सहेला रे

0
15
  • – विघ्नेश शिरगुरकर

म्हटलं तर एक रम्य आठवणींची, हव्या असलेल्या, बर्‍या वाटणार्‍या क्षणांनी भरलेली जादूची पोतडी आणि म्हटलं तर जुन्या जखमांवरची खपली पुन्हा एकदा निर्दयीपणे काढून जुनी जखम भळभळत ठेवणारा एक नकोसा काळ.

म्हटलं तर एक रम्य आठवणींची, हव्या असलेल्या, बर्‍या वाटणार्‍या क्षणांनी भरलेली जादूची पोतडी आणि म्हटलं तर जुन्या जखमांवरची खपली पुन्हा एकदा निर्दयीपणे काढून जुनी जखम भळभळत ठेवणारा एक नकोसा काळ.

कधीकधी आपला भूतकाळ फिरून पुन्हा एकदा आपल्यासमोर दत्त म्हणून उभा ठाकतो, आणि आपल्या वर्तमानात येऊन हा भूतकाळ नेमकी काय उलथापालथ करणार आहे किंबहुना उलथापालथ करणार की काहीतरी नवीन आणि अनपेक्षित अनुभव आपल्याला देऊन आपला आज आणखीन सुखकर करणार याची आपल्याला तशी पुसटशीही कल्पना नसते.
१३ व्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवाचा पडदा उघडला आणि आम्हाला एका सुंदरशा चित्रपटाचा प्रिमियर पाहायला मिळाला. ‘सहेला रे’ हा मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित चित्रपट गोवा मराठी चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी प्रिमियर शो म्हणून पाहायचा एक सुंदर योग आला.

या चित्रपटाची कथा फार सुंदर आहे. विक्रम राजाध्यक्ष (सुबोध भावे) हा एक प्रसिद्ध डॉक्टर, ज्याचं प्रायोगिक तत्त्वावर उभारलेलं गायींचं एक फार्म आहे. खेडेगावात आलिशान बंगला आहे. तो मुंबई, पुणे आणि दिल्ली अशा वार्‍या करत आपलं करिअर उत्तरोत्तर वाढवत नेण्याचा उत्तमोत्तम प्रयत्न करत यशस्वी होत असतो. त्याची बायको शमा (मृणाल कुलकर्णी) ही पदवीधर, दोन मुलांची आई, एक यशस्वी गृहिणी आणि गोधड्या शिवायचा लघु उद्योग सुरू करावा ही कल्पना मनात बाळगून विक्रमला सुरेख साथ देतेय. जर का वर्तमानात विक्रम, शमा आणि निरंजनच्या बॅचचं गेट टुगेदर ठरलं आणि ठेवलं नसतं तर पुढचं रामायण घडलं नसतं.

शमा ही विक्रमची सावली आहे. अख्ख्या घराचा डोलारा स्वतःच्या खांद्यावर घेऊन ती विक्रमला मोकळं अवकाश देते. सासुबाईंच्या आरोग्याची काळजी, डिमेन्शिया आजार बळावलेल्या स्वतःच्या वडिलांची शुश्रूषा करणं, विक्रमला काय हवं-नको ते चोवीस तास बघणं आणि त्याच्या फार्मचा बिझनेस, तिथं येणारे पाहुणे-रावळे यांना सामोरं जाणं, या आणि अशा असंख्य गोष्टी शमा पडद्यामागून अगदी सहज आणि लीलया पार पाडते. गेट टुगेदर ठरून पार पाडतं, पण एका नेमक्या भूतकाळात हव्या असलेल्या व्यक्तीची आणि शमाची गाठभेट होत नाही, इथं चुकामूक होते आणि चित्रपट पुढे सरकतो. हा चाळिशीतला चिरतरुण म्हणजे यशस्वीपणे मधुमक्षिका पालन करून अमेरिकेसारख्या प्रगत देशात स्वतःची मधाची कंपनी चालवणारा अस्सल पुणेरी मराठी माणूस, निरंजन काणे. तो आपलं व्हिजिटिंग कार्ड विक्रमच्या आईच्या हातात देतो. अमेरिकेत जाऊन तो एन. डी. काणेचा ‘अँडी केन’ कसा होतो, ही एक मजेशीर बाब समोर येते. निरंजन ऊर्फ निक्याची रोमँटिक भूमिका सुमित राघवनने अतिशय सुंदररीत्या वठवली आहे. अतिउत्साहाच्या नादात राजाध्यक्षांच्या घरात- तेही बुट घालून- देवघरात पोहोचलेला निरंजन जरी आईच्या कपाळावर आठ्या आणत असला तरी नंतर तो त्यांचा लाडका होतो. निरंजनला फार्म पाहायचं असतं, पण हा एक बहाणा असतो.

