सत्यवानांच्या सावित्री

0
5
  • पौर्णिमा केरकर

स्वाभिमान आणि वास्तव जीवन गहाण टाकून केलेल्या व्रताचे पुण्य कसे काय मिळणार? त्यापेक्षा सत्यवानांसाठी सावित्रींनी आणि सावित्रींसाठी सत्यवानांनी वटवृक्षाला फेरे मारावेत. कुटुंबाला सुदृढ करीत, मुलांना संस्कारक्षम बनवत, सर्वांच्या आयुष्याची वृद्धी करणारे व्रत जोपासण्याची आज गरज आहे.

आत्ताच, कालपरवा देशभर वटसावित्रीचे व्रत सौभाग्यवती स्त्रियांनी मोठ्या उत्साहात साजरे केले. पारंपरिक वेशभूषेत ज्यांची जशी ऐपत असेल तसे दागदागिने घालून मोठ्या दिमाखात जन्मोजन्मी हाच पती मिळू दे म्हणून वटवृक्षाला सप्तफेऱ्यांच्या धाग्यांनी बांधून ठेवले. समाजमाध्यमांवर आकर्षक रिल्स बनवून त्या प्रसारित करण्यात आल्या. एखाद्या चित्रपटात किंवा एखाद्या मालिकेत शोभावी अशाच तऱ्हेची व्हिडिओग्राफी. शरीर-मनावर खानदानी तेज. जगातील अतिशय सुंदर, तेजस्वी अन्‌‍ खानदानी वाटणारं प्रत्येक जोडपं. सुख भरभरून सांडताना चेहऱ्यांवर स्पष्ट दिसत होतं. शिवाय कपड्यांतून, दागिन्यांतून ते अधिक भरजरी भासलं. वर्तमानपत्रांतून बातम्या छापून आल्या. एकंदरीत सगळी जोडपी किती सुखी-समाधानी आहेत ते पाहून खूप बरं वाटले.

दूरदर्शनच्या सर्व मालिकांतील नायिका एकत्र आल्या, त्यांनी सामूहिक पूजा केली. साड्या, दागिने, गाड्या आणि त्यांच्या रंगरूपाला बरोब्बर साजेल असाच राजबिंडा नवरा! सगळे पाहून डोळे दिपून गेले. मालिकेतील चौकोनी कुटुंब अगदी आखीव-रेखीव. भरलेले घर, सुना खूप आज्ञाधारक, समंजस, त्यागी, सेवाभावी, संस्कारक्षम. गृहिणी सुख सुख म्हणतात ते हेच होते. एवढं सगळं असल्यावर आणखी काय हवं होतं?
भारावल्यागत मनाची अवस्था होते न होते तोच धडाधड वर्तमानपत्रांतून, समाजमाध्यमांतून बातम्या वाचनात येऊ लागल्या. राजा रघुवंशी यांचा त्यांची बायको सोनमनेच मारेकरी घालून खून केला. ताजा ताजा संसार, आणि लग्नाला महिनाही झाला नव्हता. हनिमूनसाठी हे जोडपे मेघालयात गेले होते. सालस शृंगार केलेली सुंदर बायको, सभोवतालचा स्वर्गीय निसर्ग…. ‘राजा’ हवेतच तरंगत असावा. त्यातच समोर वटसावित्रीचे व्रत. बायकोविषयीच्या प्रेमाने तो भारावून गेला असावा. त्याने स्वप्नात तरी बायकोच आपला घात करील असा विचार केला असेल का? तो तिच्याबरोबर विश्वासाने चालत राहिला. तिने मात्र त्याचा गळाच कापला.
काही दिवसांपूर्वी वैष्णवी हगवणे हिचं प्रकरण झालं होतं. वयाच्या तेविसाव्या वर्षी ती श्रीमंत मुलाच्या प्रेमात पडली. हट्टाने लग्न केले. आईवडीलही कदाचित एवढा वजनदार जावई मिळतोय म्हणून हरखून गेले असावेत. त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य करीत गेले. दागिने, गाडी, चांदीची भांडी… असे आणखीही बरेच काही. दृष्ट लागावी असा दिमाखदार सोहळा संपन्न झाला. त्यावेळी सर्वांनीच ‘वैष्णवीनं नशीब काढलं… केवढं मोठं घराणं मिळालं!’ हा मोठेपणा मिरविला असणारच. मुलीच्या सासरची श्रीमंती पाहून सर्वांचेच डोळे दिपून गेले असावेत. वैष्णवीनेही किती गोड उखाणे घेतले होते. सात जन्मी हाच पती मिळावा म्हणूनही वडाला मागणे घातले होते. त्याच्यासाठी ती किती सजली-धजली, नटली होती. पती हाच परमेश्वर मानणारी ती अगणित स्वप्ने घेऊन विश्वासाने हगवणेंच्या उंबरठ्यावरील माप ओलांडून आली होती. काय आले तिच्या वाट्याला? तिच्या निरागस प्रामाणिक प्रेमाची तिला जबर किंमत मोजावी लागली.

