सुखदुःखे समे कृत्वा!

0
18

गीता मानस- 11

  • प्रा. रमेश सप्रे

लाभात- सुखात- यशात उडणारे लोक अनेक असतात. तसेच नुकसानीत- दुःखात- अपयशात बुडणारे लोकही अनेक असतात. यापेक्षा अशा द्वंद्वात्मक परिस्थितीत स्थिर राहणारे, शांत राहणारे, कुणाबद्दलही तक्रार न करणारे, घडणाऱ्या गोष्टीचा आनंदानं स्वीकार करणारे लोक भगवंताला अधिक आवडतात.

अर्जुनाच्या नावातच ऋजुता आहे, आर्जव आहे. स्वभावाचा सरळपणा आहे. त्यामुळे होऊ घातलेल्या युद्धातील अहिंसा, अनीती, अत्याचार, अपराध, अन्याय यांमुळे तो अस्वस्थ झालाय. त्याची मती कुंठित झालीय. बुद्धी गोंधळून गेलीय. त्याला भीती वाटतेय ती युद्धात होणाऱ्या हिंसेच्या पापासंबंधी. आणि आपण या पापाचे महत्त्वाचे वाटेकरी असणार आहोत, यामुळे युद्ध करूच नये, अशा निर्णयाला तो पोचतो. यातील संभाव्य धोका भगवान श्रीकृष्णाच्या ध्यानात येतो, आणि गीताप्रवाह सुरू होतो…

आरंभीचा अर्जुनाचा युक्तिवाद (प्रज्ञावाद किंवा बुद्धिवाद) श्रीकृष्ण अतिशय सहनशीलतेनं ऐकतो. योग्य वेळी ‘भगवान उवाच’ म्हणून गीतोपदेश सुरू होतो. अर्जुनाच्या मनात खोल दडून बसलेल्या संशयांना, शंकांना आणि भीतीला उद्देशून भगवंताचा उपदेश सुरू होतो, हेच ‘गीता-मानस!’ सुरुवातीला भगवंत (म्हणजे योगारूढ अवस्थेतील श्रीकृष्ण) अर्जुनाच्या मनातील पापभावनेबद्दल सांगतात. ही गोष्ट आजही आपल्या जीवनाला, कर्मांना लागू आहे.
भगवान उवाच ः
सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ।
ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापं अवाप्स्यसि ॥2।38॥
अर्थ स्पष्ट आहे- (अर्जुना,) सुख-दुःख, लाभ-हानी, जय-पराजय यांना समान मानून युद्धाला तयार हो (युद्धाय सुज्यस्व). अशा रीतीने युद्ध केले तर तुला पाप लागणार नाही (तुझ्या कृतीतून पाप निर्माण होणार नाही).
अगदी वरवरची उदाहरणं द्यायची झाली तर सैनिक आणि खून करणारी व्यक्ती यांचं उदाहरण देता येईल. खून करणारा कायद्याच्या दृष्टीनं अपराधी आहे नि समाजाच्या दृष्टीनं हिंसक आहे, म्हणून पापी आहे. याउलट सैनिकानं अनेक शत्रुसैन्यातील अनेक लोकांना मारलं तर त्याला वीरचक्र, महावीरचक्र यांसारखे सन्मान मिळतात. त्याचा सत्कारही होतो. पुरस्कारही दिला जातो. कारण त्याने कर्तव्य भावनेनं हिंसा केलेली असते. त्यामागे उदात्त हेतू असतो. देशरक्षणाचा, राष्ट्रसेवेचा. तो खुनी मात्र सूड-संताप यातून केलेल्या हत्येमुळे पापाचा धनी होतो.
आणखी एक उदाहरण- खाटीक आणि शल्यक्रिया तज्ज्ञाचं (सर्जनचं). लोकांच्या खाण्यासाठी असली तरी तो निष्पाप प्राण्याची उघड-उघड हिंसा करतो. पण डॉक्टर (सर्जन) प्रसंगी रोग्याचा जीव वाचवण्यासाठी त्याचा पायही कापून काढतो. हे एक मानवतावादी कार्य आहे. यामुळे डॉक्टरविषयी रोगी आणि त्याचे आप्त (नातेवाईक) यांनी कृतज्ञ असायला हवं. असो.

