल, ब्राह्मीतेल, जुनाट तूप इत्यादी व्याधीनुरूप नाकात 2-2 थेंब टाकावे किंवा नित्य नियमित तिळतेलाचे दोन थेंब दोन्ही नाकपुडीत टाकावे. नाकात नियमित तेल टाकल्याने ॲलर्जीपासून मुक्ती मिळते, केसांचे आरोग्य सुधारते, त्वचा स्वच्छ होते. खांदे भरदार, छाती मजबूत, तेजस्वी कांती, सुगंधित मुख, मधुर स्वर व निर्मल इंद्रिये यांची प्राप्ती होते.
गंडूष ः औषधी द्रव्याने सिद्ध तेल तोंडात काही वेळ धरून ठेवणे याला ‘गंडूष’ म्हणतात. स्नेहयुक्त गंडुषामुळे ओठ फुटणे, खरबरीत होणे, दंतरोग, स्वरभेद यांपासून रक्षण होते.

 • बाह्य स्नेहनाइतकेच आभ्यता स्नेहपान महत्त्वाचे आहे. आहारात तेल, तूप, लोणी यांचा वापर जरूर करावा. तुपाने कॉलेस्ट्रॉल वाढत नाही. गायीचे शास्त्रीयदृष्ट्या योग्य पद्धतीने विरजण घालून दह्यापासून घुसळून काढलेले लोणी व नंतर लोणी कढवून काढलेले तूप हे कुठल्याच प्रकारचं फॅट वाढवत नाही. उलट कमी करायलाच मदत करते. त्यामुळे जेवताना रोज तूप खावे.
 • रिफायनेड तेल, तळलेले (डिप फ्राय) पदार्थ शरीराला हानीकारक असतात. पण कच्चे तेल घाणा प्रक्रियेतून काढलेले नेहमी उपयुक्त असते. कॉलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी उलट रोज 1 चमचा खोबरेल तेल सेवन करावे.
 • तळलेला पापड पित्तकर असतो. पण अग्नीवर (निखाऱ्यांवर) पापड भाजून नंतर वर तेल लावल्यास पित्त वाढत नाही.
 • पचनाच्या कसल्याही तक्रारी असता पंधरा दिवसांतून एकदा तरी एरंडेल तेल साधारण 15-20 मि.ली. याप्रमाणात घ्यावे किंवा रोज 1 चमचा तेल कणीक भिजवताना घालावे व ती पोळी खावी.
 • रक्तपित्त, सरक्तमूळव्याध इत्यादी व्याधींमध्ये व त्याचबरोबर उत्तम बुद्धिवर्धनासाठी लोण्याचे सेवन करावे.
 • स्नेह आभ्यंतर, बाह्यतः तर वापरला जातोच, पण संशोधन उपक्रमामधील बस्तीप्रकारामध्ये स्नेहबस्ती दिला जातो. वातशमनासाठी बस्ती हा मुख्य उपक्रम आहे.

याचाच अर्थ स्वास्थ्यरक्षणार्थ हेतू स्नेहनाचा, अभ्यंगाचा वापर करावा. बाह्यतः स्नेह लावल्यावर साबणाने अंग धुवू नये.

 • तेल नेहमी शरीरात जिरू द्यावे. त्यामुळे तेल जर औषधी द्रव्यांनी सिद्ध असेल तर त्याचा विशेष फायदा होतो. शतावरी, मंजिष्ठा, वचा, सारिवा, ज्येष्ठमध, निम्ब, करंज इत्यादी तेल सिद्ध करण्यासाठी वापरण्यात येणारी मुख्य द्रव्ये आहेत.
 • त्वचेची काळजी
 • अभ्यंगाबरोबरच उद्वर्तन (उटणे लावणे) खूप महत्त्वाचे आहे. तेल घालवण्यासाठी तेल लावू नये; ते शरीरामध्ये जिरले पाहिजे. तेलाचा चिकटपणा घालवण्यासाठी उटण्याचा वापर करावा, जे नैसर्गिक द्रव्याने बनलेले असावे.
 • बेसन व हळद एकत्र करून दुधाच्या सायीतून, गुलाबपाण्यातून अंगाला लावल्यास त्वचा सतेज, निरोगी होते.
 • फुटलेल्या त्वचेवर लोण्यातून हळदपूड लावावी.
 • चंदन व बदाम पाण्यात किंवा दुधात सहाणेवर उगाळून तयार केलेला गंध अंगास लावल्यास चेहरा सतेज, मुलायम होतो व काळे डाग असल्यास कमी होतात.
 • हळद व चंदन दुधात उगाळून लावल्याने मुरमे कमी होतात.
 • कोरफडीचा गर किंवा औषधसिद्ध नारळाच्या तेलाने त्वचा मुलायम, सतेज व निरोगी होते.

त्वचेसाठी उत्तम अशा आपल्या रोजच्या आहारात ज्या गोष्टींचा समावेश आपण सहज करू शकतो त्या म्हणजे ः
लोणी ः घरचे ताजे लोणी वर्ण सुधारण्यास उत्तम होय.
तूप ः घरचे आयुर्वेदिक पद्धतीने बनवलेले साजूक तूप उत्तम कांतीचा लाभ करून देते.
दूध ः रस, रक्त, मांस अशा धातूंचे पोषण करते. त्वचा ही मांसधातूची उपधातू आहे, म्हणजे पर्यायाने त्वचेच्या आरोग्यासाठी दूध उत्तम आहे.
मध ः वर्ण्य तसेच प्रसादन करणारे आहे.
हळद ः वर्ण सुधारणारी व त्वचा शुद्ध करणारी म्हणून रोज दुधात हळद टाकून दूध प्यावे.
केशर ः त्वचेची कांती वाढवून शरीर तेजःपूंज करणारे आहे. आयुर्वेदशास्त्रामध्ये चंदन, केशर, क्षीरकाकोली, श्वेतदूर्वा, ज्येष्ठमध, पद्मकाष्ठ, वाळा, मंजिष्ठा, अनन ही औषधी द्रव्ये ‘वर्ण्य’ म्हणून वर्णिली आहेत. त्यामुळे या द्रव्यांनी तेल सिद्ध करावे व स्नेहन करावे किंवा उद््‌‍वर्तनासाठी वापरावीत.