सुर्ला-सोनशी खाणपट्टाही जिंदालकडे

0
9

दुसऱ्या टप्प्यातील लिलावाची प्रक्रिया पूर्ण

राज्य सरकारच्या खाण खात्याच्या खनिज पट्ट्याच्या दुसऱ्या टप्प्यातील लिलावात जिंदाल साउथ वेस्ट (जेएसडब्लू) या कंपनीने उत्तर गोव्यातील सुर्ला सोनशी खाण पट्टा भारतीय खाण ब्यूरोच्या 109.80 टक्के बोली दराने काल घेतला आहे. राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील पाच खनिज पट्ट्यांच्या लिलावाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दुसऱ्या टप्प्यातील लिलावात आत्तापर्यत जिंदाल कंपनीने दोन खनिज पट्टे मिळविले आहेत.
खाण खात्याने पहिल्या टप्प्यात चार खनिज पट्ट्यांचा लिलाव यशस्वी केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात उत्तर गोव्यातील पाच खनिज पट्ट्यांसाठी लिलाव घेतला होता. दुसऱ्या टप्प्यातील लिलावातील 9 वा सुर्ला-सोनशी खाण पट्टा जेएसडब्लू कंपनीने सर्वाधिक 109.80 टक्के एवढी बोली लावून मिळविला आहे. हा खनिज पट्टा मिळविण्यासाठी खाण कंपन्यांमध्ये रस्सीखेच लागली होती. दुसऱ्या टप्प्यातील खनिज पट्ट्याच्या लिलावात गोव्याबाहेरील 2 खनिज कंपन्यांनी आत्तापर्यत तीन खनिज पट्टे मिळविले आहेत.

दुसऱ्या टप्प्यातील अडवलपाल-थिवी हा एक खनिज पट्टा फोमेंतो कंपनीने 58.8 टक्के बोली दराने मिळविण्यात यश मिळविले आहे. कुडणे – करमणे हा खनिज पट्टा जेएसडब्लू या कंपनीने 96.65 टक्के बोली दराने घेतला आहे. तर, थिवी – पीर्ण खनिज पट्टा ओडिशा येथील काई इंटरनॅशनल या कंपनीने 100.1 टक्के बोली दराने घेतला आहे.
खाण खात्याकडून कुडणे- हरवळे खनिज पट्ट्यासाठी बुधवारी लिलाव घेण्यात आलेला आहे. तथापि, यशस्वी बोलीदाराची घोषणा करण्यात आलेली नाही.