भगवान अर्जुनाला एक महत्त्वाचं जीवनसूत्र सांगताहेत. कर्म तर अनिवार्य आहे. म्हणजे ते करायलाच हवं. ते करताना महत्त्वाची असते ती मनाची अवस्था. मनःस्थिती. जीवनात अनेक द्वंद्वांना सामोरं जावं लागतं. परस्परविरोधी घटनांचा स्वीकार करावा लागतो. त्यातल्या तीन परिस्थितींचा उल्लेख भगवान प्रातिनिधिक स्वरूपात करतात.
‘सुखदुःख- लाभालाभ-जयाजय’ ही तीन द्वंद्वं. ढोबळपणे असं म्हणता येईल की सुखदुःख हे मनावर अवलंबून असतं. आपल्या मानण्यावर अवलंबून नसतं. पू. गोंदवलेकर महाराज म्हणतात- ‘सुखदुःख नावाची कोणती वस्तूच अस्तित्वात नाहीये. आपणच आपल्या कल्पनेनं त्याला जन्म देतो नि परिणाम भोगत बसतो.’

दुसरं द्वंद्वं लाभालाभ. आपली बुद्धी लाभ आणि अलाभ (हानी, नुकसानी) यांचा विचार करते. योग्य पद्धतीनं विचार केला तर लाभालाभ हा केवळ प्रापंचिक विचार आहे. शिवाय आजचा लाभ ही उद्याची हानी ठरू शकते. या उलटही घडू शकते. वरवर नुकसान वाटणाऱ्या परिस्थितीच्या पोटात उद्याचा लाभ दडलेला असतो.
तिसरं द्वंद्वं- जयाजय म्हणजे जय-पराजय, यश-अपयश. यात समस्थितीत राहण्यासाठी चित्ताचा म्हणजे चिंतनाचा उपयोग आहे. जय-पराजय यावर चिंतन केलं तर हे सर्व तात्कालिक आणि सापेक्ष असतात. एकाचा जय हा दुसऱ्याचा पराजय असला तरी त्याच घटनेत जयात पराजय नि पराजयात जय दडलेला असतो. दोन उदाहरणं यासंदर्भात आदर्श आहेत. धर्मराज युधिष्ठिर नि सम्राट अशोक.

महाभारत युद्ध जिंकल्यावरही युधिष्ठिर अस्वस्थ होता. त्याला आपल्या विजयापेक्षा युद्धात मारल्या गेलेल्या हजारो व्यक्ती, त्यांची कुटुंबे (आई-पत्नी-मुले) सतत डोळ्यांसमोर- विशेषतः मनाच्या डोळ्यांसमोर दिसत होती. या निराधार माता-विधवा स्त्रिया नि अनाथ मुलं यांच्या या परिस्थितीला आपण जबाबदार आहोत, हा आपला पराजय आहे अशी त्याची ठाम भावना झाली होती. याउलट युद्धात पराभूत होऊनही कौरवांना स्वर्गप्राप्ती झाली हा त्यांचा पराजयातला जय होता. विचार करूया…

दुसरं उदाहरण सम्राट अशोकाचं. अत्यंत महत्त्वाचं नि प्रतिष्ठेचं असं कलिंग-युद्ध जिंकूनही सम्राट अशोक अस्वस्थ होता. समोर पडलेल्या प्रेतांचा खच, वाहून गोठलेलं रक्त नि मांसाचा झालेला चिखल पाहून त्याला आपल्या विजयाची लाज वाटू लागली. त्याच्या मनात अपराध नि पश्चात्ताप भावना जागृत झाली. विजयाचा आनंद केव्हाच मावळून गेला होता.

एकूण काय, पापाचा विचार हा मन-बुद्धी-चित्त या अंतःकरणाच्या त्रिविध अंगांवर अवलंबून असतो. एकच कृती किंवा एकच अनुभव किंवा एकच परिस्थिती सदैव जय-लाभ आणि सुख याचा अनुभव देईल असं नाही. किंबहुना जीवनाचा तसा नियमच नाही. अशा द्विधा-द्वंद्वात्मक परिस्थितीत मनाचा तोल, बुद्धीचं संतुलन आणि चित्ताची स्थिरता कायम राखणं यात जीवनमुक्तीचं रहस्य दडलेलं आहे.

