समीर वानखेडेंच्या 29 मालमत्तांवर छापा

0
3

>> सीबीआयकडून गुन्हा दाखल; मुलाच्या सुटकेसाठी शाहरुख खानकडे 25 कोटींची लाच मागितल्याचा आरोप

सीबीआयकडून अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्याशी संलग्न असलेल्या मुंबई, दिल्ली, रांची, कानपूरसह 29 ठिकाणांवरील मालमत्तांवर छापा टाकला. त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी देखील सीबीआयने छापा टाकला. 2021 मध्ये कोर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अटक केलेल्या आर्यन खान याच्या सुटकेसाठी समीर वानखेडेंनी त्याचे वडील अर्थात बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान याच्याकडे 25 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. एनसीबीने अहवाल दिल्यानंतर सीबीआयने ही कारवाई केली. कोर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात लाच मागितल्याच्या प्रकरणी वानखेडेंसह इतरांवरही बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. तसेच वानखेडे यांच्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हादेखील सीबीआयने दाखल केला आहे. त्यामुळे आता वानखेडेंसमोरील अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत.

आर्यन खान प्रकरणांनंतर एनसीबीकडून समीर वानखेडे यांची चौकशी चालू होती. एनसीबीच्या दक्षता समितीकडून आर्यन खान ड्रग्ज प्रकरण, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आणि माजी अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांचा जावई समीर खान याच्यासंदर्भातील प्रकरणाची चौकशी करण्यात येत होती. या समितीने वानखेडेंच्या बेहिशोबी मालमत्तेचा अहवाल तयार करून सीबीआयला दिला होता.

2021 साली समीर वानखेडेंच्या नेतृत्वात एनसीबीने मुंबईतील कोर्डेलिया क्रूझवर छापा टाकला होता. या छाप्यात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. देशभर हे प्रकरण खूप गाजले होते. या कारवाईनंतर समीर वानखेडे देशभर चर्चेत आले होते. पुढे न्यायालयीन सुनावणी दरम्यान आर्यन खानची या प्रकरणात निर्दोष मुक्तता करण्यात आली. यासोबतच न्यायालयाने समीर वानखेडेंच्या टीमवर जोरदार ताशेरे देखील ओढले होते.
दरम्यान, समीर वानखेडे यांनी शाहरुख खानकडे 25 कोटींच्या लाचेची मागणी केली होती, असा आरोप एनसीबीचे पंच प्रभाकर साईल यांनी त्यावेळी केला होता.