साहित्यिक, समाजसेवक डॉ. अनिल अवचट यांचे निधन

0
15

>> ७८व्या वर्षी पुण्यात घेतला अखेरचा श्‍वास; व्यसनमुक्ती क्षेत्रात मोठे कार्य

साहित्यिक, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचे काल वयाच्या ७८व्या वर्षी निधन झाले. पुण्यातील पत्रकारनगरातील राहत्या घरी दीर्घ आजाराने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. केवळ साहित्य विश्वताच नाही, तर समाजातही त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. पत्रकार म्हणून त्यांनी अनेक विषयांवर आपली मते मांडली.
डॉ. अवचट यांनी त्यांच्या दिवंगत पत्नी डॉ. अनिता अवचट यांच्यासोबत मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना केली. त्यांच्या पश्चात त्यांच्या विवाहित मुली मुक्ता आणि यशोदा असा परिवार आहे. डॉ. अनिता आणि अनिल अवचट यांच्या व्यसनमुक्तीच्या क्षेत्रातील कार्याचा वसा यापुढे सुद्धा असाच पुढे चालू राहील, असे मुक्तांगणचे अध्यक्ष डॉ. आनंद नाडकर्णी यांनी म्हटले आहे.
व्यसनाधीन झालेल्या व्यक्तींना व्यसनमुक्त करण्यासाठी डॉ. अवचट यांनी पुण्यात मुक्तांगण या व्यसनमुक्ती केंद्राची सुरुवात केली. ते या केंद्राचे संचालक होते. त्यांनी आपल्या पत्नी डॉ. सुनंदा अवचट यांच्या सहकार्याने व्यसनमुक्तीची शोधलेली अनोख पद्धत ही जगभरातील अनेक व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये वापरली जाते.

व्यसनमुक्ती क्षेत्रातील डॉ. अनिल अवचट यांच्या कार्यासाठी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार त्यांना मिळाला होता. महाराष्ट्र राज्य वाङ्‌मय पुरस्कार, फर्ग्युसन गौरव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले.