सर्व गट कॉंग्रेस समित्या बरखास्त

0
26

>> ८ आमदारांच्या बंडखोरीनंतर पक्षाचा निर्णय

कॉंग्रेस पक्षाच्या ११ आमदारांपैकी ८ आमदारांनी पक्षातून फुटून भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या पार्श्‍वभूमीवर गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीने आपल्या सर्व गट कॉंग्रेस समित्या काल तात्काळ प्रभावाने बरखास्त केल्या.

पक्षाच्या संबंधित कार्यकर्त्यांशी चर्चा करून लवकरच या गट समित्यांची फेररचना करण्यात येणार असल्याची माहिती काल प्रदेश कॉंग्रेस समितीच्या सूत्रांनी दै. ‘नवप्रभा’शी बोलताना दिली. सर्व मतदारसंघांतील गट समित्या त्या त्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी योग्य ती चर्चा केल्यानंतरच स्थापन करण्यात येणार असून, त्यामुळे समित्या स्थापण्यास थोडा विलंब होऊ शकतो. ८ आमदारांनी पक्षातून फुटून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या काही समर्थकांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतल्याने पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांशी चर्चा करून नव्या गट समित्यांची स्थापना होणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.