सरकार सोडण्याबाबत नारायण राणे ठाम

0
173

आज राजीनामा देणार
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळातून आज सोमवारी राजीनामा देण्याबाबत आपण ठाम असल्याचे काल राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सांगितले. मात्र त्यापुढील योजना काय असेल हे सांगण्यास त्यांनी नकार दिला. अद्याप त्याबाबत काही निर्णय झाला नसल्याचे ते म्हणाले. विविध राजकीय पक्षांचे नेते आपल्या संपर्कात असल्याचेही त्यांनी सांगितले.
आज सकाळी १० वा. राणे मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत. दरम्यान, आपण राणे यांच्याशी चर्चा करू असे मुख्यमंत्री चव्हाण यांनी काल सातारा येथे सांगितले. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनीही राणेंच्या मुद्द्यावर तोडगा काढला जाईल, असा विश्‍वास व्यक्त केला.
दरम्यान, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ठाकरे आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी काल कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेऊन महाराष्ट्र विधानसभा निवडणूक व राणेंच्या मुद्यावर चर्चा केली.
दरम्यान, राणे म्हणाले की, महाराष्ट्रात कॉंग्रेसने नेतृत्वबदल केला नाही तर येत्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसची गत ही लोकसभा निवडणुकीसारखी होणार आहे.
राणे यांनी २००५ साली शिवसेना सोडून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
उद्धव ठाकरे यांना उद्देशून ते म्हणाले की, आपण लढवय्या असून कुणालाही घाबरत नाही. सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांच्यावर टीका करताना विरोधकांना चोख प्रत्यूत्तर दिले जाईल असे सागितले. दरम्यान, नारायण राणे यांच्याविरुद्ध ५ कोटी रुपयांची अब्रुनुकसानीची तक्रार दाखल करणार असल्याचे काल केसरकर यांनी सांगितले. राणे हे कृतघ्न आहेत. ज्या सेनेने त्यांना मुख्यमंत्री केले त्या शिवसेना प्रमुखांच्या अंत्यसंस्काराला ते उपस्थित राहिले नाहीत, की उद्धव यांची भेटही त्यांनी घेतली नाही, अशी टीका केसरकर यांनी केली.
आपण राणेंचे आव्हान स्वीकारले आहे. आपण त्यांच्याविरुद्ध सावंतवाडीत निवडणूक लढवण्यास तयार आहे. लोकांनीच राणेंच्या दादागिरीला लगाम घालावा, असे आवाहनही केसरकर यांनी केले.