गोवा खंडपीठाने सिद्दिकीची याचिका फेटाळली
रायबंदर येथील गुन्हा विभागाच्या पोलीस कोठडीतून पळून जाण्याच्या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) हस्तांतरित करण्याची मागणी करणारी सिद्दिकी ऊर्फ सुलेमान खान याने दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने काल फेटाळून लावली.
राज्यातील जमीन हडप करण्याच्या अनेक प्रकरणांमध्ये सिद्दिकी खान याला गुन्हा अन्वेषण विभागाने नोव्हेंबर 2024 मध्ये हुबळी-कर्नाटक येथे अटक करून गोव्यात आणले होते. त्यानंतर त्याने डिसेंबर 2024 मध्ये आयआरबी कॉन्स्टेबल अमित नाईकच्या मदतीने रायबंदर येथील गुन्हे शाखेच्या तुरुंगातून पलायन केले होते. गोवा पोलिसांनी सिद्दिकीला केरळमध्ये पुन्हा अटक करून गोव्यात आणले होते. या पोलीस कोठडीतून पलायन प्रकरणाचा तपास जुने गोवे पोलीस करीत आहेत.
पोलीस कोठडीतून आपण पसार झालो नव्हतो, तर पोलिसांनी आपल्याला पळून जाण्यास भाग पाडले होते, असा दावा करून सिद्दिकीने या पलायन प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी याचिकेत केली होती.
पोलीस कोठडीतून पलायन केल्यानंतर सिद्दिकीने व्हिडिओ जारी करून आपणाला पोलिसांनी हुबळी येथे आणून सोडले. तसेच, आपला एन्काऊंटर करण्याची धमकी दिली, असा आरोप केला होता. तसेच माझ्या पलायनात पोलिसांचा सहभाग आहे. आपण गोव्यात परत यायला तयार आहे; पण या प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत झाला पाहिजे, अशी मागणी सिद्दिकीने त्यावेळी केली होती.
जुने गोवे पोलिसांनी पोलीस कोठडीतील पलायन प्रकरणामध्ये सिद्दिकी खान, बडतर्फ आयआरबी कॉन्स्टेबल संशयित अमित नाईक आणि हजरतसाब बवन्नवार ऊर्फ हजरत अली याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणामध्ये आरोपपत्र पणजी येथील न्यायालयात दाखल केले आहे.