सावंतवाडीतील विवाहित महिलेचा हरमल येथे खून

0
30

>> बांद्यातील संशयित तरुणाला अटक

खालचावाडा-हरमल येथील एका गेस्ट हाऊसमध्ये काल दुपारी एक ३० वर्षीय विवाहित महिला मृतावस्थेत आढळली. सदर महिला माडखोल-सावंतवाडी येथील असून, तिच्यासोबत या गेस्ट हाऊसमध्ये उतरलेल्या बांदा येथील २५ वर्षीय तरुणाने तिला रेटॉल पाजून निर्दयीपणे तिचा खून केल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी बांदा येथील संशयित तरुण गणेश विर्नोडकर याला पेडणे पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात ९ मे रोजी गणेश विर्नोडकर नामक तरुण सावंतवाडीतील सदर महिलेसोबत गेस्ट हाऊसमध्ये उतरला होता. काल, सोमवारी दुपारी २ च्या सुमारास बंद खोलीतून दुर्गंधी येऊ लागल्याने रुम बॉयने व्यवस्थापकास कल्पना दिली. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यात सदर महिला जमिनीवर मृतावस्थेत आढळली. पोलिसांनी सदर महिलेचे नाव अद्याप उघड केलेले नाही.

तपासादरम्यान १३ मे रोजी रात्रीच्या सुमारास गणेश दाराला कुलूप लावून बाहेर पडल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले. गेस्ट हाऊसमध्ये प्रवेश करतेवेळी सदर युगुलाकडे ओळखपत्र मागितले होते, त्यावेळी महिलेने स्वतःचे ओळखपत्र दिले, तर गणेशने आपण दोन दिवसांत पुन्हा आल्यानंतर ओळखपत्र देण्याचे मान्य केले होते; मात्र अखेरपर्यंत त्याने आपले ओळखपत्र दिले नव्हते, अशी माहिती व्यवस्थापकाने दिली. गणेशने गुगल पेचा वापर करून गेस्ट हाऊसच्या रुमचे भाडे फेडले होते, त्या आधारे पोलिसांना त्याचा शोध घेण्यात यश आले.
प्राप्त माहितीनुसार, सदर महिला गणेश याच्या मित्राची बायको असून, प्रेम प्रकरणातून हा खून झाल्याचा संशय आहे.