सरकारचा आरोग्य सर्वेक्षणाचा निर्णय मागे घेण्यासाठी राज्यपालांना साकडे

0
139

>>  गोवा फॉरवर्डतर्फे आमदार सरदेसाईंचे निवेदन

गोवा फॉरवर्ड पक्षाने काल राज्यपाल सत्यपाल मलिक यांना दिलेल्या एका निवेदनातून गोवा सरकारने वैद्यकीय क्षेत्रातील लोकांची मदत न घेता (डॉक्टर, परिचारिका आदी) घरोघरी बिगर वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना कोरोनासाठीचे सर्वेक्षण करण्याचा जो निर्णय घेतला आहे तो त्यांना तात्काळ मागे घेण्याची सूचना करावी अशी मागणी केली आहे.

या सर्वेक्षणामुळे लोकांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली असल्याचे पक्षाचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी या निवेदनातून राज्यपालांच्या नजरेस आणून दिले आहे.

सरकारने राज्यभरात वरील सर्वेक्षण करण्यापेक्षा गोव्यात कोरोनाचे जे सात रुग्ण सापडले आहेत त्यांच्या गावात जाऊन सर्वेक्षण करावा अशी सूचना केली आहे. त्याचबरोबर जे कोण ८ मार्चनंतर गोव्यात आले होते त्यांची तपासणी करावी अशी मागणीही केली आहे. तसेच ज्या लोकांनी तापासाठी सरकारी आरोग्य केंद्रे व अन्य ठिकाणी जाऊन तपासणी करून उपचार करून घेतले अशा लोकांचीही कोरोनासाठी तपासणी केली जावी अशी सूचना या निवेदनातून केली आहे. गोव्यातील एखाद्या भागात कोरोनाचा फैलाव झालेला आहे काय हे सरकारने वरील पावले उचलल्यास कळू शकेल असे सरदेसाई यांनी निवेदनात म्हटले आहे.

विदेशी जहाजांवर काम करणार्‍या व सध्या अडकून पडलेल्या गोमंतकीयांना गोव्यात आणण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारच्या मदतीने पावले उचलावीत अशी मागणीही त्यांनी केली आहे. विदेशातून ज्या गोमंतकीयांना आणले जाणार आहे त्यांना सामाजिक विलगीकरणाखाली ठेवता यावे यासाठी राज्य सरकारने राज्यातील विद्यालये, समाज सभागृहे, स्टेडियम्स आदी ताब्यात घ्यावीत अशी मागणीही पक्षाने या निवेदनाद्वारे केली आहे.