आजपर्यंत अशा एकाच राजाला, एकाच वैष्णवीला क्रूरपणे मारून टाकण्यात आले असे अजिबात नाही. दिवसेंदिवस अशी कुकर्मे वाढतच आहेत. आपल्या भारतीय संस्कृतीतील कुटुंबव्यवस्था ही घराण्याची भरभक्कम अशी तटबंदी होती. भरपूर माणसे विविध विचारांची, स्वभावांची… एकत्रित राहायची.. घरं खूप लहान होती. परंतु त्या छोट्याशा घरात एकमेकांना सामावून घेत घेत जगण्याचा मंत्र शिकवून जायची. पंचपक्वनांचे जेवण नव्हते, मात्र चुलीवर रटमटणाऱ्या उकड्या भाताच्या सुगंधानेच अर्धी भूक वाढायची. कोण रांधायची, कोण वाढायची… सगळेच हात प्रेमाने अन्न शिजवायचे. मायेने वाढायचे. ताटात सांडले तर धपाटा घालायचे. त्यामागे घेतलेल्या कष्टांची जाणीव करून द्यायचे. खायचे ते एकट्याने कधीच नाही, मिळूनच खायचे हा संस्कार नकळतपणे रुजला होता. तिन्हीसांजेला लक्ष्मी घरात येते. त्यापूर्वी देवघरात, अंगणात दिवा तेवत ठेवायला हवाच हा संकेत होता. घरावर मोठ्यांची करडी नजर होती. छोट्यांना आदरयुक्त धाक होता. नवीन काही करायचे तर ते घरातील मोठ्या व्यक्तीच्या सल्ल्यानेच करायचे अशी शिस्त होती. माणसे पैसा, सुबत्ता, धनदौलतीने बांधली नव्हती तर मनाच्या ओढीने, आपुलकीच्या धाग्याने जोडली गेली होती. आता प्रेम पैशात मोजण्याचे दिवस आलेत. श्रीमंती वस्तूमधून शोधली जाऊ लागली. मनात द्वेषभावना असली, माणसं एकमेकांना फसवत जगत असली तरी एकमेकांना घट्ट मिठी मारून काढलेले फोटो स्टेटसला टाकून प्रेमाचे बंध किती उत्कट आहेत याची प्रदर्शने मांडण्यात येऊ लागली. वास्तव जगण्यापेक्षा बेगडीपणात गुंतून पडणे वाढले… विचार बदलले आणि एका आमूलाग्र बदलाच्या स्थित्यंतराला सुरुवात झाली. लग्न हे दोन मनाचे मीलन होते, त्यात पावित्र्य होते, विधी-परंपरेतून आलेली धार्मिक बंधने होती. परंपरेचे भय होते, मोठ्यांची शिस्त होती. आणि मुख्य म्हणजे या सर्व नात्यांना विश्वासाचे, जिव्हाळ्याचे, आपुलकीचे कोंदण होते. संकटात, संघर्षात मिळून उभे राहणे. आनंद वाटून घ्यावा, वेदनेला आपुलकीचा शब्द द्यावा. काही अघटित घडले तर सोबत कुटुंब उभे राहायचे. जुन्या सर्व परंपरा चांगल्या असतात असे अजिबात नाही; मात्र समूहात वावरताना संयम, सहनशीलता शिकता यायची. कळपाने, समूहाने राहणारा माणूस आज एकटा पडला आहे. लग्न एक संस्कार, ते एक पवित्र बंधन आहे, हा विचार केव्हाचाच मागे पडला आहे. आज लग्न एक देवाण-घेवाणीचा व्यवहार बनला आहे. पैसा, प्रतिष्ठा यांचीच स्पर्धा…

