सीआरझेड, वनक्षेत्रात सेलिब्रिटींची सेकंड होम्स

0
3

>> पर्यावरणवाद्यांचा आक्षेप; आलिशान बंगल्यांसाठी गोव्याच्या निसर्गावर नांगर

अक्षय कुमार असो अथवा शाहरुख खान, प्रियांका चोप्रा असो किंवा समीरा रेड्डी, पूजा बेदी असो अथवा पुरब कोहली, इम्रान हश्मी असो अथवा अभय देओल बॉलिवूडमधील या सेलिब्रिटींपासून, विदेशी संगीतकार, विदेशी लेखक, भारत व भारताबाहेरील उद्योगक अशा सर्वांसाठीच आता गोव्यात ‘सेकंड होम’ खरेदी करणे हा प्रतिष्ठेचा विषय ठरला आहे. या सेलिब्रिटी व उच्च पदस्थ लोकांना ही ‘सेकंड होम्स’ उभारू देण्यासाठी राज्यातील सीआरझेड कायदा तर धाब्यावर बसवला जात आहे. त्याशिवाय जैवविविधतेने भरलेल्या निसर्गावरही नांगर फिरवला जाऊ लागला आहे.

बॉलिवडूमधील एक प्रसिद्ध अभिनेता धर्मेंद्र यांचा पुतण्या अभय देओल याने गोव्यातील एका घनदाट वनक्षेत्रात मध्यभागी एक आलिशान बंगला बांधलेला असून, या घराचा उल्लेख त्यांनी ‘ग्लास हाऊस’ असा केला आहे. या ‘हाय एन्ड’ हाऊसमध्ये त्यांनी हल्लीच गृहप्रवेश केला. अभय देओल यांच्या या बंगल्याच्या सभोवताली वनराई पाहून या गृहप्रवेशाला आलेल्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर गोव्यातील वन क्षेत्रात अशाप्रकारे सेलिब्रिटींचे आणखी बंगले उभे राहण्याची भीती निर्माण झाली आहे. देओल यांनी आपल्या या गृहप्रवेशाच्या वेळी मुंबईतील पत्रकारांनाही बोलावले होते व त्यावेळी त्यांना या बंगल्याबरोबरच आजूबाजूच्या जंगल परिसराचीही सैर घडवली होती, अशी माहिती हाती आली आहे.

हिंदी आणि तेलगु चित्रपटात काम केलेली अभिनेत्री समीरा रेड्डी हिने 2020 साली पर्वरी येथे अलिशान असे घर खरेदी केले आहे. प्रिया चोप्रा हिने बागा येथे भलेमोठे पोर्तृगीजकालीन घर विकत घेतलेले आहे. भारतात जन्मलेली पोर्तुगीज अभिनेत्री एलेना डिक्रुझ हिचे पर्रा येथे अलिशान असे घर आहे.
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याचा अतिप्रशस्त असा पोर्तुगीजकालीन आलिशान बंगला हणजूण परिसरात असून, तो समुद्रकिनाऱ्याजवळ आहे. आणखी एक बॉलिवूड अभिनेता इम्रान हश्मी याचे चार मजली पेंटहाऊस अपार्टमेंट गोव्यात असून, तेही समुद्र किनाऱ्याजवळ आहे.

देशभरातील सेलिब्रिटी व बड्या उद्योजकांनी गोव्यात सेकंड होम बांधण्याची मालिका सुरू केल्याने राज्यातील वनक्षेत्र आणि सीआरझेडमधील जमिनीवर या लोकांकडून कब्जा केला जाण्याची भीती राज्यातील पर्यावरणवादी व जागरुक नागरिकांकडून व्यक्त केली जाऊ लागली आहे. प्रसिद्ध पार्श्वगायक मिका सिंग याने गेल्या वर्षी हणजूण किनाऱ्यावर बेकायदेशीररित्या बीच फ्रंट बंगल्याचे बांधकाम केले होते. नंतर हणजूण पंचायतीने सदर बंगल्याचे काम बंद ठेवण्याची नोटीस त्याला बजावली होती.
गेल्या काही महिन्यांत राज्यातील विविध जंगल क्षेत्रात आग लागण्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे त्या ठिकाणची वनसंपदा नष्ट झालेली असून, त्याचा फायदा उठवत बॉलिवूड सेलिब्रिटी आणि परराज्यातील गर्भश्रीमंत व्यक्ती गोव्यातील जमिनी खरेदी करून तेथे अशी आलिशान सेकंड होम उभारण्याची भीती राज्यातील पर्यावरणवादी व पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त होऊ लागली आहे. यापुढे अशा प्रकारे कुणालाही जंगलात बंगला, घरे बांधण्याची परवानगी दिली जाऊ नये, अशी मागणी पर्यावरणवाद्यांकडून होऊ लागली आहे.