भगवंत म्हणूनच अर्जुनाच्या निमित्तानं आपल्याला सांगताहेत- ‘जीवनातील द्वंद्वात्मक परिस्थितीत स्थिर रहा. मनाच्या समस्थितीत (समे कृत्वा) रहा. पुढे भगवंत हेही सांगतात- ‘समत्वं योग उच्यते’- ही मनाची साम्यस्थिती हाच खरा योग आहे. अर्जुनाच्या युद्धातील स्वजनांच्या हिंसेमुळे पाप लागण्याच्या भीतीच्या संदर्भात भगवंत हे सूत्र सांगताहेत- जीवनातील सर्व द्वंद्वं समान मानून नंतर युद्ध केलं तर पापभावना मनाला स्पर्श करणार नाही. म्हणजे युद्ध कर, कर्तव्य कर, स्वधर्माचं पालन कर हेच भगवंत अर्जुनाला निश्चितपणे समजावून सांगत आहेत.

सामान्य माणसाच्या जीवनातील काही मार्मिक उदाहरणं पाहूया. कोविड महामारीच्या काळात सर्व जगात प्रचंड दुःख पसरलं होतं. अनेक व्यवसाय बंद पडत होते, असंख्य कामगार देशोधडीला लागले होते, बेकार झाले होते. त्याच काळात औषधांचा व्यवसाय तुफान तेजीत सुरू होता. अगदी हात धुण्याच्या पदार्थांचा (हँड वॉशर्स), हात निर्जंतुक करणाऱ्या पदार्थांचा (हँड सॅनिटायझर्स) तसेच हवेतील जंजू-प्रदूषण यांच्यापासून रक्षण करण्यासाठी वापरायच्या मुखवट्यांचा (मास्कस्‌‍) व्यापार अब्जावधी रुपयांचा व्यवसाय करून प्रचंड नफा मिळवत होता. या परिस्थितीत मन स्थिर राखणं हे खरं आव्हान होतं. ‘पाप-पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी। जिणे गंगौघाचे पाणी॥’ अशी आध्यात्मिक स्वरूपाची नव्हती. गंगेच्या सतत वाहणाऱ्या पुण्यदायी पवित्र पाण्यासारखं जीवन किती जणांचं असतं? आजकाल पाप-पुण्याचा विचार तरी कोण करतो? पुण्याची मोजणी नाही, पापाची टोचणी नाही, पण म्हणून मन शांत आहे का? छे! या मनाला दुःखाची, अस्वस्थतेची टाचणी मात्र टोचत राहते. असो.

  • सुखदुःखाच्या बाबतीत मिडास राजाची गोष्ट सांगण्यासारखी आहे. सर्वांचं कल्याण करण्यासाठी सोनं (पैसा) हवं असं त्याच्या मनात आलं. देवाची आर्त भावानं प्रार्थना केली. देव प्रकट झाल्यावर ‘वर’ मागितला, ‘हात लावीन त्याचं सोनं व्हावं!’ ‘तथास्तु’ म्हणून देव अंतर्धान पावला. खरंच मिडास राजाचा स्पर्श जादुई झाला होता. अनेक गोष्टींना हात लावताच त्याचं सोन्यात रूपांतर झाल्याचा अनुभव मिडास राजाला आला. सुखच सुख! पण जेवायला बसल्यावर अन्नपाण्याचंही सोनं झालं. यावर कडी म्हणून राजाची मुलगी त्याच्याकडे धावत येते. तिला प्रेमानं धरल्याबरोबर तिचंही सोनं बनतं. केवढं दुःख! म्हणजे सुख नि दुःख एकाच गोष्टीपासून होऊ शकतं. म्हणून सुख-दुःखात समतोल राहणं शक्य आहे. समर्थ रामदास म्हणतात ते किती खरं आहे! ‘सुख-सुख म्हणता हे दुःख ठाकून आले।’
  • लाभालाभाबद्दल म्हणजे लाभ आणि अलाभ (नुकसान) एक प्रसंग (ॲनेक्डोट) सांगण्यासारखा आहे. जगप्रसिद्ध चहासम्राट लिप्टन एकदा गोल्फ खेळत होता. त्यावेळी त्याचा सेक्रेटरी धावत आला नि त्याच्या कानात कुजबुजला, ‘सर, चहाच्या बाजारात किमती गडगडल्यामुळे आपलं कोट्यवधी डॉलर्सचं नुकसान झालंय.’ हे ऐकून लिप्टनने त्याच्याकडे शांतपणे पाहिले नि म्हणाला, ‘ओके!’ नि पुढच्या क्षणी पुन्हा गोल्फ खेळू लागला. कारण नफा-नुकसान हा बाजाराचा-व्यापाराचा नियमच आहे. पण तसं प्रत्यक्षात समजून वागणं अवघड आहे. भगवंतांना हेच सांगायचंय- ‘लाभालाभौ समे कृत्वा’- कर्म करत राहिलं तर पापभावनेचा स्पर्श मनाला होत नाही.

