संगीत म्हणजे एक अथांग महासागर ः प्रभाकर कारेकर

0
34

गोवा सरकारचा प्रतिष्ठेचा गोमंतविभूषण पुरस्कार हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातले एक ज्येष्ठ व ख्यातनाम गायक पं. प्रभाकर कारेकर यांना प्राप्त झाला आहे. या पार्श्वभूमीवर आमचे पणजी प्रतिनिधी बबन भगत यांनी पं. प्रभाकर कारेकर यांची घेतलेली मुलाखत…

प्रश्न ः गोमंतविभूषण हा गोव्यातील सर्वांत मोठा नागरी पुरस्कार आपल्याला प्राप्त झाल्याचे कळल्यानंतर आपली काय भावना होती?
उत्तर ः गोवा सरकारच्यावतीने दिला जाणारा हा पुरस्कार मला जाहीर झाल्याचे जेव्हा मला कळले, तेव्हा झालेला आनंद मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. मी गोमंतकीय असल्याने गोव्यावर माझे अमाप असे प्रेम आहे. यापूर्वी मला कित्येक पुरस्कार मिळालेले आहेत; पण हा पुरस्कार माझ्यासाठी खास आहे, कारण माझ्या गोमंतकीय बांधवांनी मला दिलेला हा पुरस्कार आहे.

प्रश्न ः गोव्याने आपली दखल उशिरा घेतली असे वाटते का?
उत्तर ः काही गोष्टी घडण्यास उशीर लागतो. त्यामुळे माझी दखल घेण्यास उशीर झाला असे मी म्हणणार नाही. उशिरा मिळाला असेल, पण काही हरकत नाही.

प्रश्न ः संगीत नाटकासाठी आपण दिलेले योगदान हे फार मोठे आहे. आपण गायलेली नाट्यगीते प्रचंड गाजली. आता आधुनिक काळात संगीत रंगभूमी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. संगीत रंगभूमीचे दिवस संपले असे आपल्याला वाटते काय?
उत्तर ः संगीत रंगभूमीसाठी आता कुणी मेहनत घेताना दिसत नाही. नाट्यसंगीताचा दर्जा तर खूपच घसरला आहे. आमची युवा पिढी ही तशी खूपच हुशार आहे; पण त्यांची संगीतासाठी वेळ देण्याची तयारी नाही. संगीत रंगभूमीचा वारसा जर पुढे न्यायचा असेल, तर संगीत क्षेत्रातील युवा पिढीला त्यासाठी खूप मेहनत करावी लागेल.

प्रश्न ः संगीत क्षेत्रात आपला प्रवेश कसा झाला?
उत्तर ः मी मडगाव येथील ‘न्यू इरा’ हायस्कूलमध्ये शिकत होतो. मी सातवी इयत्तेत असताना आमच्या हायस्कूलमध्ये स्नेहसंमेलन होते. त्यावेळी मी पं. सुरेश हळदणकर यांची दोन गीते गायलो होतो, ती प्रेक्षकांना एवढी आवडली की दोनदा ‘वन्स मोअर’ मिळाला. त्यानंतर पारकर नामक शिक्षकांनी माझी खूप स्तुती केली. पारकर सरांसह कित्येक लोकांनी मला संगीत शिकायला जाण्याचा सल्ला दिला. माझे वडील हे भजनी कलाकार होते. ते मला शिरगावकर यांच्याकडे घेऊन गेले. शिरगावकर सर म्हणाले, याला मोठ्या गुरुची गरज आहे. याला मुंबईला पाठवा, तेव्हा गोव्यात पोर्तुगीज राजवट होती आणि मुंबई गाठणे हे सोपे काम नव्हते. मुंबईला जाण्यासाठी पासपोर्टही लागायचा; मात्र वडिलांनी काही वाटाड्यांची मदत घेतली. त्या वाटाड्यांनी आम्हाला रानातून गुपचूप गोव्याच्या हद्दीबाहेर सोडले; पण त्यासाठी 8 दिवस रात्रंदिवस आम्हाला रानातून पायी चालत जावे लागले.
मुंबईला मी सुप्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायक सुरेश हळदणकर यांच्याकडे गायनाचे शिक्षण घेतले. त्यानंतरच्या काळात जितेंद्र अभिषेकीबुवा, सी. आर. व्यास आदींकडूनही शिक्षण घेतले. खूप मेहनत घेऊन शिकलो.

प्रश्न ः गुरू जितेंद्र अभिषेकीबुवांविषयी आपण काय सांगाल?
उत्तर ः जितेंद्र अभिषेकी ही एक महान विभूती होती. त्यांनी नाट्य संगीतात जे योगदान दिले, त्याला तोड नाही. नाट्यसंगीतात वेगवेगळे प्रयोग तर त्यांनी केलेच, शिवाय नाट्यसंगीताला शिखरावर पोहोचवले. नाट्यसंगीतात त्यांनी एक नवे विश्व निर्माण केले, असे म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही.

प्रश्न ः एकेकाळी गोव्याने संगीत क्षेत्राला कितीतरी रत्ने दिली. मात्र आता त्यात खंड पडलेला दिसतो. असे का झाले असे आपल्याला वाटते?
उत्तर ः आताची तरुण पिढी ही शास्त्रीय संगीतात रस घेत नाही. त्यांच्याकडे प्रतिभा आहे. त्यांना गरज आहे ती गॉडफादरची आणि संगीत साधनेत स्वतःला झोकून देण्याची. एका एका गुरूने पाच-पाच शिष्यांना घेऊन बसण्याची गरज आहे, असे मला वाटते.

प्रश्न ः चित्रपटसंगीताविषयी तुमच्या काय भावना आहेत?
उत्तर ः आताच्या चित्रपट संगीताविषयी न बोललेलंच बरं; पण एक काळ होता, जेव्हा भारतीय चित्रपट संगीतात शास्त्रीय संगीताचा खूप वापर केला जायचा. त्यावेळचं चित्रपटसंगीत अस्सल सोनं होतं. ते चित्रपटसंगीत मी अजूनही ऐकतो.

प्रश्न ः आता मागे वळून पाहता तेव्हा आपल्याला काय वाटते?
उत्तर ः मी संगीत क्षेत्रात उतरलो आणि मला खूप काही करता आलं. मला नशिबाने फार मोठे गुरू लाभले. माझ्या गायनकलेवरही लोकांनी जीवापाड प्रेम केले. मी या लोकांचा फार आभारी आहे.
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत म्हणजे एक अथांग समुद्र. एकदा तुम्ही या समुद्रात उतरलात की तुम्हाला अन्य काही दिसत नाही. अन्य काही सुचत नाही. तुमचं सगळं जीवनच संगीतमय होऊन जातं; पण संगीत शिकायला आयुष्य मात्र पुरत नाही.