सीएएवर माघार नाही ः अमित शहा

0
125

>> ममता बॅनर्जींच्या बालेकिल्ल्यात गृहमंत्र्यांचा इशारा

ममता बॅनर्जी यांचा बालेकिल्ला असलेल्या पश्‍चिम बंगालमधील कोलकातामध्ये काल केंद्रिय गृहमंत्री अमितशहा यांनी जाहीर सभा घेतली. यात त्यांनी सीएए, काश्मीर, राम मंदिर आणि श्यामाप्रसाद मुखर्जींच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जीवर हल्ला चढवला. तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्ष नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करत आहेत. पण आम्ही सीएएवर मागे हटणार नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप बहुमतासह राज्यात सत्तेत येईल, असा विश्‍वास शहा यांनी यावेळी व्यक्त केला.

विरोधी पक्षात असताना ममता बॅनर्जींनी शरणार्थींच्या नागरिकत्वाचा मुद्दा उपस्थित केला होता. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सीएए कायदा आणलाय तर ममता बॅनर्जी कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांसोबत जाऊन विरोध करत आहेत. ममता बॅनर्जी अल्पसंख्याकांमध्ये भीती निर्माण करत आहेत. सीएएमुळे नागरिकत्व देण्यात येते. त्याने कुणाचे नागरिकत्व काढून घेतले जात नाही. सीएएमुळे अल्पसंख्याकांवर कुठलाही परिणाम होणार नाही, असे शहा यांनी यावेळी स्पष्ट केले.

आगामी पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत भाजप बहुमताने सत्तेत येईल. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी आम्हाला प्रचार करू दिला नाही. तरीही ममता बॅनर्जी भाजपला रोखू शकल्या नाही. आता आणखी अन्याय सहकेला जाणार नाही. बंगालमध्ये आम्हाला सत्ता बदल घडवायचा आहे असा दावा यावेळी गृहमंत्र्यांनी केला. आगामी निवडणुकीतही कायम राहील. भाजप दोन तृतियांश बहुमत मिळवत राज्यात सत्ता स्थापन करेल, असा विश्वास अमित शहांनी यावेळी व्यक्त केला.