सरकारविरुद्धचा अविश्वास ठराव फेटाळला

0
6

>> चर्चेवेळी पंतप्रधानांची काँग्रेस, ‘इंडिया’सह राहुल गांधींवर टीका; विरोधकांच्या सभात्यागानंतर मणिपूर हिंसाचारावर निवेदन

मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरून केंद्रातील मोदी सरकारविरोधात काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी दाखल केलेला अविश्वास ठराव काल आवाजी मतदानाने फेटाळण्यात आला. गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या या अविश्वास ठरावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 तासांहून अधिक वेळ भाषण करत उत्तर दिले. मात्र जोपर्यंत विरोधक सभागृहात हजर होते, तोपर्यंतच्या पहिल्या एक-सव्वाएक तासात पंतप्रधानांनी मणिपूरचा मुद्दा टाळून सरकारची कामगिरी, काँग्रेस व ‘इंडिया’वर टीकाटिप्पणी आणि राहुल गांधींवर हल्लाबोल केला. यादरम्यान विरोधकांनी सातत्याने मणिपूरवर पंतप्रधानांनी निवेदन करावे, अशी मागणी लावून धरली, त्याचसाठी हा अविश्वास ठराव आणण्यात आला होता. ती मागणी मान्य होत नसल्याचे पाहून अखेर विरोधकांनी सभात्याग केला. विरोधक सभागृहाबाहेर पडताच पंतप्रधानांनी मणिपूरवर भाष्य करत, मणिपूरमध्ये लवकरच शांतीचा सूर्य उगवेल आणि हिंसाचार प्रकरणी दोषींना कडक शिक्षा केली जाईल, असे निवेदन केले.

मणिपूरमध्ये 3 मेपासून सुरू असलेल्या हिंसाचारात आतापर्यंत 150 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 300 हून अधिक जण गंभीर जखमी झाले. सुमारे 5000 घरे जाळली गेली, तर सुमारे 60,000 लोक मदत शिबिरात आश्रय घेत आहेत. या प्रकरणी सुमारे 6500 एफआयआर नोंदवले गेले. तसेच हिंसाचारात दोन महिलांची विवस्त्र धिंड आणि अत्याचाराचे प्रकरणही चांगलेच तापले. या विवस्त्र धिंड प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर 79 दिवसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मणिपूर हिंसाचारावर भाष्य केले होते. मात्र त्यावर विरोधक समाधानी नव्हते. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पंतप्रधानांनी यावर सविस्तर निवेदन करावे, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली होती; मात्र ती मागणी मान्य होत नसल्याने अखेर विरोधकांनी अविश्वास ठरावाचे अस्त्र उपसले होते.
मणिपूरच्या मुद्द्यावरून विरोधकांनी मोदी सरकारविरोधात संसदेत आणलेल्या अविश्वास ठरावावर मंगळवारपासून चर्चेला सुरुवात झाली. या चर्चेदरम्यान काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींना तीन प्रश्न विचारले होते. तीन महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू असताना नरेंद्र मोदी तिथे का गेले नाही? मणिपूरवर बोलण्यास त्यांना 79 दिवस का लागले? मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना का हटवले नाही? असे प्रश्न पंतप्रधानांना विचारण्यात आले होते; मात्र त्या प्रश्नांना कालच्या अविश्वास ठरावावरील चर्चेवेळी पंतप्रधानांनी उत्तर दिले नाही.

अविश्वास ठराव आमच्यासाठी शुभच
विरोधकांवरच देशातील जनतेने अविश्वास दाखवला असून, त्यांचा अविश्वास प्रस्ताव हा आमच्यासाठी शुभच असतो. एनडीए आणि भाजप 2024 च्या निवडणुकीत सर्व विक्रम मोडून पुन्हा सत्तेत यावे हे विरोधकांनी ठरवल्याचे यातून मला दिसत आहे, असेही मोदी यावेळी म्हणाले.

अधीर रंजन चौधरींचे निलंबन
काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांचे काल लोकसभेतून निलंबन करण्यात आले. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचा प्रस्ताव दिला, तो सभागृहाने आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला. चौधरी यांनी अविश्वास ठरावावरील चर्चेवेळी काल पंतप्रधान मोदींची तुलना नीरव मोदीशी केली होती. तसेच मोदींचे भाषण सुरू असताना ते अधून मधून व्यत्यय आणत होते.

मणिपूर हिंसाचारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?
मणिपूरमध्ये जे काही चालले आहे, ते दुर्दैवी असून दोषींना कडक शिक्षा होईल.
मणिपूरमध्ये लवकरच शांतीचा सूर्य उगवेल, मणिपूरच्या मागे देश ठाम उभा आहे.
राजकारणासाठी मणिपूरच्या भूमीचा वापर विरोधकांनी करू नये. मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी विरोधकांनी सोबत यावे.
मणिपूरची आजची स्थिती ही काँग्रेसच्या काळात निर्माण झाली. ईशान्य भारतातील जनतेचा काँग्रेसने विश्वासघात केला.
ईशान्य भारत हा आमच्या काळजाचा तुकडा असून त्याचा विकास हेच ध्येय आहे.

जनतेचा काँग्रेसवर
‘नो कॉन्फिडन्स’
काँग्रेसची नीती चांगली नाही, त्यांची नियतही चांगली नाही, देशाच्या जनतेने काँग्रेसवर ‘नो कॉन्फिडन्स’दाखवला असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. देशातील अनेक राज्यात काँग्रेसला जनतेने नाकारले आहे. काँग्रेसकडे स्वतःचे असे काहीच नाही, पक्ष नाही, विचार नाही, चिन्ह नाही, एवढेच काय तर मतांसाठी काँग्रेसने गांधी नावही चोरल्याची टीका पंतप्रधानांनी केली.

‘इंडिया’ नव्हे,
‘घमंडिया’ आघाडी
अविश्वास प्रस्तावावर उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या आघाडीवर जोरदार हल्ला चढवला. मोदींनी विरोधकांनी नव्याने तयार इंडिया या आघाडीच्या नावावरूनही समाचार घेतला. विरोधकांनी इंडियाचे (ख.छ.ऊ.ख.अ) तुकडे केले. विरोधकांची ‘इंडिया’ आघाडी नव्हे, तर ती ‘घमंडिया’ आघाडी असल्याची टीका त्यांनी केली.

ऐकण्याचे धैर्य नसणारे पळून जातात
पंतप्रधान नरेंद्र मोदी सुरुवातीला विविध मुद्द्यांवरून विरोधकांवर निशाणा साधत राहिले. यादरम्यान विरोधक सातत्याने मणिपूरवर बोलण्याचा आग्रह धरत होते. मात्र मोदी मणिपूरवर न बोलल्याने विरोधकांनी सदनातून बाहेर पडले. नेमके याच वेळी मोदींनी मणिपूरवर बोलायला सुरुवात केली. ज्यांच्यात ऐकण्याचे धैर्य नसते, ते पळून जातात. लोकशाहीवर ज्यांचा विश्वास नसतो, त्यांना ऐकवण्याचे धैर्य असते, मात्र ऐकण्याचे धैर्य नसते, अशी टीका मोदींनी केली.

न्यायालयात काय चालते ते आम्ही सर्व जाणतो
‘मणिपूर’वर न्यायालयाचा एक निर्णय आला आहे. आता न्यायालयात काय चालते ते आम्ही सर्व जाणतो, असे एक धक्कादायक विधान या चर्चेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले.