सांकवाळमध्ये 16 बेकायदा घरे जमीनदोस्त

0
18

>> उर्वरित घरे आज पाडणार; सांकवाळ कोमुनिदादच्या जमिनींत अतिक्रमण; परिसरात एकूण 64 बेकायदा बांधकामे

सांकवाळ कोमुनिदादच्या जमिनींमध्ये अतिक्रमण करून बांधण्यात आलेल्या 31 घरांवर कालपासून बुलडोझर फिरवून ती जमीनदोस्त करण्यास सुरुवात करण्यात आली. प्रत्यक्षात या ठिकाणी एकूण 64 बेकायदा बांधकामे आहेत. काल सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत 16 घरे जमीनदोस्त करण्यात आली. उर्वरित सर्व घरांवर गुरुवारी कारवाई पूर्ण होणे अपेक्षित आहे. कालच्या कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी कोमुनिदादमधील मूळ गोमंतकीयांची बेकायदा घरे कायदेशीर करण्यासाठी हिवाळी अधिवेशनात दुरुस्ती विधेयक आणणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर लगेचच ही कारवाई झाल्याने तिला अधिक महत्त्व आले आहे.

सांकवाळ कोमुनिदादीच्या सर्वे क्र. 154/1 आणि 90/1 या जमिनींमध्ये अतिक्रमण करून 62 बांधकामे उभारण्यात आली आहेत. त्यातील सर्वे क्र. 154/1 व जमिनींतील 31 बांधकामे काल सकाळी 11 वाजल्यापासून जमीनदोस्त करण्यास सुरुवात झाली. याबाबतचा आदेश उपविभागीय दंडाधिकारी तथा अतिक्रमण हटाव पथकाचे प्रभारी उदय प्रभुदेसाई यांनी जारी केला
होता.

या प्रकरणी सांकवाळ कोमुनिदादचे ॲटर्नी जयेश फडते यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका दाखल केली होती. सांकवाळ कोमनिदादमध्ये सर्वे क्रमांक 154/1 मध्ये 22,850 चौरस मीटर आणि सर्वे क्रमांक 90/1 मध्ये 14,175 चौरस मीटर जमीन असल्याची माहिती याचिकेत मांडली होती. सांकवाळ कोमुनिदादने प्रथम 10 फेब्रुवारी 2022 रोजी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी आणि दक्षिण गोवा कोमुनिदाद प्रशासक यांच्याकडे तक्रारी दाखल करून कारवाईची मागणी केली होती. 24 फेब्रुवारी 2022 रोजी वेर्णा पोलिसांतही तक्रार दिली होती. सांकवाळ कोमुनिदादने संबंधित यंत्रणेकडे कारवाईची वारंवार मागणी केली होती; पण कारवाई झालीच नाही. दुसऱ्या बाजूने बांधकामे चालूच राहिली.

संबंधित यंत्रणा कारवाई करत नसल्यामुळे जयेश फडते यांनी गोवा खंडपीठात धाव घेतली. याचिकेत त्यांनी राज्य सरकार, मुरगाव नियोजन जिल्हाधिकारी, दक्षिण गोवा कोमुनिदाद प्रशासक, सांकवाळ पंचायत, पंचायत उपसंचालक, संतोष मुरारी नाईक, राजेश मुरारी नाईक आणि रत्नाकर प्रभू यांना प्रतिवादी केले. जयेश फडते यांनी 31 बेकायदेशीर बांधकामे उभारण्यात आल्याची माहिती या प्रकरणाच्या सुनावणीवेळी गोवा खंडपीठाला दिली.

खंडपीठाने पंचायत उपसंचालक आणि मुरगाव नियोजन विकास प्राधिकरणाच्या (एमपीडीए) सदस्य सचिवांना दोन्ही जमिनींतील बांधकामांची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे, तसेच कारवाई करण्याचे निर्देश दिले. संबंधितांनी पाहणी केली असता, अतिक्रमण करून बांधकाम केल्याचे उघड झाले. दक्षिण गोवा कोमुनिदाद प्रशासकाने 20 ऑक्टोबर रोजी अतिक्रमण हटवण्यासाठी पथकाची मागणी केली. त्यानुसार काल ही मोहीम हाती घेण्यात आली.
यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच घटनास्थळी सांकवाळ कोमुनिदादचे अध्यक्ष प्रताप म्हर्दोळकर, ॲटर्नी जयेश फडते, खजिनदार श्रीनिवास नाईक व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

नोटीस बजावूनही घरे खालीच केली नाही
बुधवारपासून कारवाईस सुरुवात होणार हे संबंधित अतिक्रमणकर्त्यांना माहीत असून सुद्धा घरमालकांनी घर खाली केले नव्हते. त्यांना एक महिना अगोदर नोटीस बजावली होती. त्यांना काल जबरदस्तीने घर खाली करण्यास भाग पाडले.

आज उर्वरित सर्व घरांवर कारवाई
सांकवाळ कोमुनिदादच्या जागेत 31 बेकायदेशीर बांधकामे उभारण्यात आल्याची माहिती गोवात खंडपीठाला दिली असली, तरी या घरांचा आकडा 64 इतका आहे. कारण काही घरांची नोंदच नसल्याचे सांगण्यात आले. गुरुवारी या सर्व घरांवर कारवाई होणार आहे हे नक्की. दरम्यान घटनास्थळी कोणत्याच लोकप्रतिनिधींनी येऊन विचारपूस केली नसल्याने घरमालकांनी नाराजी व्यक्त केली.

घरे न मोडण्याची याचना
‘आपली घरे मोडू नका’ अशी याचना काही घरमालक संबंधित अधिकाऱ्यांकडे करत होते; पण कारवाईचा आदेश न्यायालयाने जारी केल्याने त्यांची याचना व्यर्थ ठरली. काल सायंकाळपर्यंत 16 घरांवर बुलडोझर फिरवण्यात आला.