संसार ही जबाबदारी आहे, परंतु या जबाबदारीचे ओझे वाटायला लागले की त्यातील ओलावा, आनंद संपून जातो. आज जग बदलले आहे. संसाराची जबाबदारी तिची एकटीची नाही. ती दोघांची, सर्वांचीच आहे. तरीही ती किंवा तो- दोघेही खूश नाहीत. अहंकार जपायचा, तडजोड करायला कोणीच तयार नाही. लग्न ठरवताना घर, गाडी, दागिने, नोकरी, चेहऱ्याचे सौंदर्य, पैसा, मानपान बघायचे. त्याच्यासाठी वेळ खर्च करायचा. मुळात घराला, नात्याला बांधून ठेवणारा स्वभाव, वागणूक, संस्कार हे मुद्देच गौण मानले जातात. वारेमाप खर्च लग्नात केला जातो. नव्या नवलाईचे दिवस संपतात आणि खटके उडायला सुरुवात होते… त्यातच पतीसाठी वटसावित्रीचे व्रत ठेवले जाते. आपल्या पूर्वजांनी माणसांना श्वास पुरविणाऱ्या वडाला पुजले होते; आज त्याच वडाच्या फांद्या छाटून त्याचे कुंडीत पूजन केले जाते. व्रताचा आत्माच हरवून गेला आहे. व्रत परंपरेने करीत आलेले आहेत म्हणून करायचे, त्यातील मर्म शोधायचे नाही. एकमेकांना सहन करण्याची शक्ती संपलेली आहे. फक्त ‘मी!’ माझ्या उत्कर्षाआड, कृतीआड एखादी व्यक्ती येत असेल तर तिला संपवूनच टाकायचे ही आसुरी वृत्ती विनाशाला कारणीभूत ठरत आहे. नात्यांचे पावित्र्य नष्ट होऊन भोगवाद, चंगळवाद, अनैतिकता, स्वैराचार बोकाळला आहे. आपल्यासाठी व्रत-उपास करणारी पत्नी जेवणात विष कालवून ठार मारेल, मारेकऱ्यांना सुपारी देईल आणि संपवून टाकेल, असा साधा विचार तरी मनाला आत्ता-आत्तापर्यंत कधी शिवला नव्हता. पूर्वी भांडणं व्हायची, मारामारी व्हायची, हुंडाबळीचीही प्रकरणे घडायची. पण या गुन्ह्यांना समाजाचे प्रचंड भय होते. गुन्हा केलेली व्यक्ती समाजव्यवस्थेच्या बाहेर नकळतपणे फेकली जायची. आजची परिस्थिती खूप भयानक वाटते आहे. सर्वांसमक्ष सात जन्मासाठी घेतलेले फेरे थंड डोक्याने क्रूरतेचा कळस गाठतात तरी कसे? गोव्यात तर आता घटस्फोटांचेही प्रमाण वाढले आहे. मालिकांमधून जसे लग्नाचे भव्यदिव्य चित्र उभे केले जाते, तशीच वास्तवात लग्न लावण्याची स्पर्धा सुरू आहे. प्रिवेडिंग शूट, संगीत, मेहंदी, कोणत्या गाण्यावर आणि कोठे आपण नृत्य करायचे याचेही भान बाळगले जात नाही. लोकांच्या वेळेचे महत्त्व लक्षात न घेता त्यांना गृहीत धरून आकर्षक, लडिवाळ फोटो विविध प्रकाराने काढले जातात. सुरुवातीला व्रते, उपास करून अतूट नात्यांचे बंध फोटोत बंदिस्त केले जातात आणि मग जागा होत जातो अहंकार, वृथा अभिमान. हा द्वेष सर्वांनाच जाळून टाकतो. प्रचंड मानसिक ताणतणाव. आयुष्य विसकटून जाते. दोन व्यक्तीच नाहीत तर दोन कुटुंबे बरबाद होतात.

