संस्कार रामायण अवतारकार्याचा आरंभ

0
4
  • प्रा. रमेश सप्रे

रामाचे ठाम मत असते की मुळात तो क्षत्रीय राजकुळातील आहे. त्यामुळे ऋषींचे नि त्यांच्या यज्ञांचे रक्षण करणे त्याचे आद्य कर्तव्य आहे. या वनवासकाळातील प्रसंगापूर्वी राम-लक्ष्मणांची या अवतारकार्यासाठी एका ऋषींनी पूर्वतयारी करून घेतली होती. कोणता होता तो प्रसंग नि ते ऋषी?

कोणाही अवतारी पुरुषाची एकच प्रतिज्ञा असते- ‘परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृताम्‌‍।’ साधुसज्जनांचे रक्षण नि दुष्टदुर्जनांचे निर्दालन हेच अशा व्यक्तींचे खरे अवतारकार्य असते. यादृष्टीने विचार केला तर अयोध्येत रामराज्याची स्थापना करणे हे रामाचे महत्त्वाचे अवतारकार्य नव्हते. म्हणून म्हटले जाते की खऱ्या अवतारकार्यासाठी रामाचा प्रदीर्घ वनवास आवश्यक होता. कारण तेथे असलेल्या आश्रमातील ऋषिमुनींचे तसेच गुरुकुलातील आचार्यांचे रक्षण आवश्यक होते. कारण ही मंडळी संस्कृतीचे नुसते जतनच करीत नाहीत तर पुढील पिढीसाठी वहन किंवा संक्रमणही करतात. यातूनच मौलिक वाङ्मयाची (सद्ग्रंथांची) निर्मिती होते, ज्ञानविज्ञान शाखांचा विकास होतो आणि मुख्य म्हणजे हे सारे अनंत काळ चालू राहण्यासाठी गुरुशिष्यपरंपरा सुरू होते.
श्रीरामाच्या काळात ऋषींची हत्या करणाऱ्या, क्वचित्‌‍प्रसंगी ऋषींचे भक्षण करणाऱ्या राक्षसी वृत्तीच्या मंडळींनी अरण्यक्षेत्रात आतंक माजविला होता.

पुढे एका प्रसंगी मानवाच्या हाडांचा नि कवट्यांचा ढीग पाहून सीता भयभीत होते, तर रामलक्ष्मणांना आश्चर्य वाटते. चौकशी केल्यावर त्यांना कळते की त्या भागातील ऋषिमुनींच्या राक्षसांनी केलेल्या संहारानंतर त्यांच्या एकत्र केलेल्या अस्थींच्या त्या राशी होत्या. हे सारे कळताक्षणीच राम धनुष्यबाण धारण करून असुरांच्या निर्दालनाचा निर्धार करतो. यावेळी सीता त्याच्या तापसव्रतातील अहिंसावृत्तीचे स्मरण करून देते. यावर रामाचे ठाम मत असते की मुळात तो क्षत्रीय राजकुळातील आहे. त्यामुळे ऋषींचे नि त्यांच्या यज्ञांचे रक्षण करणे त्याचे आद्य कर्तव्य आहे. त्याचा धर्म आहे. या वनवासकाळातील प्रसंगापूर्वी राम-लक्ष्मणांची या अवतारकार्यासाठी एका ऋषींनी पूर्वतयारी करून घेतली होती. कोणता होता तो प्रसंग नि ते ऋषी?
त्याचे असे झाले की, एकदा ऋषी विश्वामित्र राजा दशरथाकडे आले नि त्यांनी आपल्या यज्ञाच्या रक्षणासाठी श्रीरामाच्या साह्याची मागणी केली. त्यावेळी रामाचे वय ‘ऊन षोडशवर्षं’ म्हणजे उणेपुरे सोळा वर्षांचे होते. मुख्य म्हणजे रामाला युद्धाचा नि तेही भयंकर राक्षसांविरुद्ध लढण्याचा अनुभव नव्हता. दशरथाने स्वतः सैन्यासह यज्ञरक्षणासाठी येण्याचे सुचवले. पण नियतीला नि विश्वामित्र ऋषींना काही वेगळेच अपेक्षित होते. म्हणून रामानेच येण्याविषयीचा त्यांनी आग्रह धरला नि मुनी वसिष्ठांच्या सल्ल्यानुसार राम नि त्याच्याबरोबर त्याचा बहिश्चर (बाहेरचा) प्राण असा लक्ष्मण असे दोघे राजकुमार यज्ञरक्षणासाठी वनाकडे निघाले. वाटेत विश्वामित्रांनी अनेक अरण्यांचा इतिहास नि आश्रमांची पूर्वकथा वर्णन करून सांगितली. अतिशय रम्य आश्रम परिसर पण तेथील आश्रम मात्र निर्जन याचे आश्चर्य राम-लक्ष्मणांना वाटले. या सर्व भूभागाला निर्भय-निर्धोक बनवण्यासाठीच तर विश्वामित्र त्यांना घेऊन आले होते.
विश्वामित्रांनी पहिली महत्त्वाची गोष्ट केली ती म्हणजे, त्यांनी तरुण राम-लक्ष्मणांना विविध शस्त्रे, अस्त्रे यांचे शिक्षण-प्रशिक्षण देऊन युद्धसज्ज बनवले. त्याचबरोबर अनेक दिवस उपाशी नि जागं राहून कार्यरत राहण्यासाठी बला-अतिबला यांसारख्या विद्या नि शक्तीही दिल्या.

