>> मुलांच्या उपचारांसाठी वाहन पास देण्याची मागणी
केंद्र सरकारने लागू केलेल्या २१ दिवसांच्या संपूर्ण संचारबंदीमुळे विशेष मुलांच्या पालकांना आपल्या मुलांना विविध प्रकारच्या थेरपीज देणे अशक्य बनले आहे. राज्य सरकारने डॉक्टरांना आवश्यक सेवांमध्ये समाविष्ट केलेले असले तरी पॅरामेडिक्सना त्यात त्यामध्ये समाविष्ट केलेले नाही. त्यामुळे फिजिओथेरपीसारख्या या सेवा सध्या बंदच आहेत. शिवाय विशेष मुलांच्या पालकांना घराबाहेरच पडता येत नसल्याने आपल्या विशेष मुलांना हे उपचार देणार्या डॉक्टरांपर्यंत कसे घेऊन जावे असा मोठा बिकट प्रश्न त्यांच्यापुढे पडला आहे. आपल्या विशेष मुलांना उपचारार्थ त्यांच्या नियमित डॉक्टरकडे घेऊन जाण्यासाठी वाहन पास दिला जावा अशी मागणी या पालकांनी केली आहे.
राज्यामध्ये फिजिओथेरपी, स्पीच थेरपी व इतर प्रकारचे उपचार घेणार्या विशेष मुलांची संख्या मोठी असून सध्या संचारबंदीमुळे या मुलांना घरातच कोंडून बसावे लागले आहे. त्यांचे नेहमीचे उपचारही करणे त्यांच्या पालकांना शक्य होत नसल्याने या परिस्थितीत सरकारने मदतीचा हात द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
विशेष मुलांवर उपचार करणार्या पॅरामेडिक्सच्या सेवा त्यांना आपली क्लिनिक्स उघडण्यास परवानगी नसल्याने बंद आहेत. त्यांच्याकडून उपचार करून घेण्यासाठी त्यांच्या घरी घेऊन जावे तरीही पालकांपाशी वाहन पास नसल्याने या मुलांना घराबाहेर काढता येत नाही. यासंंदर्भात आपण स्वतः मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना सर्व परिस्थिती विशद करणारा एसएमएस केला होता, परंतु त्याचे आजतागायत उत्तरच आलेले नाही असे एका विशेष मुलाच्या पालकाने सांगितले.
सरकारने फिजिओथेरपी आणि इतर थेरपीज् देणार्या पॅरामेडिक्सना आपली सेवा सुरू करण्यास सांगावे व विशेष मुलांच्या पालकांना वाहन पास उपलब्ध करून द्यावेत. संपूर्ण संचारबंदीमुळे घरातच कोंडून पडलेल्या या विशेष मुलांना मोकळा श्वास घेऊ द्यावा अशी मागणी या पालकांनी केली आहे.