सोनाली फोगट खून प्रकरण सीबीआयकडे

0
8

>> केंद्रीय गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय; फोगट कुटुंबीयांच्या सातत्यपूर्ण मागणीनंतर राज्य सरकारने केली होती शिफारस

भाजप नेत्या तथा अभिनेत्री सोनाली फोगट खून प्रकरण कुटुंबीयांच्या सातत्यपूर्ण मागणीनंतर केंद्रीय गृहमंत्र्यांनी सीबीआयकडे सोपवले आहे. या प्रकरणी आता सीबीआयकडून चौकशी होईल. गोवा पोलीस त्यांचा संपूर्ण तपास सीबीआयकडे सोपवणार असून, सीबीआयला गोवा पोलिसांकडून पूर्ण सहकार्य केले जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल सायंकाळी दिली. दरम्यान, एका दिवसापूर्वीच हरयाणातील हिसारमध्ये आयोजित खाप महापंचायतीत हे प्रकरण सीबीआयकडे सोपवावे, अन्यथा २४ सप्टेंबरला जनआंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता.

सोनाली फोगट (४३ वर्षे) यांचा २३ ऑगस्ट २०२२ रोजी हणजूण येथे संशयास्पद मृत्यू झाला होता. बांबोळी येथील गोमेकॉमध्ये करण्यात आलेल्या शवचिकित्सेत सोनाली यांच्या अंगावर बोथट शस्त्राद्वारे झालेल्या काही जखमा आढळून आल्या होत्या. त्यानंतर हणजूण पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता. पोलीस तपासात सोनाली यांना घातक अमलीपदार्थ पाजून त्यांचा खून केल्याचे समोर आले होते. सुधीर सांगवान (खासगी सचिव) व सुखविंदर सिंग (सहकारी) या दोघांनी आपण सोनाली फोगट यांना पाण्यातून घातक रसायन जबरदस्तीने पाजले असल्याचे पोलीस चौकशीत मान्य केले होते. त्यानंतर त्या दोघांना हणजूण पोलिसांनी अटक केली होती. हे दोघेही संशयित न्यायालयीन कोठडीत असून, वेळोवेळी त्यांच्या कोठडीत वाढ केली जात आहे. नुकतीच न्यायालयाने त्यांची पुन्हा १३ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. दरम्यान, या प्रकरणी हणजूण येथील ज्या कर्लीस शॅकमध्ये सोनाली यांचा खून झाला होता, त्याचा शॅकचा मालक एडविन नुनीस आणि ड्रग्स पेडलर दत्तप्रसाद गावकर आणि रामदास मांद्रेकर या त्रिकुटाला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच नुनीस याला सशर्त जामीन मंजूर झाला होता.

तत्पूर्वी, काल सकाळी मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यास राज्य सरकार राजी असल्याचे स्पष्ट केले होते. सोनाली फोगट मृत्यू प्रकरणाचा गोवा पोलिसांकडून योग्य पद्धतीने तपास केला जात आहे; मात्र सोनाली फोगट यांची मुलगी व त्यांच्या कुटुंबीयांच्या मागणीनुसार हे प्रकरण सीबीआयकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठविण्यात येणार आहे, असे डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले होते.

दुसर्‍या बाजूला, सोनाली फोगट खून प्रकरणी गोवा पोलिसांकडून करण्यात येत असलेल्या तपासाबाबत त्यांचे कुटुंबीय समाधानी नसल्यास या प्रकरणी सीबीआयकडून चौकशी करण्यात येईल, असे हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी देखील म्हटले होते.

दरम्यान, हे प्रकरण सुरुवातीपासूनच देशभरात गाजत आहे. सुरुवातीला सोनाली यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची माहिती पसरविण्यात आली; मात्र सोनाली यांच्या भावाने मृत्यूबाबत संशय व्यक्त करून सखोल चौकशीची मागणी करत हणजूण पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. सोनाली यांची मालमत्ता हडप करण्यासाठीच त्यांचा खून करण्यात आल्याचा आरोप कुंटुबीयांकडून केला जात आहे. सोनाली यांची मुलगी यशोधरा व कुटुंबीयांकडून सातत्याने सीबीआय चौकशीची मागणी केली जात होती. गोवा पोलिसांकडून या प्रकरणी होत असलेल्या तपास कामाबाबत त्यांचे कुटुंबीय समाधानी नाही. त्यामुळेच राज्य सरकारने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय घेतला होता. हरयाणातील हिसारमध्ये रविवारी आयोजित खाप महापंचायतीमध्ये तपासकाम सीबीआयकडे सुपूर्द करण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच मधल्या काळात सोनाली यांच्या कुटुंबीयांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना आपल्या वकिलांमार्फत याचिकापत्र सादर करत हे प्रकरण सीबीआयकडे सोपवावे, अशी मागणी केली होती.

फोगट कुटुंबीयांच्या मागणीचा आदर
सोनाली फोगट खून प्रकरणी गोवा पोलिसांकडून करण्यात येत असलेल्या तपासावर पूर्ण विश्वास आहे. गोवा पोलिसांकडून योग्य पद्धतीने तपास सुरू असून, या प्रकरणात महत्त्वाची माहिती प्राप्त झालेली आहे. तथापि, सोनाली यांच्या कुटुंबीयाची सीबीआय चौकशीची मागणी लक्षात घेऊन आम्ही सदर प्रकरण सीबीआयकडे सुपूर्द करण्याचा निर्णय घेतला आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल सकाळी सांगितले.