त्याचबरोबर शमाला जवळून अनुभवता येईल, तिला भेटता येईल अशा पद्धतीने त्याला ती भेट हवी असते. मुंबईला गेलेला विक्रम आणि तिथून परस्पर दिल्लीला त्याचा ठरलेला दौरा शमाचा एकूण मूड खराब करतो. त्यादिवशी तिचा वाढदिवस असतो, पण तेही विसरलेला विक्रम तिला चुकून लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो, जो खरंतर दोन दिवसांनंतर असतो. वेळ न देणारा नवरा, अखंड बडबड करणारी आणि स्वयंचलित व्हिलचेअरवर बसून सगळे निर्णय घेणारी सासू या दोन नगांमुळे वाढदिवशी मूड खराब झालेली शमा… या सगळ्या गोंधळात निरंजनची घरात दुसर्‍यांदा एंट्री होते. घरातील राजांगणात छतावरची कसली तरी वस्तू काठीने खाली खेचण्याचा प्रयत्न करणारी शमा आणि तिथे अवचित येऊन पोहोचलेला निरंजन… खरंतर दोघांनी एकमेकांना ओळखलेलं असतं पण शमा ओळख दाखवत नाही.

निरंजनला फार्म बघायचं असतं आणि डॉक्टर विक्रम राजाध्यक्षांशी तो तसं बोललेला असतो, त्यामुळे नाईलाजास्तव शमा त्याला सोबत घेऊन बाहेर पडते. निक्याला सगळं काही पाठ आहे… तिची शाळा, तिचा पहिली ते दहावीचा रोल नंबर, एस. पी. कॉलेजला असतानाच्या आठवणी आणि केलेली धमाल. निरंजन शमाला सगळ्या खाणाखुणा पटवतो आणि शमा ओळख पटल्यावर ती पटल्यासारखी प्रतिक्रिया देताना निक्याने दिली तशीच माहिती फार सहजपणे देते. त्यांचा पहिला दिवस हा गप्पाटप्पांमुळे तसा अपूर्ण राहतो. दुसर्‍या दिवशी सकाळी निरंजन तिला मेसेज करून आजच्या दिवसाची भेटीची वेळ व ठिकाण विचारतो आणि ती दोघं परत एकदा भेटतात.

गप्पा, गतकाळातील रम्य आठवणी, तिच्या सवयी, त्याचे मॅनर्स आणि मॅनरिझम्स या सगळ्या गोष्टी करत-करत ती दोघं ड्राईव्हच्या नादात ट्रेकलादेखील पोहोचतात. कॉलेजमध्ये असतानादेखील ती दोघं ट्रेकिंग ग्रुपचा भाग होती.
तिचा वीस वर्षांचा संसार, डॉक्टर विक्रम राजाध्यक्षसारखा यशस्वी नवरा, अमेरिकेत असलेली तिची मुलगी अनघा आणि घरी पंधरा-सोळा वर्षांचा मुलगा, त्यांचं नावारूपाला आलेलं फार्म… हा सगळा मांडलेला डाव तसाच पुढे चालू ठेवणार की आहे तो डाव उधळून लिंडा नावाच्या अमेरिकन तरुणीशी लग्न केलेल्या निरंजनशी ती नवीन इनिंग सुरू करणार?
ट्रेकमध्ये असं काय घडतं की त्यामुळे शमाचं आयुष्य बदलून जातं? कॉलेजमध्ये असताना वीस वर्षांच्या निरंजनने एकोणीस वर्षांच्या शमाला का बरं प्रपोज केलं नाही? शमा निरंजनसाठी थांबली होती का? बरं थांबली होती तर तिनं बी.ए.चा रिझल्ट लागायच्या आधीच भल्यामोठ्या लांबलचक डिग्र्यांचं भेंडोळं कमावलेल्या विक्रम राजाध्यक्षसारख्या माणसाशी का बरं लग्न केलं? त्या डायरीत जपून ठेवलेल्या सुकलेल्या पांढर्‍या फुलांचा अर्थ काय? विक्रम, शमा आणि निक्या हे त्रिकूट शेवटी कुठं जाऊन पोहोचणार? शमा आणि निरंजन हे एकामेकाला आवडायचे आणि ही हळुवार भावना आजही त्यांच्या मनात तशीच घर करून आहे का? आणि हे जर का सत्य असेल तर विक्रम ते पचवू शकेल का? काय होईल शमा आणि विक्रमच्या नात्यावर याचा परिणाम? हे प्रत्यक्ष चित्रपट पाहूनच अनुभवण्यातच खरी मजा आहे!