>> अटकेतील दोघांकडून गुन्ह्याची कबुली; सीसीटीव्हीत जबरदस्तीने पाणी पाजतानाचे दृश्य; पोलीस महानिरीक्षकांची माहिती
हणजूण येथील एका हॉटेलमध्ये संशयास्परित्या मृत्यू पावलेल्या भाजप नेत्या तथा अभिनेत्री सोनाली फोगट यांना पाण्यातून घातक रसायन पाजण्यात आल्याचे पुरावे सापडले असल्याची माहिती काल पोलीस महानिरीक्षक ओमवीर सिंग बिश्णोई यांनी दिली. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयित सुधीर सांगवान (खासगी सचिव) व सुखविंदर सिंग (सहकारी) या दोघांनी सोनाली फोगट यांना पाण्यातून घातक रसायन जबरदस्तीने पाजले असल्याचे पोलीस चौकशीत मान्य केले असल्याची माहिती देखील सिंग यांनी दिली. दरम्यान, काल हिस्सार-हरयाणा येथे सोनाली फोगट यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सोनाली फोगट मृत्यू प्रकरणात दररोज नवनवी माहिती पोलीस तपासात समोर येत असल्याने सध्या हे प्रकरण देशभर गाजत आहे. सोनाली फोगट आणि दोघेही संशयित ज्या कर्लीस रेस्टॉरंटमध्ये पार्टीसाठी गेले होते, तेथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे दोघेही त्यांना बळजबरीने पाणी पाजत असल्याचे दिसून आले आहे, असे सिंग यांनी स्पष्ट केले.
सोनाली फोगट यांच्या अंगावर कोणत्याही जखमा नव्हत्या. त्यामुळे हणजूण येथील इस्पितळातील डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्याची शंका व्यक्त केली होती; मात्र नंतर शवचिकित्सा अहवालात सोनाली फोगट यांना बोथट शस्त्राने मारहाण करण्यात आल्याने त्यांना दुखापत झाली असल्याचे आढळून आले, असेही सिंग यांनी सांगितले.
बोथट शस्त्राने मारहाण केल्याने सोनाली यांच्या अंगावर कित्येक ठिकाणी जखमा झाल्याचे शवचिकित्सेत आढळून आल्या. या अहवालानंतर त्यांचा खून झाल्याची नोंद करण्यात आली; मात्र शस्त्राने हल्ला केल्याने झालेली दुखापत ही गंभीर स्वरूपाची नव्हती. सोनाली यांना संशयितांनी पाण्यातून घातक रसायन पाजल्यानेच त्यांचा मृत्यू झाला, असे सिंग यांनी सांगितले.
एका संशयितासमवेत सोनाली ‘लिव्ह इन…’ मध्ये
दोघा संशयितांपैकी एका संशयितासोबत सोनाली फोगट या ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये होत्या, अशी माहिती संशयितांकडूनच मिळाली असल्याचे ओमवीर सिंग यांनी सांगितले.
पार्थिवावर अंत्यसंस्कार
शुक्रवारी सोनाली फोगट यांच्या पार्थिवावर हरियाणा येथे त्यांच्या गावी अत्यंसंस्कार करण्यात आले. गुरुवारी गोव्यातून त्यांचे पार्थिव हरियाणा येथे नेण्यात आले होते. फोगट यांची कन्या यशोधरा हिने चितेला अग्नी दिला.
हरयाणातील माजी मंत्र्यावर संशय
हरियाणातील एका माजी मंत्र्याचा या खून प्रकरणात हात असल्याचे बोलले जात आहे, असे ओमवीर सिंग यांना विचारले असता, संशयितांनी अद्याप तसे काहीही सांगितले नसल्याचे ते म्हणाले.
चित्रीकरणाच्या बहाण्याने आणले गोव्यात : रिंकू ढाका
एका चित्रपटाचे चित्रीकरण असल्याचे सांगून सोनाली फोगट यांना गोव्यात आणले होते; मात्र प्रत्यक्षात कोणतेही चित्रीकरण झाले नाही. शिवाय चित्रीकरणासाठीची कोणतीही टीम गोव्यात नव्हती. त्यामुळे संशयितांनी चित्रीकरण असल्याचा बहाणा करून आपल्या बहिणीला गोव्यात आणून तिचा खून केल्याचा आरोप बंधू रिंकू ढाका याने काल केला. आता तपासकाम ज्या प्रकारे चालू आहे, त्याबद्दल आम्ही समाधानी आहोत. सीसीटीव्हीत देखील सबळ पुरावे सापडले आहेत, असेही तो म्हणाला.
पाण्यातून पाजले अमलीपदार्थ?
घातक रसायन पाजल्यानेच सोनाली फोगट यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे; मात्र एका राष्ट्रीय पातळीवरील खासगी वृत्तवाहिनीने १.५ ग्रॅम अमलीपदार्थ पाण्यात मिसळून सोनाली यांना पाजण्यात आल्याची कबुली संशयितांनी गोवा पोलिसांना दिली, असा दावा आपल्या वृत्तात केला आहे.
सीबीआय चौकशी करा
>> आमदार मायकल लोबो यांची आग्रही मागणी
सोनाली फोगट यांचा खून गोव्यात झाला असला, तरी त्या मागचा कट हरयाणात रचण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे या खून प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करण्यात यावी, अशी मागणी कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी काल आपल्या पर्रा येथील निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.
राज्यात अनेक गुन्हे घडतात, पण त्यांची चौकशी योग्य तर्हेने होत नाही. तसेच काही काळ निघून गेल्यावर ती प्रकरणे विस्मृतीत जातात. सोनाली यांचा खून गोव्यात झाला असला, तरी हे प्रकरण गोव्याचे नसून हरयाणाचे आहे. त्यामुळे गोव्यात त्यांच्या खुनाची जास्त चौकशी करण्याची काही गरज नसल्याचे आपल्याला वाटते. या खुनामागे हरयाणातीलच अन्य कोणीतरी मुख्य सूत्रधार आहे. पोलिसांनी ज्या दोघा संशयितांना अटक केली आहे, त्यांची व्यवस्थित चौकशी करावी, अशी मागणी लोबो यांनी केली.