अलीकडे अनैतिकतेच्या जाळ्यात गुंतून, संशयाने झपाटून, बायकोने प्रियकराच्या साथीने पतीचा तर प्रेयसीच्या सोबतीने पत्नीचा कायमचा काटा काढल्याच्या बातम्या वाचनात येतात. अंगावर सरसरून काटा उभा राहतो, मनाला भय वेढून राहते. कुठे चाललाय माझा समाज? सवंग प्रतिष्ठा, बेगडी प्रेम, चंगळवाद, भोगवाद खुणावत आहे. घर हे संस्कारांचे प्रमुख केंद्र होते, आई संस्कारांची जननी होती, तीच आई ‘मम्मी’रूपात मुलीचा संसार करते आहे. संसार तर्काने, बुद्धीने होत नसतो, त्यासाठी संवेदनशील अंतःकरणाची गरज असते. हीच संवेदनशीलता आज हरवलेली आहे. स्नेह, जिव्हाळा, आपुलकी, प्रेम हे शब्दच हरवले आहेत. समाजमाध्यमांवर नात्यांचे विकृतीकरण आणि विद्रुपीकरण होत आहे. भारतीय संस्कृतीने पवित्र मानलेल्या नात्यांकडे पाहण्याची किळसवाणी नजर आज कोवळ्या, वयात येणाऱ्या मुलांना गोंधळात टाकत आहे. घरातील मोकळेपणाचा संवाद खुंटला आहे. त्यामुळे समाजमाध्यमांवर जे काही चालते तेच त्या कोवळ्या वयाला खरे वाटू लागते. त्याचे शंका निरसन होत नाही. त्याला खऱ्या-खोट्याची बाजू कळत नाही. परिणामी व्यसने, गुन्हेगारी, आत्महत्या यांसारखे प्रकार वाढत आहेत.
सावित्रीचा वसा जपणाऱ्या स्त्रियांनी समाजात माजलेली बजबजपुरी कुठंतरी बंद करायला हवी. त्यासाठी संस्कारांचे बाळकडू पिढीला पाजण्याचे सतीचे वाण घ्यायला हवे. आज जग झपाट्याने बदललेले आहे. स्त्रीच्या विस्तारलेल्या कार्यक्षेत्राला सर्वांनी मिळून समजून घेण्याची गरज आहे. तिच्या घरात तिचा सन्मान व्हायलाच हवा. दोन्ही बाजूनी सकारात्मक विचारधारा स्वीकारली तर चांगला सुदृढ बदल व्हायला वेळ लागणार नाही. आजच्या वैज्ञानिक युगात आपण बाह्यांगाने जसे परिपूर्ण बदललो आहोत तसे विचाराने पण बदलूया.. अंधश्रद्धाळूपणाने स्वाभिमान आणि वास्तव जीवन गहाण टाकून केलेल्या व्रताचे पुण्य कसे काय मिळणार? त्यापेक्षा सत्यवानांसाठी सावित्रीनी आणि सावित्रीसाठी सत्यवानांनी वटवृक्षाला फेरे मारावेत. कुटुंबाला सुदृढ करीत मुलांना संस्कारक्षम बनवत सर्वांच्या आयुष्याची वृद्धी करणारे व्रत जोपासण्यासाठीचे वाण घेण्याची आज गरज आहे.