सांगेतील प्रस्तावित आयआयटी स्थळी कलम १४४ लागू; जमाव करण्यास बंदी

0
28

सांगे येथील प्रस्तावित आयआयटी स्थळी स्थानिक ग्रामस्थांकडून या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून चालू असलेले आंदोलन लक्षात घेऊन काल दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांनी सदर ठिकाणी कलम १४४ लागू केले आहे.

त्यामुळे या प्रकल्पापासून २०० मीटरपर्यंतच्या जागेत ५ किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना जमाव करण्यावर बंदी लागू झाली आहे. दुसर्‍या बाजूला प्रस्तावित आयआयटी प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध कायम आहे. काल या ठिकाणी सीमांकनाचे काम चालू असताना अडथळा आणल्या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली. तसेच अन्य तिघा जणांविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले आहेत.

सांगे तालुक्यातील कोठार्ली गावातील सर्वे क्रमांक २१/१ येथे आयआयटी प्रकल्प उभारण्याची तयारी राज्य सरकारने केली आहे. सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई यांनी ज्या जागेवर आयआयटी प्रकल्प होऊ घातला आहे, ती जागा सरकारच्या मालकीची असल्याचा दावा केला आहे.