आणखी एक उदाहरण. एका शेटजीचा एक मोठा वाडवडिलांचा वाडा होता. तो त्यानं विकला. दुसऱ्या दिवशी अकस्मात त्या वाड्याला आग लागली. शेटजीला ना खंत, ना खेद! तो जळताना घर कसं दिसतं हे बघायला गेला. आगीच्या आकाशात उठणाऱ्या ज्वाला पाहून त्याला गंमतच वाटत होती. एवढ्यात त्याचा मुलगा धापा टाकत काही कागदपत्रं घेऊन आला नि आपल्या वडिलांना म्हणाला, ‘बाबा, घात झाला. या आपल्या वाडाविक्रीच्या करारावर अजून सह्याच झालेल्या नाहीत!’ हे ऐकून तो शेटजी जो काही क्षणांपूर्वी आगीच्या ज्वालांची गंमत पाहत होता तो छाती बडवत रडत म्हणू लागला, ‘हाय रे दैवा, मैं लूट गया। खूप मोठं नुकसान झालं माझं!’ ही वृत्ती लाभ-हानीमध्ये सम, स्थिर राहणारी नाही. अशी व्यक्ती दुःखी होणार. आणि कृती दुसऱ्याचं हित बिघडवणारी असेल तर पाप लागणार नि दुःख होणारच.

लाभात- सुखात- यशात उडणारे लोक अनेक असतात. तसेच नुकसानीत- दुःखात- अपयशात बुडणारे लोकही अनेक असतात. यापेक्षा अशा द्वंद्वात्मक परिस्थितीत स्थिर राहणारे, शांत राहणारे, कुणाबद्दलही तक्रार न करणारे, घडणाऱ्या गोष्टीचा आनंदानं स्वीकार करणारे लोक भगवंताला अधिक आवडतात.
या सर्वच बाबतीत संत तुकारामांचं जीवन आदर्श आहे. अर्धं आयुष्य यशस्वी व्यापार, लाभदायक व्यवहार आणि सुख-समृद्धी यात गेल्यावर नंतरचं आयुष्य भीषण दुष्काळामुळे अपयश- नुकसान- दुःख व्यापल्यावर तुकाराम जास्त आध्यात्मिक बनले. विठ्ठलाकडे अधिकाधिक ओढले गेले. विठ्ठलमय झाले. स्वतः विठ्ठलच बनले. खरोखर ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ म्हणावं तर तुकोबानीच! असो.

सहज चिंतन म्हणून- जय नि पराजय यात स्थिर असतो त्याला ‘संजय’ म्हणतात. म्हणूनच गीतेचा वक्ता भगवान श्रीकृष्ण असला तरी प्रवक्ता म्हणून निवड संजयचीच झाली. ‘भगवान उवाच’सारखाच प्रभाव भगवद्गीतेत ‘संजय उवाच’ याचाही आहे. त्याच्या या स्वभावामुळे त्याला व्यासांकडून दिव्य दृष्टी मिळाली. एकप्रकारे ‘संजय’ व्यक्ती नव्हे तर संजयवृत्ती गीतेत भगवंतांना अभिप्रेत आहे.

  • गुढीपाडव्याला सुरू झालेल्या संवत्सराचं नाव आहे ‘पराभव’नाम संवत्सर.
    सर्वत्र सुरू झालेल्या युद्धात कुणीतरी जिंकेल, कुणीतरी हरेल; पण एकूण जीव-मालमत्तेचं नुकसान पाहता सर्वांचा पराभवच आहे. आपण मात्र सुखदुःख, लाभहानी, यशअपयश अशा दोन्ही परिस्थितीत शांत, स्थिर राहून निराशा, नकारात्मकता, विफलता यांनी ग्रासलेल्या मनोवृत्तीचा संकल्पपूर्वक पराभव करूया.