यानंतर रामाची पहिली कसोटी होती ती तारका किंवा त्राटिकावधाची. आरंभी राम स्त्रीहत्येसाठी तयार नव्हता. पण विश्वामित्रांनी यापूर्वी देवांनी दुष्ट शक्तीच्या रूपात विद्ध्वंसक कार्य करणाऱ्या स्त्रियांच्या केलेल्या वधाच्या कथा सांगितल्या. शेवटी राम कसाबसा तयार झाला पण त्याने एक मधला मार्ग शोधून काढला. त्याने धनुष्यावर प्रत्यंचा (दोरी) चढवून तिच्या दीर्घ टणत्काराने त्राटिकेला हतबल करून टाकले. पण तिचे सामर्थ्य येणाऱ्या रात्रीत (अंधारात) दहा पटीने वाढेल हे सांगून विश्वामित्रांनी रामाला तिच्या हत्येची आज्ञा केली. त्यानुसार रामाने तिला मारून टाकले. हा तारकावध पुढे घडणाऱ्या घटनांच्या दृष्टीने अत्यावश्यक होता. आपल्या आईचा वध केला गेल्यामुळे अधिक उन्मत्त झालेले तिचे पुत्र विश्वामित्राच्या संकल्पित यज्ञाचा विद्ध्वंस करणार होते. त्या यज्ञाला भ्रष्टनष्ट करून सूड उगवणार होते. पण त्यासाठी तर राम-लक्ष्मण विश्वामित्रांबरोबर आले होते.

या प्रसंगातून घ्यावयाचे संस्कार आजही तेवढेच किंबहुना जरा जास्तच आवश्यक आहेत-

  • ऋषी नि त्यांचे यज्ञ यांचे रक्षण करणे हे समाजातील जबाबदार व्यक्तीचे कर्तव्य आहे. दुष्टांच्या निर्दालनाबरोबरच त्यांची दुष्ट शक्ती, दुर्विचार, दुष्टप्रवृत्तीही नष्ट होतात. यासाठी एक व्यक्ती म्हणून आपल्या सहकार्याची अपेक्षा असली तरी खलप्रवृत्तीच्या व्यक्तींशी संघर्ष करून त्यांचा नाश करणे हे समाजातील सर्व जाणत्या, अनुभवी व्यक्तींचे प्रथम कर्तव्य आहे.
  • हक्कांइतकीच नव्हे तर काकणभर अधिकच आपली कर्तव्ये प्रभावी असतात. आज तर हा कर्तव्याचा संस्कार सर्व क्षेत्रांत नि सर्व स्तरांवर अत्यावश्यक आहे. वर्णव्यवस्थेनुसार (वर्णभेदानुसार नव्हे) प्रत्येक वर्णाची विशेष कर्तव्ये असतात. त्यांच्या मर्यादाही स्पष्ट असतात. ऋषींचे क्षत्रियांची मदत घेऊन खलप्रवृत्तीचे उच्चाटन करणे जसे गरजेचे आहे, तसेच क्षत्रियांनी ऋषींच्या आज्ञेनुसार त्यांच्या मार्गदर्शनासाठी समाजाचे, संस्कृतीचे रक्षण करणेही आवश्यक असते.
  • रामायण अशा कर्तव्यपालनाचा मनोहर चित्रपट आहे.