सोन्याच्या दागिन्यांसाठी ज्येष्ठ नागरिकाचा खून

0
21

>> काटेबायणा येथील घटना; अज्ञात इसमाने मैत्री करत साधला डाव

मोगाबाय-काटेबायणा येथील ६० वर्षीय कायतान डिसोझा यांचा खून करून त्यांच्या घरातील तीन ते साडेतीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले. दागिने चोरीच्या उद्देशानेच कायतान डिसोझा यांचा खून केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री ११. ३० च्या सुमारास कायतान डिसोझा यांच्या नातेवाईकांनी ते रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती मुरगाव पोलिसांना दिली. त्यानंतर मुरगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी कायतान यांच्या डोक्यावर गंभीर जखमा दिसून आल्या, तसेच जमिनीवर रक्ताचे डागही दिसून आले.

मुरगाव पोलिसानी शेजार्‍यांकडे चौकशी केली असता काही दिवसांपासून कायतान एका अज्ञात इसमाबरोबर फिरत असल्याचे समजले. मोगाबाय येथे कायतान हे आपल्या पत्नीसह राहत होते. त्यांची पत्नी वास्को शहरात बार चालवत असून, घटना घडली त्यावेळी त्या बारमध्ये होत्या. त्या घराबाहेर असल्याची संधी साधून कायतान याचा खून करून दागिने लंपास केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

शवचिकित्सेनंतर पोलिसांनी मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन केला असून, कायतान यांच्या तीन मुली लंडनहून आल्यानंतर पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.